Wednesday, September 17, 2014

"बाबल्याचो ठराव"

"बाबल्याचो ठराव"


काल पंधरा ऑगस्ट रोजी शासकी
य नियमाप्रमाणे आमची हक्काची ग्रामसभा होती.पर्यावरण निधीतून प्रत्येक कुटुंबाला वस्तू वाटप असल्याने पंचायतीचे सभागृह वेळेआधीच तुडुंब भरले होते.एकही सभा न चुकवणारा आमचा "बाबल्या" सुद्धा जातीनिशी पहिल्या रांगेत हजर होता.प्रोसिडिंग वरचे विषय हळूहळू पुढे सरकत होते.प्रत्येकाला आपापली भेट वस्तू घेऊन घर गाठायची घाई असल्याने सभेच्या विषयांवर फारशी चर्चा रंगत नव्हती.
गेल्यावर्षी पर्यावरण निधीतून झाडांचे वाटप झाले होते.तसेच पंचायतीच्या पंधरा टक्के राखीव निधीतून कोंबडीच्या पिल्लांचे वाटप झाले होते.सरतेशेवटी या वर्षात ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधीतून काय वाटप करायचे यावर चर्चा सुरु झाली.बहुतेकांनी कोंबडीच्या पिल्लांचाच पर्याय योग्य असल्याचे सांगितले.तेवढ्यात परवाच्या सत्काराने खूष असलेला "बाबल्या" उभा राहिला आणि ठराव मांडतात त्या आवेशात म्हणाला.....
"सरपंचानु गेल्या वर्षी कोंबडी वाटलात,यंदा बकरे वाटा.वर्षागणिक थोडीतरी प्रगती नको पंचायतीची".....
बाबल्या रॉक्स ..सरपंच शौक्स .......

"बाबल्याचा जनगण"

"बाबल्याचा जनगण"


वेळ संध्याकाळची,आमच्या गावातल्या चौकात गप्पा मारत बसण्याची.............
आज नेहमीपेक्षा थोडे कमीच म्हणजे सात आठ जण जमलेले होते.गप्पांचा विषय होता परवा संपन्न झालेला "स्वातंत्र्यदिन" सोहळा.आम्ही जिल्ह्याच्या मुख्यालयाशेजारी रहात असल्याने स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य सोहळा आम्हांला पाहता आणि अनुभवता येतो.विशेष म्हणजे मंत्र्यांच्या भाषणातून आम्हांला आमचा जीडीपी आणि आमचे दरडोई उत्पन्न सुद्धा समजते.त्यामुळे या सोहळ्याचे कवित्व पुढचे आठ दिवस सुरु राहते.आज तसाच विषय सुरु होता,एवढ्यात कोणाच्यातरी मोटरसायकल वरून आमच्या बाबल्याचे आगमन झाले.बाबल्याची स्वतःची मोटरसायकल नाही परंतु जास्तीत जास्त वेळ तो कोणाची तरी मागची सीट अडवून असतो.ज्याप्रमाणे रमीच्या डावात एक पान असे असते की जे आपल्याला लागत नाही पण खाली टाकले तर दुसऱ्याला लागण्याची व त्याचा डाव पुरा होण्याची शक्यता असते अगदी तसाच "बाबल्या" हा विषय असल्याने जो तो नेहमी त्याला सांभाळत असतो.
आल्याआल्याच बाबल्या चर्चेत सहभागी झाला.पांढरा सदरा घालून,झेंड्याचा बिल्ला लावून परवा आपण किती ध्वजवंदनाला उपस्थित होतो त्याचे रसभरीत वर्णन सांगू लागला.इतक्यात आमच्यापैकी एकाला त्याची गम्मत करण्याची हुक्की आली.अशी बाबल्याची चेष्टा करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांची "आ बैल मुझे मार"अवस्था होते.तरीही का कुणास ठावूक नेहमीचे गिऱ्हाईक "बाबल्या"च असतो.
तो मित्र बाबल्याला म्हणाला..."बाबल्या,मेल्या इतकी मोठेपणा सांगतहस झेंडावंदनाची पण तुका साधा "राष्ट्रगीत"तरी म्हनाक येता काय ?".....
"येता म्हणजे..? पुरा पाठ हा...म्हणाव....?"असं म्हणून बाबल्या "झेंडा उंचा रहे हमारा"च्या दोन ओळी म्हणतो.तेवढ्यात कोणीतरी ते "ध्वजगीत"असल्याचे सांगून त्याला थांबवतो.
पहिल्याला बाबल्याचा कधी नव्हे तो पाडाव करण्याची आयती संधी आल्यासारखी वाटते ...तो म्हणतो "अरे राष्ट्रगीत म्हणजे "जनगण" म्हन ...आणि पुरा म्हनत आसशीत तर आपली शंभर रुपयाची पैज".....बाबल्या पैज जिंकण्याची शक्यताच नव्हती,कारण बऱ्याच भारतीयांप्रमाणे त्यालाही ते फक्त समूह्गीतात म्हणता येत असे.
हा जरी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असला तरी या घडीला मात्र त्याचा एकट्याचा होता,पण हार मानेल तर तो बाबल्या कसला....सगळ्या हसणाऱ्या मंडळींकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाबल्या डाफरला. " देशाच्या इतक्या पवित्र आणि मानाच्या राष्ट्रगीतावर ह्यो मेलो पैज लावता आणि ती पन शंभर रुपड्यांची ...आणि मेल्यानु तुमी हसतास,लाज नाय वाटत तुमका"...."देशात ह्या चल्ला काय ?..कोन झेंडो जाळता,कोन उलटो फडकवता,कोन हातात घेवक लाजता तर कोन कपाळाक गुंडाळता..ते मेले सगळे देशद्रोहीच ...आणि तेंच्याबरोबर तुमी ....पैजी खेळनारे...आग लागो तुमच्या तोंडाक"...
एका दमात एवढे बोलून,सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवून ज्याच्या मोटारसायकलवरून तो आला होता त्याच्याबरोबर पसार झाला.इकडे त्याच्या बोलल्याने "सावधान" मध्ये असलेल्या मंडळीनी "बाबल्या"च्या इरसालपणाला मनातल्या मनात एक "स्यालूट" ठोकला आणि "विश्राम" होत घराचा रस्ता धरला.

"बाबल्याची राणी".....

"बाबल्याची राणी".....


गेल्या आठवडाभरात बाबल्याच्या मदतीने आवाटातली झाडून सगळी घरे "झाडून"झाली,पण चतुर्थी दोन दिवसावर आली तरी बाबल्या आपले घर झाडायचे नावही काढेना.आज सकाळीच बाबल्याच्या बायकोने त्याला चांगलाच दम भरला.त्यामुळे मुकाट्याने झाडू घेऊन बाबल्या साफसफाईच्या मोहिमेवर रुजू झाला.बाबल्याचे जुने घर आणि त्याला जोडून घरकुल योजनेतल्या दोन खोल्या आज त्याला आवरायच्या होत्या.अख्ख्या दिवसाची आज इथेच "काशी" होणार या विचाराने तो तसा नाराजच होता.साफसफाईला सुरवात केली आणि अडगळीत असलेल्या बिनकामाच्या अनेक वस्तूंचा ढीग जमा झाला.बायकोला मनातल्या मनात शिव्या देत त्याने सगळ्या बिनकामाच्या जुन्यापुराण्या वस्तू एका टोपलीत भरल्या आणि बाहेर टाकणार तेवढ्यात बाबल्याची लक्ष्मी हजर आली,आणि टोपलीतल्या वस्तू पाहून बाबल्यावर करवादली. "तुमका सामायन यवस्थित लावूक सांगलय,भंगारात घालूक नाय"
आता मात्र बाबल्याची सटकली..
"अगो मायझया,कित्या ह्या रोंबाट भरून ठेवलंस?...अडचन नुसती"
"...आणि भुतूर हा काय तर जुनो स्टो तेचे पीनी,ग्यासाची जुनी लायटरा,फुटके कोप बशये,पारो गेलेलो आरसो.... तुझे फाटके साडये नी परकर असाच ना"
"आसांदे,तुमी ठेवा थयच....सगळा उपयेगाचा हा ता"....इति सौ.बाबल.
"अगो,तू काय सोताक इंग्लंडची राणी समाजतसं की काय ? म्हणजे पुढे तू मेल्यार तू वापरलेल्या ह्या वस्तूंचो लिलाव करून तुझी नातवा पतवंडा खूप पैसो कमावतीत असा तुका वाटता ?.....
याचा नेहमीप्रमाणे घरात काम करण्याचा मूड नाही हे ओळखून बायकोने त्याच्या हातातला झाडू हिसकावून घेतला आणि दाराकडे बोट करून "तुमी खयते जावा मी कामाचा बघतंय" अशी सूचक खुण केली....पडत्या फळाची आज्ञा समजून बाबल्यानेही मघाशी दोन वेळा कामात असल्याने कट केलेला मित्राचा नंबर डायल केला तो थेट आजच्या "श्रावण समाप्ती"मोहिमेत समाविष्ट होण्यासाठीच .....

"मारुती"..

"मारुती".....


एका माणसाची "मारुती"कंपनीची गाडी आमच्या गावाजवळ रस्त्यात बिघडते,तो मेक्यानिकच्या शोधात असताना त्याची भेट आमच्या "बाबल्या"शी होते.
गाडी मालक-इथे कोणी "मारुती"चे काम करणारा मिळेल का? 
बाबल्या -(जरा विचार करून)..होय मिळात...
गाडी मालक -चला प्लिज भेट घालून द्या.
बाबल्या त्याला एका घराकडे घेऊन जातो.त्याच्या अंगणातूनच त्याला हाक मारतो.
"बबन्या "मारुती"चा काम करुचा हा..तुझी हत्यारा घेऊन भायेर ये"
तो सद्गृहस्थ खूष होत "बबन्या" घराबाहेर येण्याची वाट पाहू लागतो.
दहा मिनिटांनी लाल चड्डी घातलेला उघडाबंब "बबन्या" आपले दोन्ही गाल फुगवत, एका हाताने शेपटी पकडत आणि दुसऱ्या हातात भलीमोठी "गदा"घेऊन बाहेर येतो.
बाबल्या रॉक्स....गाडी मालक शौक्स.....

"बाबल्याच्या बायलेचो गाऊन"..

"बाबल्याच्या बायलेचो गाऊन"......


यंदा चतुर्थीच्या खरेदीला कधी नव्हे ती बाबल्याची बायको कुडाळला गेली.सोबत तिची मुंबईवरून आलेली जाऊबाई होती.तिच्या आग्रहात्सव बाबल्याच्या बायकोने घरी वापरायला दोन "नाईट गाऊन" घेतले. सासूच्या धाकामुळे इच्छा असूनही लग्नानंतर ती साडीच वापरत होती,त्यामुळे जाऊबाईच्या धीराने घेतलेल्या "गाऊन" विषयी तिला प्रचंड उत्सुकता होती.घरी आल्यावर तो रंगीबेरंगी "गाऊन" परिधान करून लाजत लाजतच बाबल्या समोर येत म्हणाली...
"ओ मिया कसा दिसतंय ?"
इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिला गाऊनमध्ये पाहून बाबल्याने आश्चर्याने विचारले
"ही कोणाची म्याक्शी घातलस?"........
"कोणाची कित्या ? मिया इकत आणलंय कुडाळसून" इति.बा.बा.
यावर काही अभिप्राय द्यायचा सोडून बाबल्याने विचारले....
"किती रुपये गो ?".....
"दुकानदारनीन तीनशे साठ रुपयाचे दोन सांगल्यान ...कमी करून तीनशे चाळीसाक आणलंय"
"तीनशे चाळीसाक ?.....
अगो इतक्या पैशात तर आमचा नुसता "गाऊन"च नाय तर "नाचून" सुद्धा झाला आसता"......(बाबल्या हाताचा अंगठा वर तोंडाकडे नेत समर्पक अशी खुण करत म्हणाला)
"बाबल्या जोमात .....म्याक्शीवाली कोमात"

गणपतीचो बाजार

कोकणात "गणपती बाप्पा"यायची वेळ झाली की अनेक कामे समोर येतात.त्यातलेच एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे "चतुर्थीचा"बाजार भरणे.आमच्या घरी आज हे काम प्रायोरिटीवर होते.सकाळी सकाळीच आमच्या मातोश्री आणि सौभाग्यवतीनी (कधी नव्हे ते एकमताने)बाजाराचे टिपण तयार करून माझ्या हातात दिले.मी वाटसअप वरून ते आमच्या वाण्याकडे पाठवले.अपेक्षेप्रमाणे तासाभराने त्याचा फोन आला,मी गाडी काढली आणि बाजाराच्या पिशव्या घरी आणल्या.....
येता येता मन मात्र पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या चतुर्थीच्या बाजाराच्या आठवणी आठवू लागले.
कोकणात चतुर्थीच्या खर्चासाठी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहण्याचे ते दिवस होते.घर परसदाराची साफसफाई झाली,मातीच्या भिंतीना "रेवा" काढला की घरातली जाणती महिला मंडळी बाजाराची यादी तयार करत.गणपती सणाचे दिवस आणि पुढे येणारा म्हाळवस या दरम्यानच्या काळासाठी गरजेच्या तितक्या नेमक्या वस्तूची ती यादी असायची.साधारण दरांचे अंदाज बांधून बजेटनुसार त्यात फेरफार करून अंतिम यादी तयार होत असे.मग सोयीच्या वेळेनुसार ती आपल्या नेहमीच्या उधारीवाल्या वाण्याकडे जात असे.मागील बाकी असल्याने दुकानदार आज काय काय ऐकवतोय याचीही धाकधूक मनात असायचीच.मग एखाद्याची दोन चार दिवसात येणारी मनीऑर्डर किवा भातकापणी नंतर व्यवहार "क्लिअर"करण्याच्या हमीवर बाजाराची टोपली किवा पिशवी भरत असे.सगळा मामला उधारीचा असल्याने कुठेही,कोणत्याही वस्तूबाबत "ब्रान्ड"ची अपेक्षा नसायची.याउपर कोणत्यातरी चाकरमान्याकडून भेट म्हणून येणाऱ्या असल्याने यादीत न लिहिलेल्या (उदा.बिनवासाची अगरबत्ती,कापूस,धूप,कापूर यासारख्या) वस्तूही दुकानदाराकडून घ्याव्या लागायच्या,त्यामुळे बाजाराचा हा विषय म्हणजे मोठे "दिव्य"असायचे.आणि या दिव्व्यातून खेड्यातल्या जवळपास सर्वांनाच जावे लागत होते.
आता कोकणात खूप "श्रीमंती" आली आहे असे नाही,परंतु पूर्वीसारखी "ऋण काढून सण साजरा करण्याची"अवस्था अपवाद वगळता नक्कीच नाही,आणि बाप्पाच्या कृपेने ती कधीच आणि कुठेही असू नये......
"गणपती बाप्पा .....मोरया"

भजनांची मजा

त्याकाळच्या भजनांची,
मजा आता ऱ्हवाक नाय....
तीस चाळीस जणांचो हाली,
मेळच खंय दिसाक नाय....
कपाळार पेटी घेतलेलो,
झीलगो खय दिसाक नाय....
गाडयेची सोय झाल्याशिवाय,
भजन खयच पोचत नाय...
कडक बुंदीच्या लाडवांका,
कोणच्याच पोटात जागा नाय....
वडे समोसे उसळपावाशिवाय,
दुसरी खयचीच ऑर्डर नाय....
रात्री उशिरा भजन ऐकाची,
घरातल्यांका सुदा आवड नाय....
उशिरान भजन येता म्हटल्यार,
जो तो घेता पोटात पाय....
मनासारखी हत्यारा इली,
पण आधी सारखो कोरस नाय....
करूची म्हणान करतत झाला,
बहुतेकांक तेतूर आता अजिबातच रस नाय .....
(प्रभाकर सावंत)
(शहरीकरणाचा वारा लागलेल्या गावांमध्ये आज अशी स्थिती दिसते.त्यामुळे तिथे ठराविक मंडळींची आवड आणि त्यासाठीची धडपड यानिमित्ताने दहा दिवस पाहायला मिळते.काही गावांमध्ये अपवादाने आजही जुने वातावरण असू शकते.)

चार्जिंग

रेल्वे प्रवासात आपल्या बर्थ जवळ चार्जिंगसाठी प्लग असणे,
त्यात करंट असणे,
त्यामध्ये आपल्या चार्जरची पिन घट्ट बसणे...
आणि आजूबाजूच्या बर्थवाल्यांनी कधीतरी आपल्याला "पिन" लावायची संधी देणे....
या सर्व गोष्टी जुळून यायला खूप मोठ्ठ नशीब लागतं.....
आणि असं जेव्हा होतं तेव्हा नुसता मोबाईलच नाही तर स्वतःलाही "चार्ज" झाल्यासारखे वाटते......
फिलिंग चार्जड.......

"बल्ले बल्ले"....

"बल्ले बल्ले"....

आयत्यावेळी आमचा एक मेंबर गळपटला आणि त्याच्याजागी आमच्या "बाबल्या"ची वर्णी लागली.हॉटेल्स,तिथे फिरण्यासाठीची गाडी आधीच बुक झाली होती,आता प्रश्न होता तो फक्त त्याच्या विमान तिकिटाचा.तो मग सर्वांनी शेअर करायचं ठरवलं आणि बाबल्याने तयारी सुरु केली.
आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण कोल्हापूरमार्गे महालक्ष्मीने मुंबईला निघालो आणि बाबल्या सात दिवसांचे वाडीतले गणपती विसर्जन आटपून कोकणकन्या गाडीने सकाळी मुंबईत पोहोचला.दादरला कैलास लस्सी जवळच्या ब्रिजखाली "बाबल्या"नामक असामीची माझ्या मित्रपरीवाराशी गळाभेट झाली.पहिल्याच भेटीत त्याने चिटकवलेल्या एक दोन "मालवणी डायलॉग"मुळे आमच्या कोल्हापूर आणि रत्नागिरीकर मंडळीना हा "नाद खुळा" आयटम भलताच आवडला.आणि गेल्या अनेक ट्रीपमधला "केंद्रबिंदू" माझ्याकडून बाबल्याकडे सरकला.
तिथल्या हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही एअरपोर्टकडे निघालो.मागच्या एका ट्रिपचा विमान चुकण्याचा अनुभव हल्ली आम्हांला वेळेआधीच एअरपोर्टवर पोहचवतो.आजही तसच झालं,चक्क दोन तास आधी आम्ही टर्मिनलवर होतो.टिंगलटवाळीत एक तास कसा निघून गेला ते कळलच नाही,मग आम्ही "चेकइन" साठी गेटपर्यंत गेलो.तिथे तिकीट आणि ओळखपत्र दाखवेपर्यंत आमच्या मागे रांगेत असणारा बाबल्या अचानक गायब झाला.त्याचा फोनही लागेना.आम्ही पुन्हा मागे येऊन थांबलो तितक्यात घामाघूम झालेला बाबल्या धावतपळत पोहोचला.त्याला काही विचारण्याइतका वेळ आतातरी नव्हता.त्याला घेऊन आम्ही चेकइन झालो.ओळखपत्र दाखवताना मात्र त्याने कमालच केली.सरपंचाच्या रहिवाशी दाखल्यापासून,पोलीसपाटील,रेशनकार्ड,पासबुक,निवडणूक आणि शेवटी आधारकार्ड अशी जंत्रीच(ह्यातला व्हया ता बघा या हिशोबाने) सिक्युरिटीच्या हातात दिली."आयत्यायेळेक लफडा नको"हे त्याचे त्यावरचे स्पष्टीकरण.
आत जरा निवांत असताना मी मघाचा विषय काढला.
"अरे बाबल्या मघाशी असा अचानक कुठे गेला होतास ?"
"अवो,येताना दाढयेचा ब्लेड हाडूक इसारलय,ता गावता काय बगुक गेललय,पण भंगला जवळ खय दुकानच गावाक नाय.ह्या विमानतळाचा काय खरा नाय वो,आपल्याहारी कसा यस्टीतसून हात भायर काढलो तरी होया ता गावता"....
"अरे ब्लेड काय तिथेही घेता येईल, नाहीतर "सलून" मध्ये दाढी करता येईल.त्यासाठी इतकी धावपळ कशाला"....मी
"बरे माका येडो करतास,आपण जातव पंजाबात,थय सगळे सरदारजी,थय कित्या कोन दाढी करता?....मग सलुना तरी कित्या आसतली?" ......
बाबल्या रॉक्स....मित्रमंडळ शॉक्स......

वात्रटिका

आजच्या तरुण भारत,सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये प्रकाशित वात्रटिका....
"घराणेशाही"
घराणेशाहीच्या आरोपात आता,
उरले नाही काहीच तथ्य....
आरोपी ते आरोपी पण,
"फिर्यादी" तरी कुठे पाळतात पथ्य.....
"दीपक"
दहशतरूपी अंधकार मिटवण्यासाठी,
सर्वांनी पेटवलेला "दीपक"....
आता मात्र विझवू पाहतायेत,
मिळून सारे "कीटक".....
"निकाल"
मार्चमधली नापास मंडळी,
ऑक्टोंबरला "पास"होतात म्हणे....
पण आता "निकाल" कसा लावायचा,
ते मात्र "मतदार"राजाच जाणे.....
"वाटणी"
छोटा भाऊ,मोठा भाऊ,
वाटणी हवी समान....
मोदी लाटेत तरल्याने,
झाले सारे बेभान....
अशी संधी पुन्हा नाही,
कामाला लागा गुमान ....
आशेवर आहे जनता,
तिचा ठेवा थोडा मान ....
(प्रभाकर सावंत,सिंधुदुर्गनगरी)

बाबल्याची "गोळी"...

बाबल्याची "गोळी".....

आमच्या ट्रिपचा बहुदा चौथा आणि गणपतीचा अकरावा दिवस होता.त्यादिवशी आम्ही अमृतसरहून सिमल्याला निघणार होतो.सकाळची आवरावर सुरु होती.आदल्या दिवशी सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डरचा प्रोग्राम झाला होता त्यामुळे सगळेजण तसे दमलेलेच होते,तरी पुढचा प्रवास मोठा असल्याने आमची विनातक्रार तयारी सुरु होती.
एरव्ही सकाळी सहाला उठून आंघोळ इत्यादी आवरून बसणारा "बाबल्या"मात्र आज आठ वाजले तरी अंथरूण सोडत नव्हता.मी बाबल्याला हाक मारून लवकर तयारी करायला सांगितली.काहीश्या नाविलाजाने बाबल्या उठला आणि आवरायला निघाला.पण तो नेहमीसारखा उत्साही दिसत नव्हता.त्याची एकंदर जीवनशैली पाहता कालच्या फिरण्याच्या,जेवणाच्या किवा एकाद्या "चपटी"च्या त्रासाने तो दमणारा किवा त्रासणारा मुळीच नव्हता,म्हणून थोड्याश्या काळजीने मी त्याला विचारले.
"काय रे बाबल्या,आज काय तब्येत बिब्येत बरी नाय की काय ?"
"होय हो सायबानो,आज कपाळ धरला हा आणि पोटातसुदा मळमळता...उठान सारख्या वाटतच नाय" आंघोळीला निघालेला बाबल्या पुन्हा बेडवर बसत म्हणाला.
काल तर आपण साधी दालखिचडीच खाल्ली तरी त्याला त्रास झाला म्हणून मी त्याला विचारले,
"काल आजून काय अरबट चरबट खाल्लस काय रे ?"
"बाकी काय नाय, कायम खातंय ते गोळये खाल्लंय फक्त" बाबल्या...
"तू आणि गोळये?… ते रे कित्या? आणि कधीपासून खातस बाबा ?" मी
"हालीच..कोलते डॉक्टरानी दिल्यानी ब्लड प्रेशर कमी करुचे" बाबल्याचा खुलासा..
तेवढ्यात माझ्या एका मित्राने त्याचे गोळ्यांचे पाकीट पाहिले,त्यावर "प्रायमोलट एन" असे लिहिले होते, त्या मित्राला थोडीशी मेडिकलची माहिती असल्याने त्या गोळ्या स्त्रियांशी संबंधित असल्याची शंका आली,त्याने फोनवरून त्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर भावाला डिटेल्स विचारले,तेव्हा लक्षात आले की बाबल्याने गडबडीत भलत्याच गोळ्या आणल्या आणि तीन दिवस खाल्ल्या सुद्धा.
मी बाबल्याला त्याच्या घरी फोन लावून दिला आणि चौकशी करायला सांगितली.
बाबल्याची बायको बहुदा ह्याच्या फोनचीच वाट पहात होती त्यामुळे एका रिंगमध्येच फोन पोचला आणि ती समोरून कडाडली.
"शिरा पडली तुमच्या तोंडार…. फिराक जावचा आसला काय इतके भूरावतास कित्या?"
"अगो हय माका बरा नाय आणि तू थयसुन चीडतस कित्या …. असा झाला तरी काय?" साळसूद बाबल्या….
"झाला काय म्हणान माका इचारतास?…अहो खोरनातले माझे गोळये घेवन गेलास आणि तुमचे हयच ठेवलास" बा. बा.
"तुझे आणि कसले गो गोळये?"….
"कसले ते इलास काय सांगतंय… मी पण मेल्यान दोन दिवस ते न बगता खालय आणि गणपती घरात आसताना घराच्या "भायेर"बसलंय ……
आता मात्र अदलाबदलीने झालेली "गडबड" समजून घेण्याची बाबल्याची "पाळी"होती.
त्यातूनही सहीसलामत सावरून बाबल्या म्हणाला "अगो कित्या नको ते गोळये खातस,आता जमानो बदाललो हा...असला काय पाळीत ऱ्हवाची गरज नाय"
आम्ही फक्त दोघांचा संवाद ऐकून बाबल्याच्या समंजसपणाचे कौतुक करण्याचे काम केले.

"बाबल्या"ची वाय फाय सेवा".....

"बाबल्या"ची वाय फाय सेवा"......

कणकवलीत राणेंची,सावंतवाडीत तेलींची आणि वेंगुर्ल्यात गावडे यांची "वाय-फाय"सेवा सुरु झाली आणि त्यावेळेपासून बाबल्याच्या डोक्यात वाय फाय चा किडा वळवळू लागला.मुळात इंटरनेट या विषयीत बाबल्या पूर्ण अनभिज्ञ होता पण कोणत्याही नवीन गोष्टीची त्याला प्रचंड जिज्ञासा आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे या सर्व प्रकाराविषयी त्याने माझ्याकडून लगेच माहिती घेतली.(अर्थात मला आहे तेवढी) माझ्या दृष्टीने वायफायचा तो विषय तिथेच संपला पण बाबल्याच्या सुपीक डोक्यात एका वेगळ्या कल्पनेने आकार घेतला.
बाबल्याचे सामायिक घर आहे आणि मोठा परिवार आहे पण सर्व मंडळी कामधंद्यानिमित्त मुंबई निवासी.चतुर्थी आणि मे महिन्याच्या सुट्टीत फक्त घर गोकुळ असते,बाकी शुकशुकाट.त्या घरातल्याच एका खोलीत हल्लीच बाबल्याने एक ब्याचलर भाडेकरू ठेवला आहे.चांगल्या हुद्द्यावर असल्याने त्याच्याकडे वायफाय सुविधा असलेले ब्रॉडब्यांड"कनेक्शन आहे,ज्याचा प्लान अनलिमिटेड सदरातला आहे.ही बातमी बाबल्याला समजली.
माझ्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे बाबल्याने भाडेकरूसोबत सेटिंग केले आणि चतुर्थीच्या काळात एक महिन्यासाठी ते आपल्या घरात वापरायला देण्याचे कबुल करून घेतले ज्याचे महिना बिल रुपये पाचशे पंचेचाळीस भाड्याच्या रकमेतून वळते करून घ्यायचे दोघांच्या एमओयु मध्ये ठरले.करार झाला आणि बाबल्याने ही गोष्ट आपल्या चाकरमान्यांकडे जाहीर करून टाकली,की यंदा चतुर्थीत सर्वांना माझ्याकडून मोफत वायफाय सेवा मिळणार.याचा परिणाम असा झाला की यंदाच्या चतुर्थीत त्याच्या घरी येणारया चाकरमानी मंडळीची संख्या त्यांच्या मुलाबाळांच्या येण्याने दुप्पट झाली.इकडे चाकरमानी मंडळी गावी आल्याआल्या बाबल्याने आपल्या नावाचा "पासवर्ड" सर्वांना देऊन टाकला आणि सर्व मंडळी खूष होऊन फेसबुक वाटसअप मध्ये गढून गेली.
पुढे बाबल्याच्या मोफत वायफाय सेवेची चर्चा आमच्या गावभर पसरली.संध्याकाळच्या आरतीला यायला कुरबुर करणारी पोरेटोरे आता बाबल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीला हजेरी लाऊ लागली.एक दोन आरत्या म्हणून त्यांना अपेक्षित असलेली"तसली भजने"डाऊनलोड करू लागली.बरीचशी अप्लिकेशन "अपडेट" करू लागली.
एकंदरीत एरव्ही सामसूमीत जाणारा बाबल्याचा "गणेशोत्सव"यंदा दणक्यात आणि त्याच्या कौतुकात संपन्न झाला तो केवळ मोफत वायफाय सेवा देण्याच्या फक्त ५४५ रुपयांच्या बाबल्याच्या आयडीयेनेच ......

Thursday, August 14, 2014

"वर्तमानपत्र"......

"वर्तमानपत्र"......


काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......

"मेस"……

"मेस"…… 


१९८८ ला आम्ही "शासकीय तंत्रनिकेतन,कोल्हापूर"ला प्रवेश घेतला. सुदैवाने हॉस्टेलही मिळाले आणि आम्ही हॉस्टेलच्या मेसचे मेंबर झालो.त्यावेळपर्यंत घरातला,नात्यातला की ओळखीचा कोणीच माणूस "मेस" या विषयातला अनुभवी नव्हता,त्यामुळे मेसबद्दल कमालीचे कुतूहल होते.पहिल्याच दिवशी पैसे भरताना मेसचे नियम सांगण्यात आले,त्यात जेवणाची वेळ,खाडे होणाऱ्या दिवसांची संख्या,गेस्टचा जादा चार्ज आणि "फिस्ट" बद्दलची माहिती होती.पूर्वसूचना देऊन केलेले तीन खाडे एकूण महिना रकमेतून वजावटीसाठी ग्राह्य धरले जाणार होते,तसेच पंधरवड्यातून एका रविवारी "फिस्ट" या सदरात दुपारी "स्पेशल जेवण" आणि त्याच संध्याकाळी मेसला "सक्तीची सुट्टी" असणार होती.
मेस सुरु झाली.पहिल्यांदाच जेवणाच्या हौलमध्ये गेलो आणि कोबीच्या भाजीचा उग्र वास नाकात भरला.किंबहुना कोबीच्या भाजीचा इतका भयानक वास येऊ शकतो हे त्यावेळी प्रथमच समजलं.पुढे त्याची सवय झाली कारण कोबीची भाजी वरचेवर ताटात असायची.भाजीला पर्याय म्हणून वरणात चपाती बुडवावी तर त्याने चपाती नुसती ओलीच व्हायची,ती काय मिठाच्या पाण्यात बुडवली असती तरी झाली असती.या व्यतिरिक्त न वेचलेल्या तांदळाचा कच्चा भात आणि सरसकट कच्च्या चपात्यांचीही "पचनसंस्थे"ला सवय होऊन गेली.त्याला कारणही तसेच होते,ते म्हणजे "मनीऑर्डर"ने येणारे नेमके पैसे.महिना मेसचे "एकशेऐंशी रुपये" पेड केल्यावर हाती शिल्लक राहिलेल्या पैश्यातून रोजचा चहा आणि कधीतरी "शामचा वडापाव" एवढंच कसंबसं "म्यानेज" व्हायचं.साधारणपणे बहुसंख्य हॉस्टेलवासीयांची हीच तऱ्हा होती.फारच कंटाळा आला तर एखाद्या मित्राच्या एसटीवरून येणाऱ्या घरच्या डब्यात भागीदारी करायची.पण ते फारच क्वचित घडत असे,कारण त्या मित्राला त्या एका डब्यात दोन वेळेचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करावा लागत असे. 
दहाबारा दिवसांनी कधीतरी तो पहिल्या "फिस्ट"चा रविवार उजाडला, आणि "स्पेशल मेनू" काय आणि कसा असेल याचा विचार करताकरता दुपार झाली.ताटात चपाती भातासोबत एक आमटीची वाटी होती ज्यात उकडलेलं एक अंड घातलेलं होतं.आमटीच्या पातळपणाचा "गुणधर्म" हा रोजच्या पातळ वरणालाही लाजवणारा होता.मग कोणीतरी "सिनिअर"ने "आयडिया" दिली आणि सर्वांनी अंड्याचा पिवळा भाग कुस्करून आमटीचा "थिकनेस" वाढवला,आणि रोजच्यापेक्षा एक चपाती जादा हाणली.असेच एखाद्या रविवारी "शाकाहारी फिस्ट" म्हणून थोडंस रंगीत गोड दुध मिळायचे ज्याला मेसचे मामा "बासुंदी" म्हणायचे.दिवस संपत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी "अंगवळणी" खरंतर "पचनी" पडत होत्या. 
दरम्यान कधीतरी कुणाला वरणात "झुरळ" आणि कुणाच्यातरी भातात "अळ्या" सापडल्या. त्यामुळे इतर ठिकाणी होतं तसं "मेस आंदोलन"ही करण्यात आलं.पण या आंदोलनाने "जेवणाचा दर्जा" सुधारण्याच्या ऐवजी आम्हां "आंदोलनकर्त्यांचा दर्जा" मात्र रेक्टर आणि प्राचार्यांच्या नजरेत घसरला.नंतर या मेसचा नाद सोडला आणि गावातली "मेस" सुरु केली.तिथेही एक बदलली,दुसरी लावली,तिसरी सोडली मग चौथी .... "सिलसिला" सुरूच राहिला.
सरतेशेवटी एक लक्षात आले की सगळ्या मेस मालकांची "शाळा" एकच असावी.पुढे वाढत गेलेला "अभ्यास" आणि "एटीकेटी" सारख्या नवनवीन त्रासांनी त्रस्त झाल्याने गावात जेवणासाठी जायला वेळ पुरेना,परिणामी उदरभरणासाठी पुन्हा हॉस्टेलचा "मामा"च... तीन वर्ष पूर्ण झाली.शिव्याशाप दिलेल्या मेसच्या मामालाच शेवटचा "साष्टांग नमस्कार" करून ब्याग उचलली.....ते थेट गावाकडे व्हाया राधानगरी..........
आता आमच्या घराशेजारीच "इंजीनिअरिंग कॉलेज" सुरु झालंय.बरेचजण सुचवतात की "खाजगी हॉस्टेल" आणि "मेस" सुरु कर...बऱ्याचदा विचारसुद्धा येतो मनात,पण पुन्हा ते मुलांचे "शिव्याशाप"आठवतात आणि विचार आपोआप बदलतो.......

"बाबल्याचो सत्कार".....

"बाबल्याचो सत्कार".....


दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीला "तंटामुक्ती"चा विशेष पुरस्कार मिळाला.पुरस्काराच्या तीन लाख रकमेच्या विनियोगावरून गावातल्या सत्ताधारी आणि विरोधी अश्या दोन पक्षात इतके "तंटे" उदभवले होते की त्यांचे निवारण झाल्यावर खरंतर सरकारने गावला आणखी एक पुरस्कार द्यायला हवा होता.कोणतेही इतर विकासकाम न करता सदरच्या निधीतून फक्त विविध "सत्कार समारंभ" करण्याच्या अटीवर आमच्या एका ग्रामसभेने "तंटामुक्ती समितीला" निधी खर्चाची परवानगी दिली होती,परिणामी तेव्हापासून गावात "सत्कार सोहळे"सुरु झाले.त्यामुळे आतापर्यंत या ना त्या निमित्ताने गावातील सुमारे नव्वद टक्के नागरिक "शाल श्रीफळ"योजनेचे लाभार्थी झाले आहेत.आता सत्कारापासून वंचित असलेली दहा टक्के जनता लवकरात लवकर "सत्कारमूर्ती"व्हावीत व या झंझटीतून आपली लवकर मोकळीक व्हावी यासाठी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रयत्नशील आहेत आणि सत्कारासाठी वेगवेगळे फंडे शोधत आहेत.
या "सत्कारवंचित" यादीत आज सकाळपर्यंत आमचा "बाबल्या"सुद्धा होता.अनेकांचे विनाकारण झालेले सत्कार बाबल्याने याच देही याच डोळी न चुकता अनुभवलेले होते.सर्वांसमक्ष आपल्याही गळ्यात पंचायतीची शाल पडावी अशी त्याचीही इच्छा होती.आणि तंटामुक्ती अध्यक्षांच्या कल्पकतेने आज ती फलद्रूप झाली.
आज तेरा ऑगस्ट "जागतिक डावखुरा दिन" ....या दिवसाचे औचित्त साधून ग्रामपंचायतीने गावातील सर्व डावखुऱ्या मंडळींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.बारा जणांच्या सत्कारमूर्ती यादीत "बाबल्या"चे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
बाबल्या तसा "कट्टर डावखुरा" होता,कारण जेवण्यापासून सगळीच कामे तो डाव्या हातानेच करायचा.आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या घरी ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्याने "सन्मानाचे निमंत्रण"घेऊन स्वतः ग्रामसेवक भाऊ गेले होते.त्यामुळे तो भलताच खूष होता.बऱ्याचदा चेष्टेचा ठरणारा डावा हात इतकी मोठी संधी देईल याची त्याला खरंतर कल्पनाच नव्हती.
बारा सत्कारमूर्तीमधून सातजणचं उपस्थित होते.बाकीचे बहुदा "उभयकर"असल्याने त्यांनी सत्काराकडे पाठ फिरवली असावी असे समजून नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सुरु झाला.नेहमीपेक्षा आजची कार्यक्रमाची उपस्थिती फारच चांगली होती,कारण यापाठी बाबल्याची मोठी मेहनत होती,त्यामुळे डावखुऱ्या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून त्याला व्यासपीठावर स्थान मिळाले.डाव्या हाताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचे दिपप्रज्वलन सर्वांनी डाव्या हातानेच केले.कार्यक्रम सुरु झाला.सर्वप्रथम सर्व डावखुऱ्या व्यक्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि फोटोसेशन झाले मग एकेक करून वक्ते माईकचा ताबा घेऊ लागले.
ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्रीय असतो अशी माणसे डावखुरी असतात असे कोणीतरी म्हणताच बाबल्याने डोक्याच्या उजव्या बाजूवरुन अभिमानाने हात फिरवला.कुणीतरी डावखुऱ्या व्यक्तीविषयीचे समज गैरसमज यावर तत्वज्ञान पाजळले.तर कुणीतरी त्याची जागतिक आकडेवारी जाहीर केली.जगात दहा टक्के लोक डावखुरे आहेत हे ऐकून बाबल्याबरोबरच इतरांनाही आपण "अल्पसंख्यांक"नसल्याचा साक्षात्कार झाला.सरते शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंचानी जगातल्या अनेक प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची नावे सांगितली,पैकी अमेरिकेचे बराक ओबामा,आपला अमिताभ आणि सौरभ गांगुली यांची नावे सोडून इतर नावे कोणालाच समजली नाहीत कारण अध्यक्षांकडून त्या अवघड इग्लिश नावांचे उच्चार आणि नावे-आडनावे एकमेकात बेमालूमपणे मिक्स झाली होती.फक्त अमेरिकेचे बरेच अध्यक्ष हे डावखुरे होते हे समजल्यावर आपण इंडियात जन्मलो ही (आईबाबांची) मोठी चूक झाल्याचे बाबल्याने अनेकांजवळ बोलून दाखवले.आभाराच्या भाषणाने कार्यक्रम संपला.डाव्या हाताने प्लेट मधला चिवडा खाताखाता बाबल्याने हळूच अध्यक्षांना विचारले,
"अध्यक्षानु...आता "पायाळू"लोकांचो सत्कार कधी?....नाय ..माझे दोनव झील "पायाळू"आसत म्हणान इचारलयं"..
आणि तंटामुक्ती अध्यक्षांना सत्कारासाठीचा "नवीन" विषय मिळाला.....

Sunday, August 10, 2014

"वटपौर्णिमा"



वटपौर्णीमेचं वाण,
आज वडाला मोठा मान,
सात जन्म सोबतीची देवादिकांना आण, 
दिवसभराच्या उपवासाचा सावित्रींवर ताण,
किमानपक्षी याची तरी तमाम सत्यवानानी ठेवावी जाण.......




"जुळून "आलेला सह"योग".....

"जुळून "आलेला सह"योग".....

खेड्यातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात बापडा"गरजवंत"दडलेला असतो आणि दूर शहरात कुठेतरी एखादा "दाता"असतो,ज्याचे 'दातृत्व"या दडलेल्या "याचका"पर्यंत पोहोचविण्यासाठी एक सक्षम आणि विश्वासू यंत्रणा कार्यान्वित असावी लागते. आणि आज आनंदाने म्हणावे लागेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी "भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान"च्या रूपाने अशी यंत्रणा "जिवंत"आहे.
पुणे येथील "सेवा सहयोग"ही संस्था दरवर्षी गरीब शालेय विद्यार्थ्यांना हजारो दप्तरांचे वाटप करते."भगीरथ"च्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यात सुमारे चारशे दप्तरांचे वितरण करण्यात आले.
आमच्या प्राथमिक शाळेसाठी हा सह"योग"जुळून आला तो "भगीरथ"च्या प्रसाद देवधर यांच्यामुळे .जिल्हा माहिती अधिकारी श्रीम.संध्या गरवारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न झाला.
आमच्या दृष्टीने तासभरात हा कार्यक्रम संपला पण दप्तर मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारी ही "सामाजिक बांधिलकी" त्यांच्या चिमुकल्या पाठीवर पुढे कित्येक दिवस मिरवणार आहे.

"पावस"

मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?……
दुसरा नक्षत्र संपत इला तरी,
बांडूक आजून आरडाक नाय…
चढणेक मासे चढाक नाय….
कोके सुद्धा उमळाक नाय…. 
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?……
छत्री खयं उघडाक नाय …
कांबळी,इरली भिजाक नाय…
भाताच्या लावणेक पाणी नाय….
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?…
गुदस्तासारखो यंदा कुडकुडो नाय.....
झापाखालचा तलाग कोणी मारूक नाय .....
कुळदाच्या निस्त्याकाक आजून चवच नाय...
मिरगाचे कुर्ले खय नाटीक नाय....
मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?...

"सौभाग्य" व "ती"

"सौभाग्य" व "ती"
परवा कामानिमित्त पुण्याला निघालो होतो.अर्थात सकाळची वेळ होती.घरापासून साधारण दहा किलोमीटर अंतर कापले असेन आणि ओसरगावच्या विठ्ठल मंदिराजवळ पोहोचलो.मंदिराच्या थोडसं म्हणजे चार पावलं पुढे गेलो आणि एक विलक्षण दृश्य नजरेस पडलं......
हायवेच्या कडेला डावीकडच्या फुटपाथवर एक मनोरुग्ण स्त्री बसली होती.साधारणता चाळीशीची असावी.तिच्या समोर एक गाठोडं होते आणि एका हातात स्टीलची छोटीशी प्लेट होती,जी तिने आरशासारखी चेहऱ्यासमोर धरली होती.ती काय करते हे पाहण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला आणि फोटो घेण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला तेवढ्यात तिने उजव्या हाताने गाठोड्यातून कुंकू घेतलं आणि कपाळावर लावलं.प्रयत्न करूनही हे दृश्य मला टिपता आले नाही.लगेच तीही गाठोडं उचलून मार्गस्थ झाली
अत्यंत भावनिक असे ते दृश्य होते.माझ्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला पिवळसर लाल रंगातून सुर्यनारायण आगमन करत होते आणि त्याच्याच साक्षीने डाव्या बाजूला ही दुसरं कसलंच भान नसलेली स्त्री अगदी बेभान होऊन आपलं सौभाग्य मस्तकावर कोरत होती.मनाच्या याही अवस्थेत हा नेमाचा दिनक्रम कुठला हे मलासुद्धा समजेना.
गाडीने वेग घेतला तसा असंख्य विचारांनी सुद्धा....
नक्की हे सौभाग्य तिच्या दृष्टीने काय असावं ? आजची तिची स्थिती ही त्या सौभाग्याच्या संदर्भाने आहे की कसे? ज्याच्या नावाने हे सौभाग्य ल्यावे अशी मनोकामना असताना त्याने नाकारलं म्हणून की ज्याने स्वीकारलं त्याने अर्धवट सोडलं म्हणून?की आणखी काही......
कुठल्याच तर्कापर्यंत पोचता येईना....
सारेच अतर्क्य .......

"टिफीन"......

"टिफीन"......
शाळेत किवा कामावर टिफीन घेऊन जाणे,या गोष्टीबद्दल मला फार आकर्षण आणि कुतूहल आहे.याचं कारण असं की असं सुख मला कधीच मिळालं नाही.(अर्थात ज्यांना ही संधी मिळाली आहे,ते याला "सुख" म्हणतात की "भोग"म्हणत असावेत हे त्यांचे त्यांनाच माहित)
आमची शाळा दुपारची होती त्यामुळे जेवण आटोपून शाळेत जात असू नंतर कॉलेज जीवनातही मेसचा "खुराक" हा सकाळी दहालाच मिळायचा आणि दुपारची भूक श्यामचा वडापाव शमवायचा.पुढे कुठेतरी एखादी नोकरी मिळेल आणि बायकोच्या हातचा "डबा"मिरवत "दहा ते पाच" करता येईल या आशेवर होतो पण तेही नशिबात नव्हतं.
स्वतःचा व्यवसाय सुरु झाला आणि मग जेवणाच्या वेळा आणि ठिकाणे या दोन्ही गोष्टी अनिश्चित झाल्या.त्यामुळे कधी घरी येऊन जेवण आटोपून डुलकी मारायची संधीसुद्धा मिळते तर कधी चार चार दिवस पोटापाण्याची सोय हॉटेलवालेच करतात.
परिणामी रोज "टिफीन"सोबत न्यायची संधी अजून तरी मिळाली नाही.पुढेही शक्यता कमीच आहे.
ही डब्याची हौस भागवायची म्हणून मग मी आमच्या कोकण रेल्वेप्रवासात फारशी गरज नसतानाही (कोकणकन्या गाडीत चांगला मेन्यू असतो)"टिफीन"घेऊन जातो.अश्या प्रकारे डब्यातल्या नेमक्या चपाती-भाजीची सवय नसल्याने कधी भाजी लवकर संपते आणि चपाती उरते तर कधी उलटही होते,पण चारचौघात घरचा डबा उघडून खाण्याची हौस मात्र नक्की फिटते.....

"आठवणी छत्रीच्या."....

"आठवणी छत्रीच्या."....
मला वाटतं प्रत्येकाचं छत्रीशी एक विशिष्ट असं नातं असतं.त्यात करून कोकणातल्या माणसाचं तर खासमखास.....
लहानपणी छत्रीविषयी असलेलं कुतूहल पुढे शाळेच्या दिवसापासून मैत्रीत परावर्तीत होतं,त्यामुळे छत्रीच्या अश्या काही खास आठवणी प्रत्येकाजवळ असतात.
आमच्या लहानपणी नवीन छत्री वापरण्याचा योग काही आला नाही.कोणीतरी चाकरमान्याने दिलेली जुनी छत्री पुढे बरीच वर्षे ठिगळ लावून आम्ही आपलीशी केली होती अर्थात तेव्हाच्या छत्र्या हुकासारख्या विशिष्ट अश्या लांब दांड्याच्या असायच्या,त्यातली एखादी सरळ तीरांची तर एखादी कमळाचा आकार होणाऱ्या तीरांची असायची. तिला कॉटनसारखे दिसणारे जाड कापड असल्याने ठिगळ लावणे सोपे असायचे.बालसुलभ वयामध्ये छत्रीच्या माध्यमातून जितके म्हणून उपद्व्याप
करता येतील तितके आम्हीसुद्धा केले.मग त्यात एकमेकाच्या छत्रीवर छत्रीचे तीर मारून भोकं पाडणे,वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला छत्री धरणे आणि त्याची डिश करणे,छत्रीच्या दांड्यात दप्तर अडकवणे इत्यादी,या सर्वाचा अंतिम परिणाम अर्थातच छत्री मोडण्यात व्हायचा.मग अश्या जुन्या मोडलेल्या अनेक छत्र्यांचे अवयव जोडून वडीलधारी मंडळी पुन्हा एका नव्या छत्रीला जीवदान द्यायचे.कपड्यावर ऑईल पेंटने नाव घालून साहजिकच तिची मालकी पुन्हा आमच्याकडे यायची,दरम्यान याला पर्याय म्हणून एकदा रेनकोट वापरण्याचा प्रयत्नसुद्धा अनुभवला,पण पहिल्याच दिवशी शाळेच्या व्हरांड्यातल्या दांडीवरून रेनकोट ओढताना त्याच शीर धडावेगळ झालं आणि पुन्हा तीच छत्री हातात आली.
पुढे कधीतरी छोट्या दांड्याची फोल्डींगची छत्री आली,आणि कपड्यावर नाव रंगवायचची स्टाईल जावून दांड्यावर (मुठीवर) नावाचे स्टीकर चिटकवायची स्टाईल आली.अश्या छत्रीत कुणालातरी एका सरीपुरता आधार दिल्याची तर कुणीतरी तो आधार सन्मानाने नाकारल्याची आठवण जवळपास सगळ्यांकडेच असेलच,आमच्याकडेही आहे.त्याच बरोबर कुणासाठी तरी आपल्या नसलेल्या स्टौपवर गडबडीत उतरताना अश्या छत्र्या एसटीच्या कॅरिअरवर विसरण्याच्या आठवणीही आहेत.पावसाळा संपल्यावर छत्रीच्या दांड्याला तेल लावून माळ्यावर ठेवण्याची पद्धत आमच्या कोकणात आहे.अश्या छत्रीने पुढच्या वर्षी नव्याकोऱ्या शर्टाचा केलेला सत्यानाश सुद्धा आठवणीतून जात नाही.यापलीकडे जावून कोणी परिचिताने नेलेली छत्री पुन्हा परत न दिल्याचे अनुभवही आठवणीच्या कप्प्यात आहेत.

"बदललेली भूमिका"........

"बदललेली भूमिका"........
गेले आठ दिवस आमच्या घरात बरीच लगबग सुरु आहे.ती अजून पुढचे पाच सहा दिवस चालेल.सणवार नसूनही घरात रोज वेगवेगळ्या आवडीच्या पदार्धांची रेलचेल त्याबरोबरच सामानाची आवराआवर करणे हेही सुरु आहे.
निमित्त आहे आमचे चिरंजीव पुण्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निघालेत.
ही गडबड पाहून पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला हॉस्टेलवर राहायला निघालो होतो ते दिवस आठवले.आत्ताच्या आणि तेव्हाच्या तयारीमध्ये थोडासा फरक नक्कीच आहे परंतु दोन्हीवेळच्या भावना अगदी सेम टू सेम आहेत.
आता मुलाने अमेरिकन टुरिझम ची ब्याग भरली आहे,आमची तेव्हा पत्र्याची ट्रंक होती,फुलाफुलाची....आता शूज,स्यांडल,स्लीपर असा सेट सोबत आहे तर आमच्याकडे "पायल"ब्रांड स्लीपरच होती.आताच्या पाचसहा रेडीमेड ड्रेसच्या जागी आमच्या टेलरने जमेल तसे शिवलेले प्युअर टेरीकॉटचे दोन नॉन म्याचींग ड्रेस होते.कॉटवरची सतरंजी हीच आमचा मऊशार बेड होता.तेव्हा सोबत आईने दिलेले चण्याचे लाडू,आणि गावठी पोहे यांचा डबा आता बेसन लाडू आणि चिवड्याने भरला आहे.घरी ख्यालीखुशाली कळवायला आम्ही दहाबारा पोस्टकार्ड सोबत घेतली होती त्याची आता गरज आणि सवयचं राहिली नसल्याने मोबाईल पुरेसा आहे.हातखर्चा साठीची तेव्हाची चिल्लर आता एटीएम मधून थेट निघणार आहे.बाकी छोट्यामोठ्या वस्तू त्याच आहेत फक्त ब्रांड बदलले आहेत.
हे झालं सामानाच्या बाबतीत पण आई आज्जीचा जीव तसाच आहे अगदी काळजीतला,जो प्रत्येक घरात असतो.यात एक मात्र विशेष करून जाणवलं अश्यावेळी सगळीकडे असंच म्हणतात की "आता आई,बहिण आणि आजीला करमणार नाही,आठवण येईल वैगरे वैगरे" यात बाबाचं नाव कुठेच येत नाही.पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी याची तीव्रता जाणवली नव्हती,पण आता मात्र बदललेल्या भूमिकेतून प्रकर्षाने जाणवतेय ...

"ऋणानुबंध"......

"ऋणानुबंध"......
आयुष्यात एकूण दोन ठिकाणी थोडी थोडी नोकरी केली.त्यातले नोकरीचे पहिले ठिकाण होते "डिंभे धरण".इंजिनीअर झाल्या झाल्या डिंभे धरणावर साईट इंजिनीअर म्हणून जॉईन झालो ते साल होतं ब्याण्णव.नवभारत बिल्डर्स कोल्हापूर यांची ती फार मोठी साईट होती.उण्यापुऱ्या वर्षभराच्या तिथल्या वास्तव्याच्या खूप आठवणी अजून ताज्या आहेत.त्यातल्याच अनेक आठवणी कालच्या "माळीण"दुर्घटनेमुळे ताज्या झाल्या.डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या माळीण सारख्या तिथल्या अनेक गावांनी तेव्हा आपलं गाव सोडलं नव्हतं.धरण कामाच्या अनुषंगाने तिथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या होत्या.त्यामुळे कोणी सुपरवायझर,कोणी ड्राईव्हर तर अनेक पुरुष आणि महिला मंडळी मजुरीच्या कामासाठी येत होती.पुनर्वसनाच्या कामापैकी रस्ते आणि मोऱ्या यांचे बांधकाम सुरु असताना माझ्या साईटवर तिथली स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने होती.सर्वचजण खूप प्रेमळ आणि प्रामाणिक माणसे होती.एकदोनदा परतीची गाडी चुकल्याने त्या वस्तीत राहण्याचा योग आला.तेव्हा आंब्याचा सिझन होता त्यामुळे रात्री साहेबांसाठी खास आमरस पुरीचा बेत आमच्या कामगार मंडळीनी आखला होता तो आज पुन्हा आठवला.एरव्ही तिथे खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्रसंगी कामगार मंडळींची भाजी भाकरीसुद्धा खाल्ली होती,तिथल्या एकदोन कामगार मुलींच्या लग्नात मला मिळालेली टौवेल टोपी आज पुन्हा आठवली.अश्या गुणी माणसांवर काळाचा घाला आला हे ऐकून फारच अस्वस्थ व्हायला झाले.आज आपल्यात नसलेल्या माळीण गावच्या सर्व ज्ञात अज्ञात मंडळीना भावपूर्ण श्रद्धांजली....

"मैत्रीदिन"

"प्रिय मैत्रीणीस"........
मित्र"यादी" तशी फार मोठी आहे.साधारण आठवतंय तिथून म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात ज्यांच्याशी मैत्री झाली ती आजपर्यंत "जपली" आणि "फुलवली" सुद्धा....
ह्या मैत्रीच्या "ओघात" आणि "नादात" बऱ्याचदा माझ्या एका "खास मैत्रिणी"कडे दुर्लक्ष झाल्याचेही कधीकधी जाणवलं.पण नाविलाज होता...अर्थात तिचा मोठेपणा हा की, "ती"सुद्धा कधी आमच्या घराबाहेरच्या "मैत्री"आड आली नाही,त्यामुळे आजच्या मैत्रीदिनी या खास मैत्रिणीस खास शुभेच्छा.....!




"बाबल्याचो श्रावण"……

"बाबल्याचो श्रावण"…… 


"संकल्प करणे" आणि "संकल्प सोडणे" ह्या दोन बाबी जरी एकच असल्या तरी श्रावणाच्या बाबतीत मात्र या दोन विरुद्ध बाबी आहेत. बरेचजण "श्रावण"पाळण्याचा "संकल्प करतात" आणि आपल्या सोयीनुसार संधी शोधून एखाद्या कडव्या वारी तो "संकल्प सोडतात"
आमचा "बाबल्या"सुद्धा या बऱ्याच जणांपैकी एक. 
"यंदा श्रावण पाळतलयचं"असा दृढ निश्चय तो दरवर्षी करतो,पण अजूनतरी त्याचा संकल्प सिद्धीस गेलेला कोणाच्या ऐकिवात नाही. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करायला मिळणार नाही या सबबीवर आधीचे अख्खे दोन महिने तो शाकाहारी जेवणाला स्पर्श सुद्धा करत नाही.यंदाही आधीचे दोन महिने त्याने कोंबड्या बकऱ्यावरच घालवले. यावर्षीचा श्रावण सुरु झाला पण इथल्या काहींच्या पद्धतीने रविवारचा पहिला दिवस त्याने "धोंड दिवस" म्हणून पुन्हा मांसाहारावर ताव मारला. आणि सोमवारपासून त्याचा अधिकृत श्रावण सुरु झाला,मंगळवार नंतरचा बुधवारही बाबल्या शाकाहारी राहिला त्यामुळे त्याच्या संकल्पाच्या चर्चा आमच्या नाक्यावर सुरु झाल्या.बाबल्याचा पाळलेला श्रावण आता किती मोठा होतो हे औत्सुक्य मात्र जास्त दिवस टिकलं नाही. नागपंचमीला मुंबईवरून आलेल्या एका चाकरमान्यासोबत शनिवारी गुपचूप एका धाब्यावर बाबल्या चिकन तंदुरी सोडवत होता. आणि नेमका हाच सीन बाबल्याच्या एका सो कॉल्ड मित्राने पाहिला.ज्याचे वर्षभर दारू मटक्यासारखे अनेक काळे धंदे चालतात पण तो दरवर्षी श्रावणात न चुकता कडक उपवास,पारायणे,शिर्डीवारी वैगरे करतो.बाबल्याची खेचण्याच्या उद्देशाने तो म्हणाला.
"काय मेल्या बाबल्या,तुका श्रावण बिवण काय हा की नाय… काय सगळाच सोडलस"….
आता बाबल्याचा श्रावण तर सुटलाच होता पण चारचौघात मित्राची अब्रू काढण्याची संधी त्याला सोडायची नव्हती,तो हजरजबाबीपणे उत्तरला…
"श्रावण बिवण तुमच्या सारख्या असुरांका…. पूर्वीच्या काळी असुर सुदा असाच करीत,थोडे दिवस कडक जपतप,उपासतपास करीत आणि एकदा काय देव पावलो की जगाक नाडूक,उच्छाद मांडूक मोकळे…. तेतलेच तुम्ही"….

"आश्वासक".....

भारतीय जनता पार्टी,सिंधुदुर्गचा सुमारे पंधरा वर्षाचा प्रवास,त्यातले चढउतार जवळून पाहाताना गेल्या सोमवारचा दिवस फार आनंददायी असा भासला.त्यादिवशीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्ह्यातल्या सुमारे पाचपन्नास सक्रीय कार्यकर्त्यांचा पक्षात झालेला प्रवेशसोहळा पदाधिकारी आणि जुनेजाणते कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवणारा असा होता.मोदी साहेबांच्या रूपाने भारताला एक न भूतो न भविष्याती असा पंतप्रधान मिळाल्यावर देशातील तमाम नागरिकांमध्ये एक चैत्तन्य पसरले असून त्यांच्या इतकी वर्षे दबलेल्या आणि मेलेल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.आणि एक कार्यकर्ता म्हणून नक्की हा विश्वास आहे की देश,राज्य आणि जिल्हा पातळीवरील सर्व भाजप कार्यकर्ते आता राजकारणापलीकडे जाऊन शाश्वत असे काम उभे करतील.
याचाच एक भाग म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी कालच्या बैठकीत विविध विषयातल्या तज्ञांना खास मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते.त्यात जिल्ह्यात ग्रामविकासाचे चांगले काम उभे करणारे डॉ.प्रसाद देवधर,कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव,मच्छिमार कृती समितीचे विकी तोरस्कर,सोशल मिडिया मार्गदर्शक खानोलकर या मंडळीनी कार्यकर्त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सध्याच्या भाजप टीममधील बरेचसे पदाधिकारी हे युवामोर्चाच्या "अतुल टीम" मधील असून पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आणि आमदार प्रमोद जठार,माजी आमदार अजितराव गोगटे आणि इतर जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कार्यरत आहेत.आशा करू की यापुढे असेच पक्षप्रवेश घडत राहतील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील संघटन हे जिल्ह्यातल्या इतर पक्षांना केवळ संख्यात्मक दुष्ट्या नव्हे तर गुणात्मक दुष्ट्या सुद्धा "ओव्हरटेक"करून पुढे जाईल......

"राखी"

आज whatsApp वर आमच्या "सावंत" ब्रांडच्या "राखी"चे जोरदार "प्रमोशन" सुरु होते.

"वर्तमानपत्र"......

"वर्तमानपत्र"......

काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......

Friday, June 27, 2014

"अब की बार …

"अब की बार …… 
........मोदी सरकार"

देशभरातल्या जनमनावर,
आता मोदींची आहे छाप…. 
त्यांचा पाठलाग करताना,
काँग्रेसलाही लागलीय धाप…
नमोंच्या या झंझावातात,
पुरा हरवून गेलाय आप…
नेहमीच्या उपद्रवी पक्षांना,
चांगलाच बसलाय चाप…
चांगल्या संख्याबळाने,
एनडीए ओलांडणार सत्तेचे माप…

बाप्पा मतदाता


आता तरी देवा मला पावशील का?
मत कुणा द्यायचं ते सांगशील का?

काँग्रेस ची राहिली नाही जुनी तळमळ,
भ्रष्टाचारात बुडली त्यांची सारी पिलावळ… 
पुन्हा संधी देऊन चांगले वागतील का?
गरीबाला दोन घास मिळतील का?

दिले निवडून जरी अमुचे मोदी,
बोलतात तसे वागतील कारे पदोपदी…. 
यंदा तरी म्याजिक फिगर गाठतील का?
फिलगुड ज्याला म्हणतात ते दावतील का?

अशा दाखवून आप दूर पळतो
आमआदमी कडून त्याला मार मिळतो….
आता तरी संयमाने वागतील का?
सत्तेत येउन पन्नास दिवस थांबतील का?

"सुट्टी उन्हाळ्याची"……

"सुट्टी उन्हाळ्याची"…… 
उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की मोठ्या शहरांप्रमाणे आमच्या कोकणातही हल्ली मुलांसाठी वेगवेगळी शिबिरे सुरु होतात. मग आमचे पालकही दहा पंधरा दिवसांच्या त्या शिबिरांमध्ये आपल्या लाडक्यांना "शिबिरार्थी" म्हणून दाखल करतात आणि मुलांप्रती मोठे कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात असतात. जी मुले शिबिरांमध्ये जात नाहीत ती फारतर काका मामांकडे जातात कीवा मोबाईल गेम आणि टीव्ही समोर रमतात.(आमचीही मुले याला अपवाद नाहीत) खरंतर कोकणच्या दृष्टीने ही उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांना निसर्गाशी मैत्री करण्याची सुसंधी देणारी असते.
काही वर्षांपुर्वीपर्यंत मुले या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असत. मात्र दुर्दैवाने आता ती स्थिती राहिली नाही.राहतो त्या वाडीत एखादी दाट झाडी पाहून तिथे स्वतः एखादी झोपडी उभारायची, त्यात दिवसभर वेगवेगळे खेळ खेळायचे,एखाद्याच्या वडीलांची जुनी पुरानी सायकल आणून पाळीपाळीने सगळ्यांनी रपेट मारायची,मध्येच जवळच्या आंब्यावर दगड मारून पिकलेले आंबे पाडायचे.पिकलेल्या आंब्यांसोबत पडलेल्या कच्च्या कैऱ्यांची मस्त "खिरमट"बनवायची.त्यासाठी लागणारे मीठ आणि गुळ घरातून गपचूप आणायचे,प्रसंगी घरातून ओरडून घ्यायचे. संध्याकाळच्या वेळी करवंदीच्या काट्याकुट्यात फिरायचे आणि यथेच्छ करवंद खायची. त्यावेळी पायात घुसलेला काटा दुसऱ्या काट्याने अलगद काढायचा.
मोठ्यांची नजर चुकवून जांभळीच्या झाडावर चढायचे कीवा पडलेली जांभळे गोळा करून मीठ लावून खायची या धावपळीत कपड्याची निळी रंगपंचमी ओघाने यायचीच त्याची मज्जा आणि वेगळीच,अश्याप्रकारेच चारांच्या बिया वेचून आणायच्या त्या फोडून बरणीत भरून पुढची बेगमी करायची,
आंब्या काजूच्या डीन्काने हात खराब करायचे,त्या डीन्काची चेहऱ्यावर,हातापायावर एखादी खुण राहील याची सुद्धा तजवीज या उपद्यापातून करायची,पाणी आटत आलेल्या एखाद्या डबक्यातल्या चिखलातून मित्रांबरोबर मासे पकडायचे आणि पानातून आपला वाटा घेऊन घरी मोठ्या रुबाबात यायचे. असे नानाविध प्रकार त्यावेळी चालत असत आणि मुलांना निसर्गाशी एकरूप होता येत असे.
आता खरोखरच हे सर्व शिकण्यासाठी किवा अनुभवण्यासाठी या प्रकारचे एखादे "शिबीर"आयोजित करावे लागेल की काय अशी शंका येते.


"वाढदिवस"……

"वाढदिवस"…… 
मित्रानो,आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पोहोचले,त्यासाठी सर्वांना धन्यवाद…!
माझा यावर्षीचा "वाढदिवस" फारच अविस्मरणीय म्हणावा असा साजरा झाला. मे महिन्यातला वाढदिवस असल्याने शाळा कॉलेजात कधी साजरा करता आला नव्हता,पण योगायोगाने यावर्षी आदल्याच दिवशी आमच्या दहावी ब्याचचे मुंबईत गेट टुगेदर होते त्याठिकाणी वर्गमित्रांनी धूमधडाक्यात वाढदिवस सेलेब्रेट केला.त्याचप्रमाणे गावात सुद्धा मित्रमंडळीनी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत "केक"कापण्याचा कार्यक्रम पार पाडला आणि हृद्दय सत्कार केला.या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप मोठं 'सरप्राईज' अश्या होत्या सोबत आपणा सर्वांच्या शुभेच्छा….
बेचाळीसाव्या वर्षातले पदार्पण अश्या तऱ्हेने खूप सुखावह झाले…….
धन्यवाद ….!



"गड्या अपुला गाव बरा"……

"गड्या अपुला गाव बरा"…… 
परवा मुंबईत गेलो होतो तेव्हा एक मित्र म्हणाला "प्रभाकर,तू पुण्या मुंबईत असतास तर यापेक्षा डेव्हलप झाला असतास" त्याच्या लेखी असणाऱ्या त्या "डेव्हलपमेंट"च्या व्याखेने मनातल्या मनात हसू आलं आणि बावीस वर्षापुवीचा निर्णय आठवला… जो माझ्यादृष्टीने बरोबर होता आणि अजूनही आहे… 
माझे माध्यमिक आणि अभियांत्रिकी शिक्षण तसे शहरात पूर्ण झाले. पुढे शहरातच नोकरीची संधी मिळाली,पण मन रमले नाही. सल्ला घ्यावा असं समोर कुणीही नव्हतं,मग मागचा पुढचा काहीही विचार न करता थेट गावाकडे आलो.स्वत:चा व्यवसाय सुरु केला,सुदैवाने फार मोठा नाही पण सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील अश्या बेताने व्यवसाय सुद्धा बहरला.
जेव्हा कधी व्यावसायिक अडचणी आल्या तेव्हा मात्र शहरात स्थायीक असलेल्या मित्रांचा हेवा वाटू लागायचा आणि आपण शहरात असतो तर असं झालं असतं वैगरे वैगरे कल्पना मनात घर करायच्या,पण त्या तेवढ्यापुरत्याच,त्यांनी कधी फारसं अस्वस्थ होण्याची वेळ आली नाही.
इथे व्यवसायाला अडचणी आणि मर्यादा होत्याच पण काम करण्यासाठी इतर आवडती क्षेत्र मात्र खूप होती ज्यांच्यावर शहरात कदाचित मर्यादा पडल्या असत्या. धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,साहित्यिक अश्या अनेक क्षेत्रात इथे खूप संधी मिळाल्या. आणि खऱ्या अर्थाने आनंदात जगता आले.
परंपरेने चालत आलेल्या शेती व्यवसायाचा वारसा आई बाबांमुळे पुढे चालू आहेच,शेतातले घर,गुरढोरांचा गोठा,अंगण,परसदार याबरोबरच स्वतःच्या शेतात पिकवलेला तांदूळ, कडधान्ये,ताज्याताज्या भाज्या,दुधदुभतं आणि थोडीफार आंबा,काजू आणि नारळाची बागायती या सर्व गोष्टी मनापासून एन्जॉय करता आल्या त्या केवळ गावात वास्तव्य केल्यामुळेच. यामुळे शहरात राहून काय उजेड पाडला असता याला काहीच अर्थ उरत नाही.
सोयीसुविधांच्या बाबतीत सुद्धा खेडी आता मागे राहिली नाहीत,आता बाजारातली प्रत्येक गोष्ट जीवनावश्यक झाली आहे आणि ती छोट्या छोट्या खेड्यातही उपलब्ध होत आहे त्यामुळे गैरसोयीचा प्रश्नही निकाली निघतो.
म्हणूनच आजच्या माझ्या तरुण मित्रांना आवर्जून सांगावेसे वाटते की शक्यतो शहराचा आग्रह सोडा आणि इथे संधी निर्माण करा.त्यासाठी जाणीवपूर्वक अभ्यासक्रम निवडा. आर्थिक स्तर आणि राहणीमानात थोडेसे उन्नीस बीस होईल पण इथे जगण्याचा आनंद मात्र शंभर टक्के मिळेल….
आम्ही वीस बावीस वर्षापूर्वी निर्णय घेतला तो चुकल्याचे अजिबात वाटत नाही…… तेव्हा तुम्हीही ……

कबीर

मनुष्य बलवान नाही होत,समय होत बलवान… 
भिल्लन लुटी गोपिका सारी,वही अर्जुन वही बाण…! संत कबीर 

आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा काहीसा अपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित निकाल जाहीर झाला आणि कबिरांचा हा दोहा मला आठवला,जो मी वपुंच्या साहित्यात वाचला होता. आधी हा दोहा स्पष्ट करतो मग आपण याचा आणि निकालाचा संबंध पाहू.
अर्जुन आणि कृष्णाचं नातं आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.कृष्ण अर्जुनाचा सारथी,सखा, मार्गदर्शक असा सर्वकाही होता.महाभारतानंतरच्या काळात बरेच दिवस कृष्ण-अर्जुन भेट झाली नव्हती.दरम्यानच्या काळात कृष्णाच्या अंगावर जखम होऊन तो आजारी असल्याचे अर्जुनाला समजते त्यामुळे तो कृष्णभेटी साठी निघायचे ठरवतो. इकडे अर्जुन भेटीला निघतो आणि वाटेत त्याला नारदमुनींची भेट होते.नारदमुनिना पुढे काय होणार याचा अंदाज असल्याने ते अर्जुनाला कृष्णभेटीला न जाण्याचा सल्ला देतात पण त्या मागील कारण सांगत नाहीत.
आपला मित्र त्रासात असताना त्याची भेट टाळणे अर्जुनाला कृतघ्नपणाचे वाटते. तो नारदमुनींकडे भेटीचा हट्ट धरतो.मधला मार्ग म्हणून दोघांनीही एकमेकांना आलिंगन न देता,अजिबात स्पर्श न करता भेटण्याचा सल्ला नारदमुनी अर्जुनाला देतात. अर्जुन पुढे रवाना होतो.
दोन्ही मित्रांची दृष्टीभेट होताच कृष्ण,अर्जुनाला आलिंगन द्यायला बाहू पसरतो.अर्जुन थातुरमातुर वचनाची करणे देऊन अलिंगनच नव्हे तर त्याचा स्पर्श सुद्धा टाळतो. अर्थात हे सर्व पूर्वनियोजित असल्याने कृष्णाला माहीतच असते.
"अर्जुना, इतक्या दूरवरून आलास आणि आपण हस्तांदोलनही करू शकत नाही याचे दु:ख वाटते तेव्हा तुझ्या भातातल्या बाणाने किमान माझ्या जखमेला स्पर्श तरी कर" असे आर्जव कृष्ण करतो, आणि मित्राप्रेमात अर्जुन तशी कृती करतो…त्याच्या बाणाचा जखमेला स्पर्श होतो.
कृष्णाने दृष्टांकडून काही गोपिकांची सुटका केलेली असते आणि त्या सर्वजणींना जाताजाता त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी कृष्ण अर्जुनावर सोपवतो.अर्जुन गोपिकांसह रथातून जायला निघतो.वाटेत एका अरण्यात भिल्ल त्यांच्या रथावर हल्ला करतात आणि गोपिकांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतात.अर्जुन त्यांच्याशी युद्ध सुरु करतो. अर्जुन आपल्या धनुष्यातून बाण सोडतो,पण प्रत्येक वेळी त्याने सोडलेली अस्त्रे निकामी होऊन परत येतात,या प्रकाराने अर्जुन चक्रावतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो पण भिल्ल वरचढ ठरतात आणि गोपिका पळवून नेतात.
म्हणजे महाभारतातला तोच महायोद्धा अर्जुन त्याचा तोच बाण भिल्लांपासून गोपिकांच रक्षण करू शकत नाही……
कारण एकच मनुष्य ताकदवान नसतो तर वेळ खरी ताकदवान असते……
या कथेप्रमाणेच राणे साहेबांनी आपल्या "नारायण अस्त्राने"आजवर अनेक निवडणुका एकतर्फी खिशात घातल्या.कोकणचा आवाज राज्याच्या इतर भागात पोहोचेल इतका कणखर केला. सरकारला अनेकदा निधीसाठी वेठीस धरले. कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगोत्री आणण्यास पुढाकार घेतला. लोकांनी सुद्धा गेली वीस पंचवीस वर्षे त्यांच्यावर खूप प्रेम केले. पण गेल्या काही वर्षात बऱ्याच गोष्टी लोकांना विश्वासात न घेता एकतर्फी वाटाव्यात अश्या घडत गेल्या. पक्ष वाढला,विजय मिळत गेला,कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळत गेली,कार्यकर्ते सधन झाले,आणि खोट्या प्रतिष्ठेत वावरू लागले जनतेशी असलेली त्यांची नाळ तुटायला सुरवात झाली.खरंतर राणे साहेबांनी ही बाब वेळीच ओळखून आवश्यक ते बदल करायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. जनतेच्या भावना अर्जुनाच्या बाणाने कृष्णाच्या जखमेसारख्या दुखावत गेल्या आणि याच दोह्याचा प्रत्यय राणे साहेबांना घ्यावा लागला.
असा अनपेक्षित निकाल येण्यामागे केवळ "मोदींची लाट"एवढंच कारण पुरेसे नाही तर इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधी लाट हे महत्वाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही
ही संत मंडळी या केवळ दोन दोन ओळीतून फार मोठे दृष्टांत देवून गेली आहेत. गरज आहे ती कार्यकर्ता आणि नेत्यांनी हे लक्षात घ्यायची आणि आचरणात आणायची. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा"ही म्हण मुखोद्गत करून यापुढील राज्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आचरण करावे ही अपेक्षा, अन्यथा …. "समय बलवान" असणार आहेच.