Friday, December 20, 2013

तफावत .....

"तफावत"......
आपल्या समाजात अजूनही स्त्रीचे स्थान दुय्यम असल्याचा (म्हणजे ठेवल्याचा)प्रत्यय वारंवार येत असतो.खासकरून खाजगी मजुरीच्या बाबतीत स्त्री कामगाराची मजुरी ही जवळपास पुरुष कामगाराच्या निम्म्याने असल्याचे निदर्शनास येते. यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही ती तफावत भरून काढता आलेली नाही.मला वाटत होते की हा दुजाभाव फक्त मनुष्य जातीतच असेल पण तो प्राणी मात्रातही आढळतो. आज गावठी कोंबडी आणण्यासाठी मार्केट मध्ये गेलो तर तिथे "गावठी कोंबडा" दोनशे वीस रुपये किलोने तर बिचारी "गावठी कोंबडी"त्यापेक्षा कमी म्हणजे दोनशे रुपये किलोने कापली जात होती.भाजी प्रकारात मात्र समाधानकारक बदल दिसला तिथे "ती"मेथी महाग आणि त्याच्या तुलनेत"तो" मुळा फारच स्वस्त होता…………

"मित्र" आणि "शत्रू"

"मित्र" आणि "शत्रू" हे दोन परस्पर विरोधी शब्द आपणाला अगदी अनादी काळापासून माहीत आहेत,त्यातला फरक/त्याची व्याख्या आपल्याला सहज समजते.पण ज्यांचा अजेंडा शत्रुत्वाचा असतो असे काही छुपे"शत्रू" वर्षानुवर्ष आपले "मित्र" या नात्यात बिनधास्त वावरतात.या "अघोरी"प्रकाराला काही निश्चित असा शब्द आहे का?…

"दखल"

"दखल"
"स्वामी विवेकानंद" रथयात्रेच्या स्वागताची जिल्ह्यात जोरदार तयारी सुरु होती. आमच्या संस्थेत सुद्धा स्वागत आणि व्याख्यान होणार होते.व्याख्यानाच्या व्यासपीठावर स्वामीजींच्या तयार फोटो ऐवजी "देवदत्त अरदकर" यांनी शक्य झाल्यास स्वतः स्वामीजींचे "पोर्ट्रेट"करावे,असे मला वाटत होते. तसा विचार मी बोलून दाखवला. वेळ फार कमी असूनही देवदत्त सरांनी अगदी सुंदर "पोर्ट्रेट" तयार केले.त्याची प्रशंसा व्याख्यानासाठी आलेल्या रामकृष्ण मठाच्या स्वामीनी अगदी मनसोक्त पणे केली.संस्थेतल्या सर्वच कार्यक्रमात चित्रकला,नेपथ्य यासोबत संगीत या विषयाची बाजू सुद्धा अगदी सक्षमपणे सांभाळणाऱ्या "देवदत्त अरदकर"या कलासक्त शिक्षकाचे आमच्या संस्थेत असणेही मनाला फार सुखावून जाते.त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या कलेसाठी अनेक शुभेच्छा … !



"गंमतची गंमत"

"गंमतची गंमत"
आपल्याकडे मोबाईल आल्यापासून बऱ्याच गमती-जमती घडताना दिसतात.बऱ्याचदा आपण अनोळखी माणसाचा कामानिमित्त नंबर घेतो आणि तो लक्षात रहावा म्हणून त्याच्या नावासमोर त्याचा पेशा/काम लक्षात येईल असे काहीबाही लिहून ठेवतो.
पुढे ती व्यक्ती आपला चांगला मित्र कीवा नातेवाईक होते,पण त्याचे मोबाईल मधील नाव दुरुस्त करण्याचा त्रास सर्रास कोणी घेताना दिसत नाही.
आमच्या एका मित्राचे अलीकडेच लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले.त्यालाही कारण मोबाईल वरील सेव्ह केलेले नावच होते. तर आमचा हा मित्र म्हणजे खाण्यापिण्याचा महाशौकीन इसम,त्यातही मांसाहारी स्पेशालिटी.चांगले मटण,मासे,ससे,गावठी कोंबडी कुठे मिळतात त्याची डिरेक्टरीच त्याच्या मोबाईलमध्ये तयार असते.अशीच चांगली गावठी कोंबडी काही वर्षांपूर्वी एका काकूकडे मिळायची. तेव्हा या महाभागाने तिचा नंबर "सडेकर काकी,गावठी कोंबडी" असा सेव्ह केलेला होता.
पुढे तोही विसरून गेला. योगायोगाने तिच्याच धाकट्या कन्येशी हे महाशय विवाहबद्ध झाले.आणि लग्नानंतर दोन दिवसांनी याच्या फोनची रिंग वाजली.बायकोने फोन उचलला तर पलीकडे तिची "आई" होती ……
"सडेकर काकी,गावठी कोंबडी" …….

"टेलरमेड" चा आनंद ……

"टेलरमेड" चा आनंद …….
सध्याचा जमाना हा "रेडीमेड"चा आहे.जीवनातल्या बहुतेक बाबी ह्या "रेडीमेड" झाल्या आहेत.अर्थात जमान्याचा जो ट्रेंड आहे,जे स्पीड आहे,त्याचा आपण अंगीकार करणे हे स्वाभाविकच आहे. मात्र अश्या या जमान्यात आपण अनेक आनंद,उत्सुकता याना मुकतो हेही तितकंच खंर आहे.असाच एक अनोखा आनंद आपल्यापैकी बऱ्याचजणानी गमावला आहे,आणि तो म्हणजे "टेलरकडून कपडे शिवून घेण्याचा"……
आता बहुतेक जण सोयीचा असा "रेडीमेड"चा पर्याय निवडतात.पण एक काळ असा होता की आपला सगळा रुबाब "टेलर"च्या हातात असायचा.त्याकाळी अंगाला शोभेसे कपडे शिवणे ही एक "मोहीम"च असायची.आधी शर्ट-प्यांट साठी म्याचिंग कपडे निवडायचे मग निवडलेले किवा भेट म्हणून आलेले "पीस" धुवून आटवायचे (त्यावेळी कपडा हमखास आटायचा) नंतर ते घेऊन आपापला पारंपारिक किवा नवा शोधलेला "टेलर" गाठायचा.आणि कपडे त्याच्या स्वाधीन करायचे,जर एखादा "टेलर" आपल्या दुकानात कपड्याचे पिस ठेवत असेल तर आपण आणलेल्या कपड्यांना हमखास नावे ठेऊन घ्यायची.तो म्हणेल तसे अंगविक्षेप करत मापे द्यायची.त्याने मागच्यावेळी केलेली चूक पुन्हा होवू न देण्यासाठी एकादी सूचना द्यायला जावे तर त्याच्याकडून नक्कीच आपल्या मागच्या पुढच्या शरीराची त्याच्या दृष्टीने चुकीची असलेली "मापे"चारचौघात जाहीर करून घ्यायची,आणि गप्प बसायचे. त्यानंतर माप घेताना खिशातून बाहेर काढलेले पाकीट आणि कंबरेचा पट्टा न विसरता कंबरेला अडकवायचा.पावतीवर लिहिलेल्या तारखेनंतर आठ दिवसांनी आपल्याला कपडे मिळणार हे माहित असूनही तारखेआधी देण्यासाठी काकुळतीला यायचे, मग घरी परतायचे.इथे अर्धी मोहीम फत्ते व्हायची,आणि हुरहूर सुरु व्हायची.अर्थात देवावर ठेवतात त्यापेक्षा जास्त भरवसा त्या "टेलर" वर ठेवावा लागायचा.
साधारणता डॉक्टर ने दिलेली "डिलिव्हरी डेट" पुढे किवा मागे होते पण टेलरने दिलेली "डेट" नेहमी पुढेच जाते हा जवळपास सगळ्यांचा अनुभव.मग एकदाचा तो दिवस उजाडतो. त्याच्याकडे ट्रायल पाहण्यात फारसा अर्थ नसतो कारण आपण सांगितलेल्या दोन महत्वाच्या सूचना विसरून किवा मुद्दाम त्याने आपली स्वतःची एखादी स्टाईल शर्ट किवा प्यांटमध्ये कोंबलेली असते."ऐकावे गिऱ्हाईकाचे आणि करावे मनाचे" हा समस्त टेलर मित्रांचा स्थायीभाव असावा.तर अशी उशिराची "डिलिव्हरी" घेऊन घरी येईपर्यंत आपली उत्सुकता शिगेला पोचलेली असते.नवीन घातलेला ड्रेस पाहणाऱ्या पहिल्या माणसाचे जे काही बरे वाईट मत असते तसेच आपले मत होते.सुदैवाने "फिटिंग"जमले तर ठीक नाहीतर "पदरी पडले आणि पवित्र झाले" असे म्हणायची पाळी येते.इतका सगळा व्याप करूनही तेव्हा जी एक उत्सुकता एक अनोखा आनंद मिळायचा तो या रेडीमेड मधून नक्कीच मिळत नाही.कारण यात कुठे "पेशन्स"चा भाग येत नाही.
अजूनही काहीजण हा आनंद अनुभवतात मला त्यांचे नेहमी कौतुक वाटते, आणि म्हणूनच या एका वेगळ्या आनंदाच्या अनुभूतीसाठी मी खूप वर्षांनी एक ड्रेस "शिवून" घेतला. सुदैवाने टेलरच्या नावाची मोठमोठी लेबल सोडली तर बाकी अगदी मनासारखा झाला.
 —

Friday, November 29, 2013

"रुबिक क्युब"

"रुबिक क्युब"
मला वाटतं आयुष्य हे "रुबिक क्युब"च्या कोड्यासारखे आहे.ज्याला सहा बाजू आणि प्रत्येक बाजूला नऊ चौकोन असतात.हे कोडे सोडवायचे तर एका बाजुचे नऊही चौकोन एकाच रंगात याप्रमाणे त्याच्या सहा बाजू सहा रंगात यायला हव्यात.हा क्युब हातात आल्यावर आपण जेव्हा मोठ्या मेहनतीने एखादी बाजू समरंगी करतो तेव्हा फार आनंद होतो.पण जेव्हा दुसऱ्या बाजूसाठी प्रयत्न करायला जातो तेव्हा नेमकी समरंगी केलेली बाजू विस्कटते.मग आणखी थोडा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर आपण त्या एकाच बाजूवर समाधान मानायचे पक्के करतो.आपल्या आयुष्याचेही साधारण असंच असतं ज्ञान असेल तर पैसा नाही,पैसा असेल प्रतिष्ठा नाही,प्रतिष्ठा असेल तर स्वास्थ नाही,स्वास्थ असेल तर गृहसौख्य नाही,आणि समजा तेही असेल तर जनाधार नाही.एक सांभाळून दुसरे मिळवणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. मात्र काही माणसे फार हुशार असतात ते कोड्याची सुटलेली एकच बाजू इतरांना दाखवतात,आणि उरलेल्या बाजू सोयीस्करपणे लपवतात.तर काही महाभाग असेही असतात जे सत्तावीसच्या सत्तावीस छोटे चोकौन अलग करून "क्युब"अगदी मोकळा करतात आणि पुन्हा सहाही बाजू समरंगात जोडतात केवळ स्वतःच्या समाधानासाठी.असो गेले काही दिवस मीही प्रयत्न करतोय,आताश्या कुठे एक बाजू सावरलीय.पुढे बघू …….

"चारोळ्या"


भाजपाने ओलांडले सत्तेचे "माप",
मोदी विरोधकांना बसला "चाप"…….  
लक्षवेधी ठरला अरविंदचा "आप"
कॉंग्रेसला मात्र आठवला "बाप"……
 —

छान उमललेलं जास्वंदीचं फूल
काल देवाला वाहायचंच राहिलं…. 
दिवसभराच्या प्रतीक्षेत बिचारं, 
आज पार कोमेजलेलं पाहिलं…



"कोटींचे" घोटाळे ऐकल्यापासून….
माझं कशातच "लक्ष" नाही.
मनाला "हजार"वेळा बजावलं पण…
"शंभरा"तून "रुपया"चाही गुण नाही.


नाही जमलं कधी,
असं अंगभर "मोहरणं"…… 
जेव्हा जेव्हा केला प्रयत्न,
नशिबी आलं नुसतं" शहारणं"….


मी ठेचाळून माघारी फिरलो त्या वाटा,
पुढे कधीतरी रस्त्याला मिळालेल्या ……
पण,तोपर्यंत जगण्याच्या साऱ्या आशा,
पुन्हा न पालवण्यासाठी जळालेल्या……
 



काल मी माझ्या अंगठ्याचं,
चुकून नख जरा जास्त कापलं…… 
आणि तेवढंच निमित्त घेऊन,
मला,अनामिकेने मस्त झापलं….


तू परत येशील,
या वेड्या आशेवर मी होतो…. 
असं कुणी येतं का?
म्हणून हसला माझ्यावर जो तो…


इतक्या वर्षानंतरही,
तू मला मारलेली हाक,
खूप ओळखीची वाटली …… 
प्रतिसाद देणारच होते,
पण मनात भीती दाटली ….

असा एखादा "भारद्वाज"
रोज सकाळी सकाळी दिसावा…… 
आणि दिवसातला एकही क्षण,
कोणत्याही चिंतेचा नसावा……

लग्न झाल्यापासून तुझ्यातला,
"प्रियकर" कुठेच दिसेना…… 
माझ्यातली "प्रेयसी" सुद्धा आता,
लाडेलाडे रुसेना…… ....


आजच्या स्टेटस वरून समजले की,
बऱ्याच मित्रांची मराठी ही "मातृभाषा" आहे…. 
फक्त आजचा दिवसच नाही,तर सदोदित,
तिचा आदर करतील अशी वेडी "आशा"आहे …… 

मराठी भाषा दिनाच्या अनेक शुभेच्छा ….!

या जगात माणसाच्या,
उपद्रवमूल्याला "सलाम"आहे…… 
ज्याच्याकडे "ते"नाही,तो मात्र,
गुलामांचाही "गुलाम"आहे ……

मैत्रिणीचा विषय निघाल्यावर,
मन कितीही असलं शुद्ध…. 
तरीही घरात सुरु होतं, 
नक्कीच तिसरं महायुद्ध ……

माझ्याकडे अजूनही तुझी,
नववीतली ती"वही" आहे…… 
ज्यात 
"तू मला खूप आवडतोस"असा शेरा,
अन खाली तुझी "सही" आहे….

इथे काम करणाऱ्याच्या चुका काढणारे,
बरेच दीड"शहाणे" आहेत…
आणि काम न करणाऱ्यांसाठी मात्र,
एकाहून एक "बहाणे" आहेत…

"अजब अमुचे सरकार"… 

इथे गरिबांना द्यावा लागतोय,
एका "वडापाव" वर ढेकर … 
आणि तिथे मात्र श्रीमंतांना मिळतोय,
फक्त चाळीस पैशात एकर …

तुझ्या गालांना मी लावलेला रंग,
मला अजूनही तसाच आठवतो……
कारण,न चुकता दरवर्षीच्या होळीला,
मी तो मनात नव्याने साठवतो…… 

"फेसबुक फ्रेंड"

"फेसबुक फ्रेंड"

जी यायला नको ती,
"फ्रेंड रिक्वेस्ट"आली…
खपली जुन्या जखमेची,
पुन्हा सैल झाली …
होते नाव ओळखीचे,
आडनावे जोडलेली……
आम्हीसुद्धा त्याकाळी,
तशी जोडून खोडलेली……
वेणी तीच होती,
अबोली माळलेली ……
कॉपी त्या फोटोची,
आम्ही कधीच जाळलेली……
"प्रोफाईल" मध्ये तरी ती,
ऐश्वर्याने नटलेली…
इथल्या दारिद्र्याच्या,
शापातून सुटलेली…
अनोख्या कुतूहलाने,
विनंती "कन्फर्म" केली …
हातास धरून माझ्या,
ती भूतकाळात गेली …
पुन्हा एकदा नव्याने,
"फेसबुक फ्रेंड"झाली……
खपली जुन्या जखमेची,
पुन्हा सैल झाली……
जी यायला नको ती,
"फ्रेंड रिक्वेस्ट"आली…

Saturday, November 23, 2013

"सोन्याची पेढी"

आता कोकणातल्या प्रत्येक जत्रेत अशी "सोन्याची पेढी"थाटणारे..
"खोट्या"दागिन्यांचे "खरे"व्यापारी भेटतील.
सध्या सोन्याचे भाव इतके वाढलेत की,
दराचा आकडा उच्चारण्यासाठी सुद्धा काहीतरी "ऐपत" नक्कीच हवी.
इतरांसाठी सोने स्वस्त असो अथवा महाग ...
"गरिबां"ची मुलेबाळे मात्र ही अशी "पेढी"पाहून सुखावतात.
आणि कोणतेही "बिल" न मागता मोठमोठी "डील" करतात.
आम्ही सुद्धा अशी "सोने खरेदी" मस्त "एन्जॉय" केलेली आहे.
आजच्या एका जत्रेत ती "आठवण"ताजी झाली.




"स्वप्नातली रेल्वे"

"स्वप्नातली रेल्वे"
कोकण रेल्वेच्या भरावाची माती,
आजुनव आमच्या शेतात व्हावता…
ओसाड झाली सगळी शेता,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥ 
कोकणातल्या प्रत्येक स्टौलवर,
परप्रांतीयांची पाटी झळाकता….
आमका कधी कधी राग येता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता॥
प्रकल्पग्रस्तान्का नोकरी मिळाक,
सरकारी भरतीचा "धोरण"आड येता….
मोठ्या आशेन जोतो अर्ज खरडता,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
प्रकल्पात घरदार गेलेल्यांका,
रस्त्या वाटेचो आजून पत्तो नाय….
शिक-खोक म्हातारो सुदा मेरे वरसूनच चलता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
शेता भातात जाताना फाटकावर,
आमची अर्धीतरी इरड मोडता….
मेलो गेटमनसुदा लय रुबाब करता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
रेल्वेक खय थांबो नाय,
तर खय पुरेसो कोटो नाय…
आम्ही तिकटीसुदा ब्ल्याकनेच घेतव,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
स्टेशन मास्तरापासून टीसी पर्यंत
जो तो आमका न्याना शिकवता….
काय इचारला तर आमकाच अडानी म्हणता ,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥

Sunday, October 27, 2013

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"
दिवाळीचा फराळ कधी तोंडात पडेल तेव्हा पडेल पण त्याच्या तयारी निमित्त सध्या इतकी कामे आणि कटकटी मागे लागतात की "फराळ नको …. गुऱ्हाळ आवर" असे म्हणायची वेळ येते. बहुदा सगळ्यांनाच या गोष्टीचा कमी अधिक अनुभव असण्याची शक्यता आहे (नसल्यास मात्र स्वतःला भाग्यवान समजावे ).
दरवर्षी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याची गृहिणीना भारी हौस असते. मग असे प्रयोग करताना त्यातला एखादा पदार्थ चुकून बिघडला तर मात्र कोणाचीच खैर नसते. सुरवात नेहमीच "रेसिपी" देणाऱ्या बाईंपासून असते आणि शेवट अर्थातच नवरोबावर असतो.(निवडक साहित्य आणले नाही अश्या आशयाने).
बहुतेक ठिकाणी प्रतिवार्षिक काही ना काही बिनसतचं… कधी लाडवातला रवा/बेसन कच्चे असते तर कधी करंजीतल्या सारणा"ची गोडी कमी/जास्त होते.चहा सोबत चांगला लागावा अशी अपेक्षा असलेला "चिवडा" जरा जास्तीचा तिखट होतो आणि "चकना"म्हणूनच जास्त वावरतो.साधी शंकरपाळी सुद्धा कधी कधी दातांचा टणकपणा तपासण्याचे हत्यार बनून समोर येते."चकलीबाई" सर्वगुणसंपन्न असणे हा तसा नशिबाचाच भाग म्हणावा लागेल.
आज आमच्या घरीही चकल्यानी हिला चकवलं.फराळाच्या "नमनालाच कढईभर तेल" वाया गेलं. त्यामुळे एखाद्या पारंपारिक मतदारसंघात डीपौझिट जप्त झाल्यावरही उमेदवाराला वाटणार नाही इतकं वाईट सौ. ना वाटलं. …
हे सगळं अनुभवल्यानंतर आमच्या कोकणातली पूर्वीची दिवाळी आणि दिवाळीतला एकमेव फराळ आठवला. …… "पोहे"…… नवीन कापणीतले वालयचे भात भिजवायचे आणि गिरणीवरून लाल पोहे कुटून आणायचे…. चहातले पोहे,गोडे पोहे आणि कांदा पोहे …. खा की खा…. पदार्थ बिघडण्याची शक्यताच नाहीच चुकून कधी बिघडलं तर पोटचं …
 

Thursday, October 24, 2013

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "
काही माणसे हि जगाला फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला येतात की काय?अशी बऱ्याचदा शंका येते,आणि बहुतेकदा ती खरीही असते.अलीकडच्या काळात तर ही शंका खरी करून देण्यासाठी देशातल्या तमाम राजकारणी मंडळीत स्पर्धा लागलेली दिसते.खरतरं अश्यांना  माणसे का म्हणावीत असा प्रश्न कदाचित सर्वानाच पडत असावा…आधुनिक "दानव"च ते…. त्यामुळे एकदा का अश्या दानवांनी "नरकाचं तिकीट" फाडलं की मगच पिडीताना खऱ्या अर्थाने जगण्याचा मार्ग मोकळा होतो,अर्थात तेही पुढे "वारसा"चालणार नसेल तरच…. 
याही पुढे जाऊन कधीतरी एक गोष्ट ऐकली होती ती अशी …. 
एका गावात एक जमीनदार राहत असतो. त्या गावासहित आजूबाजूच्या गावातही  त्याचा फार दरारा असतो,आणि एखाद्या दानवाला लाजवेल अश्या प्रकारचा क्रूरपणा त्याच्या ठायी ठायी भरलेला असतो. अत्यंत सज्जन आणि परोपकारी दांपत्याच्या पोटी जन्माला आल्याने सुरवातीच्या काळात लोकांनी त्याचा उन्मतपणा दृष्टीआड केला. पण पुढे जाऊन त्या भागातल्या तमाम जनतेला त्याने जगणे नकोसे करून टाकले. मी म्हणेन ती पूर्वदिशा. त्याला आवडेल ती जमीन,आवडेल ती इस्टेट,आवडेल ती बाई,आणि बरंच काही जे त्याच्या मनात येईल ते तो कोणालाही न जुमानता ताब्यात घेई.
अजिबातच  नाही असा नाही,काही जणांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला पण बिचाऱ्यांची बायकापोरे वाऱ्यावर पडली.गावात इतरही जमीनदार होते पण आपल्याला शह देऊ शकतील अश्यांना त्याने वेळच्या वेळी ठेचून काढलं. या साऱ्या दहशतीमुळे  मनात नसताना सुद्धा भीतीने सारी जनता त्याचा जयजयकर करत असे,आणि मनातल्या मनात प्रचंड शिव्याशाप देत असे. 
होता होता बरीच वर्ष संपली,जमीनदाराला म्हातारपण आलं,हळूहळू त्याची जरब कमी व्हायला लागली,त्याच्या जुलमी स्वभावामुळे त्याच्यापासून बायकापोरे सुद्धा दुरावली.त्याच्या अवती भवतीचे त्याच्या जीवावर माजलेले गुंड पुंड सुद्धा आता लोकांच्या भीतीने म्हाताऱ्याला अंतर देऊ लागले. एकट्या पडलेल्या जमीनदाराने सरतेशेवटी लोकांसमोर शरणांगती पत्करली.झालं ते झालं पण यानंतर तरी त्रासातून आपली सुटका झाली म्हणून गावकऱ्यानी त्याला मोठ्या मनाने माफही केलं.
इकडे म्हातारा नाना विकारांच्या साथीने पुरता खंगत चालला होता.एक दिवस त्याने पुऱ्या गावाला एकत्र बोलावले आणि म्हणाला "गावकरी मंडळी खरतरं मी आयुष्यभर तुमच्यावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत तरीही तुम्ही मला माफ केलात त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
आता माझी एकच शेवटची इच्छा पुरी करा,ती म्हणजे मी तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल प्रायश्चित्त म्हणून तुम्ही मला शिक्षा द्या,जेणेकरून मला सुखाने मरता येईल" भोळे भाबडे गावकरी म्हणाले, तुम्हाला झालेला पश्चाताप हीच तुमची शिक्षा आहे. मात्र म्हातारा शिक्षेवर ठाम राहिला,त्याने गावातील सर्व पुरुष मंडळीनी मला मरेपर्यंत दांड्यांनी मारावे आणि माझी या पापातून सुटका करावी यासाठी कमालीचा आग्रह धरला.हो नाही होता होता एके दिवशी हा मारण्या-मरणाचा कार्यक्रम पार पडला 
दुसऱ्या दिवशी गावात पोलिस आले आणि सर्व पुरुषमंडळीना अटक करून घेऊन गेले ते दोन पाच वर्षांच्या शिक्षेसाठीच.
कारण जुलमी म्हाताऱ्याने मरणाआधीच पोलिसांच्या नावे घरात "चिठ्ठी" ठेवली होती.ज्यात मृत्यूचे कारण नमूद होते. 
त्यामुळे मूळ म्हण बदलून आता म्हणावं लागेल 
"जित्याची खोड … मेल्यानंतरही जात नाही"

Wednesday, October 23, 2013

"श्रमप्रतिष्ठा"……

"श्रमप्रतिष्ठा"……
अलीकडे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वावर असल्याने बऱ्याचदा विद्यार्थी आणि युवकांसाठी "श्रमप्रतिष्ठा" या विषयावर बोलावे लागते.आमच्यावेळी हा भाषणाचा विषय नसेल कदाचित पण आमच्या जडण घडणीत मात्र श्रमप्रतीष्ठेचा मोठा वाटा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय निर्मितीच्या कामाने नुकताच(1992) वेग घेतला होता.ओरोस येथे मोठ्यामोठ्या प्रशासकीय इमारती आणि इतर विकासकामांची अनेक बांधकामे सुरु झाली होती. दरम्यान "आम्ही" सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका घेऊन आमच्या गावी परतलो होतो.त्याकाळात सिव्हिल इंजिनीअर ना फारसे चांगले दिवस नव्हते.शासकीय भरती प्रकिया पूर्णपणे ठप्प होती. पुण्या-मुंबईत खाजगी काम करण्यापेक्षा घरची "पेज"खाऊन इथेच काम शोधणे हितावह वाटत होते कारण मुख्यालयातील कामांच्या रूपाने संधी तर समोरच होती.
मी वर "आम्ही" असा उल्लेख केला तो (भोसले-सावंत असल्याने) स्वतःला आदरार्थी संबोधन म्हणून नव्हे तर "आम्ही" म्हणजे माझा मित्र "संतोष कदम" व मी असा होता. इथे आल्यावर आम्ही दोघानीही ओरोसला वेगवेगळ्या फर्म मध्ये कामाची कामाची सुरवात केली. या कामाचे विकासक "सिडको"म्हणजे एक आगळं वेगळं कुटुंबच होतं.नवी मुंबई आणि इतर प्रांतातून आलेले मोठमोठे ठेकेदार आणि इंजिनीअर मंडळी खूपच मिळून मिसळून वागणारी होती. आम्ही वयाने लहान,त्यात इथले "भूमिपुत्र" आणि हरहुन्नरी असल्याने आमचा संचार  सर्वत्र आणि सर्वमान्य असायचा.
स्वतः कंत्राटदार व्हायची फार इच्छा होती ती "वसंत धडके" या एका सज्जन कार्यकारी अभियंत्याने अगदी सहजपणे पूर्ण केली.त्यांच्याच पुढाकाराने पहिलं-वहिलं काम मिळालं तेही रस्त्याच. खूप आनंद झाला. संतोष कदम व मी एकत्रपणे ते सुरु केले. आमच्याकडे तेव्हा कामासाठीची साधन सामुग्री किवा आर्थिक तरतूद तशी काहीच नव्हती.पण सगळ्यांशी यारी-दोस्ती छान होती, त्यामुळे सहकार्याची खात्री होती. आमच्या पहिल्याच कामाचे स्वरूप होते मातीचा भराव करून एक मोरी (सी डी वर्क) बांधायची आणि रस्ता खडीकरण करायचे. नवीन घमेली,टिकाव फावड्यांची खरेदी झाली.मुहूर्ताचा नारळ फुटला.त्याच दिवशी भरावाचे काम सुरु करायचे ठरले. संध्याकाळच्या वेळी कुठल्याश्या दुसऱ्या कामावर खोदकाम चालू होते, त्या ठिकाणची माती भाड्याच्या डंपरने आणण्याची बोलणी झाली.माती फुकट आणि वर मशीनने भरून मिळणार होती फक्त डंपर अनलोड केल्यावर हवारी (मातीचा ढीग पसरणे) साठी कामगारांची गरज होती ते सुद्धा सांगितले. थोडक्यात सगळी "जोडणी"पूर्ण झाली होती.
स्वतःचे पहिले काम असल्याने ती संध्याकाळ एका वेगळ्या उत्सुकतेची होती.जोडणीप्रमाणे माती भरून डंपर आला पण हवारीसाठी सांगितलेल्या कामगारांचा अजून पत्ता नव्हता,त्यांच्या शोधार्थ त्यांच्या झोपड्यावर गेलो तर ते काम करणं तर सोडा पण उभे रहाण्याच्या अवस्थेतही नव्हते. थोडेसे नाराज होऊन परत आलो.
चंदू नावाचा डंपर ड्रायव्हर तसा आमचा मित्रच होता त्याला म्हणालो,चंदू,तू निघ… तू दुसरी मातीची ट्रीप आणेपर्यंत आमची हवारी  झालेली असेल. चंदूने त्याच्या एकशे नव्याण्णवचा गेअर टाकला आणि सुसाट निघाला,इकडे आम्ही दोघांनीही शर्ट उतरवले, हातात फावडी घेऊन मातीची हवारी सुरु केली. एक ट्रीप . दुसरी ट्रीप…पुढच्या अनेक ट्रीपा. मध्येच केव्हातरी चंदुला दया आली, त्याने आमच्यासाठी दोन बीअर आणि स्वतःसाठी एक कि दोन चपट्या आणल्या (तेव्हा कधीतरी बीअर चालायची). पहिल्या कामाचे सेलेब्रेशन तिथेच पार पडले. रात्र पुढे सरकत होती तसा आमचा माती भरावही पुढे सरकत होता. त्या रात्री उण्यापुऱ्या दोन तीन तासांचीच  झोप मिळाली,पण तरीही जागरण झालेले न जाणवण्या इतपत ती गाढ होती. सकाळी उठून रात्री आपण केलेले काम पाहण्याचा त्यावेळचा जो आनंद होता तो मलातरी शब्दबद्ध करता येणे शक्य नाही. पुढच्या काळात असेच कधीतरी भरदुपारी तापलेले पाईप गाडीतून उतरणे,बांधकामावर स्वतः पाणी मारणे अश्या अनेक गोष्टींची मजा घेत घेत इथपर्यंत पोहोचलो ते श्रमप्रतिष्ठेनेच……

Tuesday, October 22, 2013

"आम्ही जातो अमुच्या गावा" ….

                                                          "आम्ही जातो अमुच्या गावा" …. 
प्रिय लोकहो, 
पंधरा दिवसाचा पाहुणचार फार आवडला. वार्षिक सेवा चाकरी नेहमीप्रमाणेच उत्तम. एखाद्याच्या घरी चुकून (अपचनाच्या त्रासामुळे) आमच्या बांधवांकडून पिंड शिवला गेला नसेल तर सांभाळून घ्या. बाकी पूर्वजांचा कोप वैगरे म्हणाल तर तसं काही नसतं, काळजी नसावी.पण अगदीच प्रायश्चित्त घ्यायचे असेल तर पुढे वर्षभर उपाशी पोटी असलेल्या कोणालाही जेऊ खाऊ घाला. धन्यवाद ! पुन्हा भेटू … 
आपला 
काक प्रतिनिधी 

Monday, October 21, 2013

"स्वप्न"….

"स्वप्न"…. 
कालच्या उन्नावच्या घटनेने 
बदलला आमचाही परिपाठ… 
आता झोपायची ठरलीय वेळ,
रात्री आठ ते सकाळी आठ…

19/10/2013

"तारीफ पे तारीफ"…

"तारीफ पे तारीफ"…

मिळत नाही जोपर्यंत "खंडपीठाची" ग्वाही….
तोपर्यंत अंगात आमच्या "काळा कोट"नाही….
आता एकदा सर्वांनी, सरसावली बाही….
त्यावर पुन्हा फिरून,अजिबात माघार नाही …
पर्याय "सर्किट बेंच"चा,मान्य होता तोही…
कोर्टाकडून अजून,त्यालाही अनुकुलता नाही…
"एकी"शिवाय कधीही,आवाज घुमत नाही…
विचार होईल "मागणी"चा,यात दुमत नाही…

("कोल्हापूर खंडपीठ" मागणीसाठी वकिलांनी पुकारलेल्या संपाला पन्नास दिवस पूर्ण झालेत. पक्षकारांचेच जास्त हित असणाऱ्या या मागणीसाठी सुमारे १५००० वकीलांनी दाखवलेली एकजुट नक्कीच दाद देण्याजोगी आहे.)

18/10/2013

"मी माझा" ...... ..

"मी माझा" ...... ...
साल १९९५.... चंद्रशेखर गोखले सरांचं "मी माझा" हाती पडलं.....
अधाश्यासारखं पुन्हा पुन्हा वाचलं,त्यामुळे संभाषणात चारोळ्यांचा वापर सर्रास होऊ लागला. 
दरम्यान आमचा 'प्रेम अध्याय" पण चालू झाला होता ...
मग काय ...प्रत्येक "प्रेमपत्रात" प्रसंगानुरूप किमान २/३ चारोळ्या असायच्याच..
आताची बायको अन त्यावेळची प्रेयसी भलतीच खुश त्या चारोळ्यांवर ...… 
मात्र लग्न होईपर्यंत तिनेही कधी विचारलं नाही आणि मीही स्वतःहून कधी सांगितलं नाही की "चारोळ्या" सरांच्या आहेत असं....
लग्नानंतर कधीतरी बिंग फुटलं…. ..
पण तोपर्यंत "मी माझा" न राहता "मी तिचा" झालो होतो...

Tuesday, October 15, 2013

मान्सून म्याडनेस ......


" मान्सून म्याडनेस "  ......
हल्ली बऱ्याच शाळांमध्ये "मान्सून म्याडनेस डे" खास साजरा करतात, 
उद्या माझ्या मुलीच्या शाळेतही आहे,आज तिची जोरात तयारी चालू होती.
त्यावरून आमचा त्या काळचा खराखुरा "म्याडनेस"आठवला ...
त्याला खास दिवस नव्हता.....खास अशी व...ेळ नव्हती...
संधी मिळाली कि पावसाचा,चिखलाचा,झाडा-झुडूपांचा,गुरा-ढोरांच्या वासाचा आणि सहवासाचा यथेच्छ आनंद घ्यायचा........ 
एकमेकाच्या मुळातच ठिगळ लावलेल्या छत्र्या आणि मोडायच्या ...त्याकाळची एकमेकाची ब्र्यान्डेड दप्तरे पुस्तकांसाहित भिजवायची..... 
मग घरी आल्यावर काहीतरी निमित्ताने शेताकडे मोर्चा वळवायचा ......हट्टाने जोत (औत) धरायचे......खोऱ्याने वावरायचे.....तरव्याच्या पेन्ड्यांशी अंगाला खाज येइस्तोवर खेळायचे..... 
पावसात भिजायचे....चिखलात लोळायचे ....मोठ्या सरीला आईच्या "ईरल्यात" किवा बाबांच्या "कांबळ्यात"(घोंगडी) शिरायचे.......
किमान चड्ड्या असल्या तरी बिनधास्त भिजवायाच्या......न्हाणीघरातल्या "उतवावर"(घोंगडी वाळवन्या साठीचे साधन) सुकवायच्या.....त्याचा धुरकट वास घेत .........
पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या "म्याडनेस" ला तयार................!

ENGINEERS DAY 2013

"अमंत्रं अक्षरं नास्ति……
नास्ति मूलं अनौषधीम
अयोग्य: पुरुषो नास्ति …
योजकस्तत्र दुर्लभ॥" …
(ही संस्था अभियांत्रिकी योजक घडविते.)

हे सुभाषित आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दर्शनी भागावर "फ्रेम" होतं.अर्थात त्याकाळी खरोखरच अभियांत्रिकी योजकांची दुर्लभता होती. पण काळ बदलला आणि महाराष्ट्रात अभियांत्रिकी कॉलेजेसच्या अतिरेकाने "अभियंता"नावाचं वारेमाप पिक आलं,आणि "उत्पादन जास्त -दर कमी" हे व्यावहारिक सूत्र इथेही लागू पडलं,परिणामी अभियंत्यांचा "भाव" बराच गडगडला.याचाच परिणाम असा झाला की,अलीकडच्या २/३ वर्षात तर राज्यात अभियांत्रिकीच्या किमान २०/२५ टक्के जागा या शिल्लक राहू लागल्यात. आपला पाल्य अभियंता म्हणून पाहण्याचं पालकांचं स्वप्न काही गैर नाही परंतु विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि शिक्षण देणाऱ्या कॉलेजचा दर्जा यामुळे अलीकडच्या काळात शिकून बाहेर पडलेल्या अभियंता मित्रांमध्ये सुभाषिताला अपेक्षित असा "योजक" अभावानेच आढळतो.मित्रानो,ही बाब खेदाची असली तरी त्रिवार सत्य आहे.
आपण सर विश्वेश्र्वरैय्या यांच्या स्मृतींना वंदन करून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी "अभियंता दिन"साजरा करत असतो.त्यामुळे त्यांच्या ख्यातीला,त्यांच्या लौकिकाला साजेसं काम आपल्या हातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक अभियंत्याने करायला हवा,तरच सरांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्यासारखी होईल. अन्यथा इतर जयंत्या- पुण्यतीथ्या सारखे यातलेही गांभीर्य निघून जाईल.
माझ्या सर्व अभियंता मित्रांना "अभियंता दिनाच्या" खास शुभेच्छा …!
 —

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"
निसर्गचक्रानुसार "दिवस" येतात-जातात. त्यातले काही आनंदाचे तर काही दुःखाचे असतात. काही दिवस तर आयुष्यात नुसते यायचे म्हणून येउन जातात, पण एखाद-दुसरा दिवस मात्र आपल्याला खूप काही देऊन जातो.माझ्या दृष्टीने कालचा "गांधी जयंती"चा दिवस अगदी तसाच होता. 
निमित्त होते जीवन आधार संस्थेच्या "संविता आश्रम" या नवीन उपक्रमाचे उद्घाटन.…आमचे मित्र संदीप परब प्रमुख असलेल्याया संस्थेने तीन वर्षापूर्वी अणाव,ता. कुडाळ,सिंधुदुर्ग येथे "आनंद आश्रम" हा निराधार वृद्धांसाठीचा आश्रम सुरु केला असून तिथे सुमारे तीस निराधार वृद्ध सेवा घेत आहेत. त्यानंतर रस्त्यावर निराधार बनून फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी हा "संविता आश्रम" सुरु होत आहे.
या निमित्ताने इथे उपस्थित असणारी सर्वच मंडळी ही "समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ते कोणत्यातरी रुपात परत केले पाहिजे" अश्या प्रकारची भावना मनात असणारी होती.आणि एकाच सभामंडपात एवढ्या मोठ्या संख्येने जमलेली अशी मंडळी पाहून उपस्थित प्रत्येकालाच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने फार आशावादी व्हायला झाले.
यात ज्यांचा तरुण मुलगा देशासाठी शहीद झाला ते केरबा माने,सैनिकांच्या आणि पोलिसांच्या टोपीमध्ये आपल्या वडिलांचा चेहरा शोधणारी कुंडलिकची छोटी करिष्मा, शहीद मनीष कदम यांचे विरपिता. जेष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या फेसकॉमचे पदाधिकारी,सामाजिक कार्यात सढळहस्त असणारे रणजीत देसाई,पत्रकारितेच्या माध्यमातून दात्यांना वंचीतांपर्यंत पोहचवणारे शेखर सामंत,आश्रमाला वैदकीय सुविधा देणारे डॉ. विद्याधर तायशेटे,डॉ.कौत्सुभ लेले,या कामाला पोलिसी सहकार्य देणारे पोलिस निरीक्षक पवार,आश्रमाला विनामूल्य जागा देणारे चोपडेकर, सावंत, परब,तसेच जिल्ह्यातले अनेक इंजिनिअर,डॉक्टर,वकील,सामाजिक कार्यकर्ते,सामान्य नागरिक,विद्यार्थी आणि सर्वात महत्वाची मंडळी म्हणजे संदीप परब यांना साथ देणारी त्याची संपूर्ण टीम याप्रसंगी उपस्थित होती. सर्वांच्याच मनात समाजाप्रती काही ना काही काम करण्यासाठीची भावना दिसून येत होती,व्यक्त होत होती.आणि जर ही चळवळ अशीच सुसाट वेगाने चालत राहिली तर साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे" प्रार्थनेतला शब्द न शब्द आचरणात आल्याशिवाय राहणार नाही.अशी अशा ठेवायला हरकत नाही.

"आपट्याचे" पान….

रडून रडून दमले बिचारे,
एक "आपट्याचे" पान….
म्हणे,एका दिवसापुरताच का ?
आम्हांला "सोन्याचा" मान … 
झाडावरच हसत खेळत,
आमचे चालले होते छान…
लुटण्याच्या नादात तुम्ही,
अख्खं झाडच केलं निष्प्राण….

रांगता रांगता .....

रांगता रांगता कधी "रांगेत" आलो ते कळलंच नाही.
पालकांच्या आग्रहात्सव बालवाडी प्रवेशाची रांग, 
शिक्षकांच्या भीतीने लावलेली शाळेतली रांग,
मग"तिच्या"साठीची कॉलेजातली रांग,
फायली सांभाळत नोकरीसाठी रांग… 

पुढे संसारासाठीची रेशनची रांग,
याचक बनून उभे राहिलो ती देवासमोरची रांग,
मनात नसतानाही उभी राहतो ती मतदानाची रांग,
इतकंच काय पण शहरात मेलो तर चितेसाठीही रांग…. 
सवयच झाली रांगेची …रांग … रांग … आणि नुसती रांग 
घटका,दोन घटका मौजमस्ती साठी आलोय…. 
पण रांग मोडून "पोझ" देण्याचं धारिष्ट्यसुद्धा गमावलय …
बुधवारच्या सकाळी घरचा टेलिफोन वाजला की हल्ली माझी धड धड वाढायला सुरवात होते. तसा तो आजही वाजलाच… दोन खोल्यांच्या पलीकडे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या आमच्या सौभाग्यवतीचे कान अर्थातच "या"फोनच्या रिंगकडेच असावेत,परिणामी काही सेकंदातच रिंगचा तो कर्कश आवाज दोन व्यक्तींच्या संभाषणात परावर्तीत झाला.आता इथे घडणाऱ्या  संभाषणाचा संबंध थेट माझ्या आठवडाभराच्या रोजनिशीवर पडणार असल्याने माझे अस्वस्थ होणे क्रमप्राप्त होते.तब्बल अर्ध्या तासाने हे संभाषण "घरात खूप कामं पडलीत" या नोटवर संपलं.सौंच्या चेहऱ्यावर आजतरी कुठल्याही चिंतेची "गस्त" नव्हती. त्यामुळे पुढचा आठवडा विनावाद जाईल अशी शक्यता निर्माण झाली.  
नेमकं काय घडतं दर बुधवारी?….  
ज्योतिषशास्त्राच्या अतिरेकी नादाला लागलेली एक महिला दुर्दैवाने आमच्या सौंची जिवलग मैत्रीण आहे. ही बया दर बुधवारी सकाळी तरुण भारतची "खजाना" पुरवणी उघडते. त्यातले "ग्रह तुमचे अंदाज आमचा" हे सदर वाचते,नुसते वाचतच नाही तर बहुदा मुखोद्गत करते आणि त्यात लिहिल्याप्रमाणे आचरण ठेवणे किती मस्ट आहे, याची घरोघरी पारायणे करते. त्या "घरोघरी" आमचे घर क्रमांक एकवर आहे,याचा वेगळा उल्लेख करणे गरजेचे नसावे.
अर्थात या सदरातून बरीच धार्मिक माहिती शास्त्रोक्त स्वरुपात मिळत असल्याने आमचा कोणाचाच त्याला आक्षेप नाही, आक्षेप आहे तो त्याचा अतिरेक करण्याचा,परंतु त्यामध्ये सुचवल्याप्रमाणे विविध मंदिरांना(तेही अगदी नियोजित मुहूर्तावर) द्यायच्या भेटीगाठी,व्रतवैकल्ये,उपासतपास यासह खाण्या-पिण्यावरची बंधने आणि एकूणच त्याचा केला जाणारा गाजावाजा यामुळे आमची तर त्या आठवड्याची रोजनिशीच बहुतेक वेळा बदलून जाते.वर पुढचा बुधवार काय घेऊन येईल ते टेन्शन वेगळेच.   
खरंतर वर्तमानपत्रातील राशीभविष्य वाचणे हा बहुतेक जणांचा असतो तसा माझाही छंद आहे. पण तो वाचण्यापुरताच मर्यादित आहे. कारण दिवसभरात पावलोपावली ठेचाळणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे दोन ओळीतले आणि चार वाक्यांचे दिनमान कुठे म्हणून सावरणार ?…
पण अगदीच  मजेने घ्यायचं म्हटलं तर याचा उपयोग सुद्धा करता येतो. समजा घरच्या मंडळींचा बाहेर जाण्याचा "मूड"असेल आणि राशीत "दुर्घटना व अपघाताची शक्यता" असे काहीतरी असेल तर ते वर्तमानपत्र "पुढे" करून आपल्याला बिनधास्त "मागे" सरता येते.त्यातूनही हे ग्रह सुद्धा कोणाच्या राशीत कधी कसे येतील याचा नेम नाही तसंच ते एकटे आले तर ठीक पण बऱ्याचदा "युती"करूनच येतात. आणि चुकून एखाद्याला भाग्योदय तर बऱ्याच जणांना शत्रुपिडा देऊनच येतात.  (काही पक्षांच्या नेत्यांच्या राशीत मात्र या ग्रह"युती"वर गेली पंधरा वर्षे "आघाडी"मात करतेय हा भाग वेगळा )
दुसरं असं की,कधीतरी स्टेपनी नसलेली गाडी घेऊन आपण एकटे बाहेर जातो खिळा लागून गाडी पंक्चर होते आणि "अकारण मनस्ताप होईल" हे भाकीत तंतोतंत खरे करून देते. दुसऱ्या दिवशी मात्र "आज आवक बरी राहील" यात नक्कीची प्रिंटींग मिस्टेक होऊन "जा" चा "आ" झाल्याचा प्रत्यय येतो. राशीभविष्यातून आरोग्यासंबंधी नेहमी "नेत्र विकार संभवतात"किवां "सर्दीची पडशाची"वर्दी मिळते.रक्तदाब,मधुमेह अश्या प्रकारचे डीटेलिंग नसतंच परिणामी स्टोअर रूम मधली एखादी शिंक सुद्धा अचूक भाविष्यावणीचा दुजोरा देऊन जाते. "संततीकडून चांगली बातमी" (अर्थात निकालाची)कळायला ती हुशार तर असावीच लागतील. एखादा योग "वास्तुकर्ज कमी"करणारा असेल तर बहुदा तो त्या महिन्याचा ई एम आय  गेल्यानंतरचाच असू शकतो."सामाजिक क्षेत्रात नावलौकिक" व "लिखाणाला प्रसिद्धी"हे हल्ली खंर होतंय ते फेसबुकवर स्वतःच टाकलेल्या पोस्टमुळे. सरते शेवटी "कष्टाने जे कमवाल त्याने सुख समाधान येईल" हे वाक्य मात्र प्रत्येकाच्या राशीत एकदम फिट बसते. त्यामुळे राशिभविष्य हे वाचण्यापुरते मर्यादित ठेवावे जगण्यासाठी नाही. 

Sunday, October 6, 2013

"गावपण"

"गावपण" इसरान आमी, घातलव विकासाचो घाट ...
पायार धोंडो मारून सोताच्या,लावलव सगळी वाट ...

डायनिंग टेबला इली घरात, रव्हले पुजेपुरते पाट ....
सोरकुल,मडके वांगडा संपलो,उभ्या पंगतींचो थाट ....

ग्यासची गाडी गावात इल्यार,धरली चुलीनी वाट ...
मसनीत कपडे धुतल्यापासून, दुखना नाय पाट....

बजेटमधे बसले फ्रीज,आणि फुटान गेले माट .... 
एसी पंखे दिसले थयसुन,मेल्या वाऱ्याकच लागली नाट.... 

बाईर पंप जोडल्यापासून,शाप गंजान गेलो राट .....
कसलो सडो आणि कसली रांगोळी,उठाकच वाजतत आट.... 

पाटो वरवंटो मागरात पडलोहा,मिक्सरा बा तूच कायता वाट.... 
घिरटी जाती गेली काळाआड,आता गिरणी सतराशे साट ....

व्हायन-मुसाळ लग्नापुरता,ताव भाड्यान देता भट .....
हातात आमच्या कायच रव्हाक नाय,पण तेकाच म्हनतव "वट"  ....

कधी टीवी,कधी मोबाइल,पोरा घेवन बसतत नेट....
वर्षान कधीतरी होता त्येंची,झालीतर रानावनाशी भेट...  

"गावपण"इसरान आमी, घातलव विकासाचो घाट .....
पायार धोंडो मारून सोताच्या,लावलव सगळी वाट ....

(प्रभाकर सावंत)
  ०७/१०/२०१३ 

Tuesday, October 1, 2013

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"……

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"…… 
कुठल्यातरी प्रांतात तिथल्या प्रथेनुसार लग्नासाठी वराकडची मंडळी वधूच्या गावी जात.वधूच्या गावाच्या सीमेवर त्यांचे भव्य स्वागत होत असे. त्या नंतर वधुकडची मंडळी वराला जवळजवळ आपल्या ताब्यातच घेत असत आणि सोबत आलेल्या वऱ्हाडी मंडळीना वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हैराण करून सोडत. अश्याच एका लग्नासाठी "वर" निघाला असता त्याच्यासोबत वऱ्हाडी म्हणून फक्त तरुण मंडळीनी जायचे ठरवले. वयस्कर माणसे आपल्याला मनाप्रमाणे मौजमस्ती करू देत नसल्याने त्यांनी सगळ्याच जेष्ठ मंडळीना निरनिराळी कारणे सांगून न येण्याची विनंती केली. जाणत्या माणसाना नक्की माहित होते की,वधूकडची मंडळी ह्या तरुण मंडळीना सळो की पळो करून सोडतील आणि या लग्न सोहळयात विनाकारण वाद होतील.पण त्यांचा नाविलाज होता. 
वरासहित सगळी युवा फौज समानसुमान बांधून जायला निघाली. सोबत कुणीही जाणती माणसे नसल्याने अर्थातच सर्वांची मजामस्ती जोशात सुरु होती. इकडे गावाच्या सीमेवर वधूकडील मंडळीनी त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी केली होती. सर्वच पाहुणेमंडळी तरुणतुर्क दिसल्याने वधूकडील मंडळींचा त्यांची गंमत करण्याचा हुरूप आणखीनच दुणावला. झालं,वराकडील मंडळीवर स्वागतालाच पहिला बॉम्ब पडला.
"तुमची एकूण पन्नास मंडळी आहेत आणि तुमच्यासाठी हे खास पन्नास बकरे आहेत. या सर्वांचं मटण करून खायचं आणि मगच सीमेच्या आत यायचं"........."काही लागलं सवरलं तर आम्ही आहोतच सेवेला"
या एकाच अटीवर तरुण मंडळी बरीच चक्रावून गेली. प्रत्येकाने खूप विचार करून पाहीला पण प्रत्येकी एक बकरा खायचा म्हणजे कसं शक्य आहे.असली कसली विचित्र अट.हे अशक्य आहे वैगरे वैगरे सुरु झालं. समोरचा वधूपक्ष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता.बराच वेळ गेला, तोडगा तर निघाला नाहीच, उलट भांडणाला सुरवात झाली. वाद विकोपाला गेले आणि वराकडील मंडळी वरासहीत परतीला लागली.
तेवढ्यात एक साठीपार व्यक्ती पुढे आली जी वराकडील होती आणि गुपचूप सामानाच्या पेटाऱ्यातून लपून आली होती. त्यांनी वधूपक्षाचा पन्नास बकऱ्याचे जेवण जेवण्याचा प्रस्ताव मान्य केला. ती व्यक्ती म्हणाली
"आमची पन्नास मंडळी आहेत,आम्हाला पन्नास बकरे द्या,आम्ही रोज एक बकरा कापून सर्वांसाठी जेवण करू. पन्नास संपले कि सीमेच्या आत प्रवेश करू,तोपर्यंत बसा आमच्या सेवेसाठी काही लागलं सवरलं बघायला या इथेच"
वधुकडच्या मंडळीना हा तोडगा पुरता तोंडघशी पाडणारा होता त्यामुळे अर्थातच तिढा सुटला,लग्न झाले. आणि जुन्या-जाणत्या,अनुभवी माणसांची समाजरचनेत खूप गरज असते हे ही अधोरेखित झाले.
आज ही कधीतरी आजीकडून ऐकलेली गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे आजचा "जेष्ठ नागरिक दिन".
मित्रहो आपल्याला अश्या बऱ्याच बाबीत या अनुभव संपन्न जुन्याजाणत्यांची फार गरज आहे.आजच्या लहान मुलांना त्यांच्या संस्काराची गरज आहे,त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे त्यांचा यथोचित आदर सन्मान होणे हि काळाची गरज आहे. चला तर मग स्वतःच्या घरापासूनच सुरवात करूया जेष्ठांना सुखी-आनंदी ठेवण्याची,त्यांची काळजी घेण्याची ……. 


Friday, September 27, 2013

"म्हाळ"

"म्हाळाचे"बदलते स्वरूप …

सध्या पितृ पंधरवडा सुरु आहे. त्यामुळे रोज कुठे ना कुठे महालयाचे (आमच्या मालवणीत "म्हाळाचे") आमंत्रण हमखास असतेच. अश्याच एक-दोन ठिकाणी त्याचे बदलते स्वरूप अनुभवायला मिळाले.
पूर्वीच्या काळी गावात क्वचितच दोन चार "म्हाळ" असायचे.त्यामुळे गावात यंदा कुठे म्हाळ आहे,याचं ऒत्सुक्य लहानथोरांना असायचं. मग तो दिवस आला की,जवळपास अख्खा गाव तिकडे लोटायचा.वरण-भात,उसळ आणि वडे-सांभाऱ्यावर एथेच्छ ताव मारायचा.तनामनाने तृप्त व्हायचा आणि त्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायचा,इकडे यजमानी सुद्धा (अन्नदानाच्या) पुण्यकर्माच्या समाधानाने भरून पावायचा.
आज त्यामानाने खाण्यापिण्यात फार सुबत्ता आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच घरांमध्ये ठराविक कालांतराने "म्हाळ"घातला जातो.मात्र बहुतेकांनी आपल्या "सोशल स्टेटस"प्रमाणे त्याचा "इव्हेन्ट"केलाय,जेवणावळीत खास मेनू,उपवासकरी मंडळीना स्पेशल गिफ्ट इत्यादी.
या सर्व गोष्टी काळाच्या ओघातला बदल असेलही कदाचित,पण तो स्वीकारार्ह तोपर्यंत असेल,जोपर्यंत कोणत्याही घरात वयोवृद्धांचा "दीनवाणा चेहरा" दिसणार नाही आणि गावात"वृद्धाश्रमाची पाटी"दिसणार नाही.

Thursday, September 19, 2013

"पुंडलिक वरदे"……

"पुंडलिक वरदे"…
काल एक "अचानक भजन मंडळ"चक्क आमच्या घरी अवतरलं, अर्थात चतुर्थीच्या काळात घरी भजन येणे यात काही विशेष नाही, पण आज घरी आलेली सगळी भजन मंडळी मात्र व्हीव्हीआयपी होती,आणि अश्या प्रकारच्या मंडळींचं भजन मंडळ असू शकते यावर माझा काय कोणाचाही विश्वासही बसणार नाही.
आमच्या तोंडाचा "आ" मिटेपर्यंत ही मंडळी, पेटी( हार्मोनिअम),पखवाज,तबला,टाळ या जथ्थ्यासह गणपतीसमोरच्या सतरंज्यांवर दाटीवाटीने बसली सुद्धा….
ताबडतोब राजनभाईनी पेटी उघडली आणि तबला लावण्यासाठी सूर दाबून धरले,त्या सुरांवर खाली समोरासमोर बसलेल्या प्रमोददादानी पखवाज तर दीपकभाईनी तबला डगा "लावून"घेतला. प्रमोददादांच्या बाजूलाच बसलेल्या संदेशभाईनी "चक्की" घेतली. भजन मंडळीतल्या सर्वांशीच "बरे"असल्याने बहुदा त्यांच्यावर  "तालरक्षकाची" जबाबदारी पडली असावी.मध्येच प्रमोददादांच्या पखवाज वादनाला संदेशभाई कडून अपेक्षित "ताल" मिळाला नाही तर त्यांचा "तोल" जाऊ नये म्हणून अतुलजीनी सुद्धा एक छोटी "चक्की" हातात ठेवली होती. वैभवजी आणि जीजी या सर्वांबरोबर बाकी जुनिअर मंडळींच्या हातात काश्याच्या टाळांच्या दोऱ्या होत्या.
इतक्यात शुभ्र पांढऱ्या वेषात डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या मोठ्या दादानी "बुवा" म्हणून पेटीचा ताबा घेतला.आणि मघापासून "बुवा"वाटत होते ते त्यांचे पट्टशिष्य असलेले राजनभाई खाली सतीशभाईंच्या शेजारी जाऊन बसले. बुवांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीने सगळ्यां मंडळीवर एकदा हसतहसत नजर फिरवली आणि एक सुंदर आलाप मारून भजन सुरु करण्याचा "कौल" घेतला…
"तन मन धन माझे … राघवा रूप तुझे" ….प्रार्थना संपली.
शिवशंकरा गौरीहरा …. महादेवा डमरूधरा…. गणही घुमला.मधेच रूपाचा अभंगही रंगला. 
पुढे गजर सुरु झाला….  "तोंडवली- वायंगणी…. समुद्राचं निळ पाणी"….
सरळ सरळ इथेही "समुद्रविश्वाचा" गजर होतोय हे पाहून जीजी आणि वैभवजींची चुळबुळ सुरु झाली.पण पखवाजवरून गजराला मात्र चांगली साथ मिळत होती,ते पाहून त्यांनीही टाळाचा ठेका धरला  तेवढ्यात विजयराव आणि विनायकराव हे दोन चाकरमानी उपस्थित झाले.तसही सगळ्याच भजनात चाकरमानी थोडे लेटच असतात.विजयरावांनी उभ्या उभ्याच कोण कुणापासून किती अंतरावर बसले आहे याचा "सर्व्हे" केला,आणि अतुलजी आणि प्रमोददादांच्या मध्ये जाऊन बसले.विनायकराव वैभवभाईना खेटले. तितक्यात कोणीतरी विजयरावांकडे टाळ दिला. सतत उद्योगी माणूस,त्यामुळे कधी टाळ कुटायची सवय नसल्याने खरतरं त्यांचा "ताल" चुकत होता पण ते माझ्या भजनात मुद्दामहून ताल चुकवतात असा "बुवांचा"समज झाला.पण त्यांनी तो दाखवला नाही.
होता होता पूर्वार्धाचा गजर संपला. बुवांनी मोठ्या उत्साहाने गौळण सुरु केली,हिंदी गाण्यावरच्या चालीतली गौळण आणि त्यात दह्या-दुधाचा आपला आवडता विषय असल्याने कलाप्रेमी पखवाजवाले कमालीचे ठेक्यात होते पण मध्येच कोल्हापूर फ़ेम"गोकुळ"शब्द आला आणि त्याचं अवसानच गळालं. तिकडे तबला-डग्याची साथ बरी होती पण पुढे गौळण "मथुरा" बाजार सोडून "मडुरा" जंक्शनला गेली आणि त्यातला "वाट अडविणारा कान्हा" आपल्यालाच उद्देशून आहे हे समजल्यावर त्यांचीही चौपट थंडावली. पुढच्या अभंगात कुठेतरी "वाणी" शब्द आला तेव्हा मात्र चारही भाईनी (राजन,प्रमोद दीपक संदेश) एकमेकाकडे पाहून स्मितहास्याने मनातल्या मनात 
"श्रीश्रीश्री" म्हणत माना डोलावल्या,आणि आपल्याकडे सुद्धा भविष्यात असे काही घडेल का? ह्या विचारात सतीशभाई मात्र एकटेच गढून गेले,मध्येच "मायनिंग" पासून अनेकांच्या "जॉयनिंग"चे संदर्भ गाण्या गाण्यातून ऐकायला मिळाले.शेवटी गजर घुमला… 
"श्री गजानना,आलो तुझ्या दर्शना … सद्बुद्धि दे,दे साऱ्या नेतेगणा"… भजन संपलं,
आनंद याचाच की सर्वांनी भजनाचे पावित्र जपत,कुठेही कसलाही संदर्भ न जोडता भजन एन्जॉय केलं.
न बोलावता भजन आल्याने "सुपारी"चा प्रश्नच नव्हता. मात्र आयत्या वेळी उरल्यासुरल्या करंज्यावरच वेळ मारून नेली.त्यानंतर गरमागरम चहा वाटतानाच कोणीतरी जोराचा "चटका"दिला आणि लक्षात आलं "आयला आपण भजनात चक्क झोपलो होतो तर"…… 

Wednesday, September 11, 2013

"बाबल्याची शाळा"

"बाबल्याची शाळा"
आमच्या बाबल्याचा चाकरमानी भाऊ दरवर्षी गणपती सणाला बायका पोरांसह रुबाबात गावी येतो. पण या अकरा दिवसात बाबल्याला त्याची काहीही आर्थिक मदत होत नाही. प्रतिवर्षी हे महाशय फक्त गणपतीच्या मूर्तीचा (आर्थिक) भार सर्वांसमक्ष न चुकता उचलतात त्यामुळे वाडीत असा समज होतो की, चतुर्थीचा सगळा खर्च बाबल्याचा "चाकरमानी"भाऊ करतो.कुटुंबाचा एकोपा दाखवण्यासाठी काही विषय बोलण्यासारखे नसतात परिणामी बाबल्याची घुसमट होत असते.
यंदा मात्र बाबल्याने त्याची "शाळा"घालायची ठरवली.
वाडीतली मंडळी गणपती आणण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गणपतीच्या शाळेत पोचली.प्रत्येकाने पाटासमोर अकरा रुपये,नारळ- अगरबत्ती ठेवली,गणपतीच्या मूर्तीवर मलमली शाल पांघरली आणि एकेक करून मुर्त्या टेम्पोत भरू लागले.
(आमच्याकडे मूर्तीसमोर अकरा रुपये ठेऊन मूर्तीची किंमत मालकाकडे देण्याची पद्धत आहे.)
गेल्यावर्षी बाबल्याचा गणपती दीड हजाराचा असल्याने वार्षिक महागाई वाढ धरून बाबल्याच्या चाकरमानी भावाने सतराशे रुपये शाळा मालकाच्या हातावर ठेवले, तरीही मालकाचा चेहरा काही उजळला नाही.
म्हणून चाकरमानी म्हणाला "आणि देवक व्हये काय?"……
"व्हय तर …
"चाकरमाण्यानु, यंदा बाबल्यान साडे स हजाराचो गणपती सांगलल्यान तेवा आजून चार हजार आठशे देवा" …
"काय ?…… साडे स हजार …… " चाकरमानी कोमात
इकडे बाबल्याच्या ज्या मित्रांना बाबल्याची हि "शाळा" माहित होती ते चाकरमान्याला चिडवू लागले
"बाबल्या,दर वर्षाक येदोच गणपती सांगा, तुमच्या वळयत सोभान दिसता"………
दरम्यान चाकरमानी दादाचा चेहरा मात्र इतका काळवंडला की, तो त्याच्या स्व:ताच्या देहालाही शोभत नव्हता........

Sunday, September 1, 2013

राजसाहेब ठाकरे म्हणतात की "मी अपघाताने राजकारणात आलो" (आता खरं-खोटं त्यांनाच माहित)
पण त्यांच्या "दिलसे" आगमनाने,गेल्या निवडणुकीत युतीला मोठा "राजकीय अपघात"झाला हे मात्र शंभर टक्के खरं …. 
(म्हणूनच एक विनंती…… "आतातरी लावा महायुतीचा टिळा …आणि २०१४ चा अपघात टाळा"… )

Monday, August 26, 2013

एक होता ऑगस्ट


 एक होता ऑगस्ट
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीने सुरवात होणारा ऑगस्ट यंदा सणासुदीसह अनेक अरिष्टांचा "कॉम्बो प्याक" घेऊनच आला. क्रांतीदिन,स्वातंत्रदिन या राष्ट्रीय सणाबरोबर हिंदुना नागपंचमी,गोकुळाष्टमी,मुस्लीम बांधवाना रमजान तर पारसी समाजाला पतेतीचा आनंद देऊन गेला.
श्रावणमासी हर्ष मानसी ……. अश्या वर्णनाचा, व्रत वैकल्यांचा श्रावण सुरु झाला तोच मुळी सीमेवर पाच जवानांना शहीद करून.... रमजान सारख्या पवित्र महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानने "संधी" साधून शस्त्रसंधीचे (किती गोंडस शब्द) उल्लंघन केले,आणि आमचे पाच शूरवीर धारातीर्थी पडले. त्यानंतर आलेला स्वातंत्रदिन जवानांना केवळ श्रद्धांजली वाहून आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन साजरा झाला. या दिवशीच्या भाषणांमध्ये हा मुद्दा कमी आणि सत्ताधारी-विरोधकांचा कलगीतुराच जास्त रंगला. आणि दरम्यानच्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या नागापेक्षा राजकारण्यांचेच विषारी फुत्कार लोकांनी झेलले. सामान्य जनतेमध्ये मात्र शहीदाप्रती अनेक कार्यक्रमातून आत्मीयता दिसून आली.
नंतरच्या नारळी पौर्णिमेने मच्छिमार बांधवांचा "सिझन" सुरु करून दिला.त्यामुळे मत्स्याहारीना थोडा "दराचा"दिलासा मिळाला. त्याच दिवशीचा "रक्षाबंधनाचा"सोहळा समस्त भाऊरायाना बहिणीप्रतीच्या कर्तव्याची "वार्षिक" आठवण करून गेला. मात्र हातातल्या राखीचा रंग उडण्याआधीच मुंबईत कोणा एका बहिणीवर कोणाच्या तरी भावांनी "पाशवी बलात्कार" केला. जंगलातला वणवा आता गावात आला, घरात यायला फारसा वेळ लागणार नाही हे जनतेच्या आता लक्षात येऊ लागलय, जनता रस्त्यावर उतरली,त्याची बातमी झाली.......पुढे काय?
डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी हे भोंदू बाबा किवा जादूटोण्यावाले असावेत असा अंदाज आहे, पण डॉक्टरना मारताना साल्यानी आपल्या अघोरी विद्या किवा जादू टोण्याचा वापर न करता "पोलादी शस्त्र" वापरण्याची काय गरज होती? इतक्या शांत डोक्यावर गोळी झाडण्याचा विचार नक्की येतो तरी कुठून ? 
या हत्येचा शोक करणारी राजकीय मंडळी म्हणतात "दाभोलकरांसारख्या माणसाची हत्या होईल याची जरा जरी कल्पना असती तर खबरदारी घेतली असती"…आता कुणाचं कधी काय होईल? याचा सरकारला "प्रश्नकुंडली" मांडून अंदाज द्यायला साळगावकर सुद्धा उरले नाहीत. साहित्य,ज्योतिष आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर भरारी घेतलेले ज्योतिर्भास्कर आता यापुढे आशीर्वादासाठी आपल्यात असणार नाहीत. पत्र्याच्या  झोपडीपासून ते मोठाल्या बंगल्याच्या भिंतीवर स्वताची खास जागा राखून ठेवणारे "कालनिर्णय" पोरकं करणारा हाच तो महिना 
बाकी शहरातल्या खड्ड्यांवर महिनाभरात अनेक चर्चासत्र रंगलीत,आमदारांची "टोल'वा-टोलवी चित्रफितीत पाहता आली. सरकारने अन्नसुरक्षेतुन "मतसुरक्षेची" चांगलीच तजवीज करुन घेतली,तेलंगनाचे
 "रणांगण" काहीसे शांत होत चाललय  मात्र "स्वतंत्र विदर्भाचा" गर्भ जोमाने वाढू पाहतोय,रस्त्यावरचे भीषण अपघात,आमिष दाखवून बलात्कार,चोऱ्या- दरोडे,एकतर्फी प्रेमातले हल्ले नैराश्यातून आत्महत्या या दैनंदिन घडामोडी झाल्याने त्या  हल्ली बातमीसाठी मोठा विषय ठरत नाहीत. या महिन्यात क्रिकेटज्वर जवळपास अजिबात नसल्याने क्रीडापानावर फारकाळ कोणाची नजर स्थिरावली नाही.
कांद्याचा वाढलेला दर आणि रुपयाचा घसरलेला दर साठ-पासष्टीला पोहोचला.सेन्सेक्सने आपटी खाल्याचे वाचले पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र नागपंचमीच्या दरम्यान आकडेबहाद्दुराना हुलकावणी दिलेल्या पंज्याने (पंचमीला ५ चा आकडा फीट असतो असे म्हणतात ) पुढे कधीतरी जोडीने येउन भरपाई करून दिल्याची खबर आहे. सोन्याला सुद्धा या महिन्यात चांगले दिवस आले. या महिन्यात चुकल्या-चुकल्या सारखे वाटते,कारण एकही घोटाळा उघडकीस आला नाही. कदाचित प्रसार माध्यमांना वेळ नसल्याने सध्या "वेटिंग"वर असावा अशी अपेक्षा.
काही असलं तरी  महिनाच्या अखेरीस असणारा "गोपाळकाला" मात्र नक्कीच सुखकारक असेल. जनतेच्या आशा-आकांक्षांचे मनोरे न ढासळता गगनचुंबी होतील आणि सुखाची हंडी फोडून सर्वानाच "सुखाची चव "चाखता येईल

"ग"- ग्रामविकासातला …….

"ग"- ग्रामविकासातला ……. 
अपवाद वगळता राजकीय मंडळीनी गावाचा विकास हा रस्ते,इमारती,गडगे आणि गटारे या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना होऊ दिला नाही,कारण स्वतःच्या प्रयत्नातून गावच जर स्वयंपूर्ण होऊ लागलं, तर गावपुढाऱ्यांच राजकीय नुकसान होण्याची शक्यता असते. अर्थात गावाच्या विकासाला राजकीय पाठबळाची गरज असते हे १०० % मान्य आहे. पण त्यासाठी साठमारी नको.गावा गावातल्या सर्वच पक्षाच्या राजकीय पुढारी मंडळीनी आपल्यातला राजकीय "ग" (ताठा,अहंकार) थोडा बाजूला सारून एकत्र येण्याची गरज आहे. त्यातून सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईलच,आणि सोबत गावात आरोग्य,शिक्षण,कृषी,पर्यावरण संस्कार,श्रमप्रतिष्ठा यासारख्या अनेक विषयासाठी काम करणे शक्य होईल.जे आगामी काळाचे खरे विकासाचे मुद्दे असतील. —