Sunday, August 10, 2014

"सौभाग्य" व "ती"

"सौभाग्य" व "ती"
परवा कामानिमित्त पुण्याला निघालो होतो.अर्थात सकाळची वेळ होती.घरापासून साधारण दहा किलोमीटर अंतर कापले असेन आणि ओसरगावच्या विठ्ठल मंदिराजवळ पोहोचलो.मंदिराच्या थोडसं म्हणजे चार पावलं पुढे गेलो आणि एक विलक्षण दृश्य नजरेस पडलं......
हायवेच्या कडेला डावीकडच्या फुटपाथवर एक मनोरुग्ण स्त्री बसली होती.साधारणता चाळीशीची असावी.तिच्या समोर एक गाठोडं होते आणि एका हातात स्टीलची छोटीशी प्लेट होती,जी तिने आरशासारखी चेहऱ्यासमोर धरली होती.ती काय करते हे पाहण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला आणि फोटो घेण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला तेवढ्यात तिने उजव्या हाताने गाठोड्यातून कुंकू घेतलं आणि कपाळावर लावलं.प्रयत्न करूनही हे दृश्य मला टिपता आले नाही.लगेच तीही गाठोडं उचलून मार्गस्थ झाली
अत्यंत भावनिक असे ते दृश्य होते.माझ्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला पिवळसर लाल रंगातून सुर्यनारायण आगमन करत होते आणि त्याच्याच साक्षीने डाव्या बाजूला ही दुसरं कसलंच भान नसलेली स्त्री अगदी बेभान होऊन आपलं सौभाग्य मस्तकावर कोरत होती.मनाच्या याही अवस्थेत हा नेमाचा दिनक्रम कुठला हे मलासुद्धा समजेना.
गाडीने वेग घेतला तसा असंख्य विचारांनी सुद्धा....
नक्की हे सौभाग्य तिच्या दृष्टीने काय असावं ? आजची तिची स्थिती ही त्या सौभाग्याच्या संदर्भाने आहे की कसे? ज्याच्या नावाने हे सौभाग्य ल्यावे अशी मनोकामना असताना त्याने नाकारलं म्हणून की ज्याने स्वीकारलं त्याने अर्धवट सोडलं म्हणून?की आणखी काही......
कुठल्याच तर्कापर्यंत पोचता येईना....
सारेच अतर्क्य .......

No comments:

Post a Comment