Sunday, August 10, 2014

"ऋणानुबंध"......

"ऋणानुबंध"......
आयुष्यात एकूण दोन ठिकाणी थोडी थोडी नोकरी केली.त्यातले नोकरीचे पहिले ठिकाण होते "डिंभे धरण".इंजिनीअर झाल्या झाल्या डिंभे धरणावर साईट इंजिनीअर म्हणून जॉईन झालो ते साल होतं ब्याण्णव.नवभारत बिल्डर्स कोल्हापूर यांची ती फार मोठी साईट होती.उण्यापुऱ्या वर्षभराच्या तिथल्या वास्तव्याच्या खूप आठवणी अजून ताज्या आहेत.त्यातल्याच अनेक आठवणी कालच्या "माळीण"दुर्घटनेमुळे ताज्या झाल्या.डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या माळीण सारख्या तिथल्या अनेक गावांनी तेव्हा आपलं गाव सोडलं नव्हतं.धरण कामाच्या अनुषंगाने तिथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या होत्या.त्यामुळे कोणी सुपरवायझर,कोणी ड्राईव्हर तर अनेक पुरुष आणि महिला मंडळी मजुरीच्या कामासाठी येत होती.पुनर्वसनाच्या कामापैकी रस्ते आणि मोऱ्या यांचे बांधकाम सुरु असताना माझ्या साईटवर तिथली स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने होती.सर्वचजण खूप प्रेमळ आणि प्रामाणिक माणसे होती.एकदोनदा परतीची गाडी चुकल्याने त्या वस्तीत राहण्याचा योग आला.तेव्हा आंब्याचा सिझन होता त्यामुळे रात्री साहेबांसाठी खास आमरस पुरीचा बेत आमच्या कामगार मंडळीनी आखला होता तो आज पुन्हा आठवला.एरव्ही तिथे खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्रसंगी कामगार मंडळींची भाजी भाकरीसुद्धा खाल्ली होती,तिथल्या एकदोन कामगार मुलींच्या लग्नात मला मिळालेली टौवेल टोपी आज पुन्हा आठवली.अश्या गुणी माणसांवर काळाचा घाला आला हे ऐकून फारच अस्वस्थ व्हायला झाले.आज आपल्यात नसलेल्या माळीण गावच्या सर्व ज्ञात अज्ञात मंडळीना भावपूर्ण श्रद्धांजली....

No comments:

Post a Comment