Sunday, October 27, 2013

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"
दिवाळीचा फराळ कधी तोंडात पडेल तेव्हा पडेल पण त्याच्या तयारी निमित्त सध्या इतकी कामे आणि कटकटी मागे लागतात की "फराळ नको …. गुऱ्हाळ आवर" असे म्हणायची वेळ येते. बहुदा सगळ्यांनाच या गोष्टीचा कमी अधिक अनुभव असण्याची शक्यता आहे (नसल्यास मात्र स्वतःला भाग्यवान समजावे ).
दरवर्षी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याची गृहिणीना भारी हौस असते. मग असे प्रयोग करताना त्यातला एखादा पदार्थ चुकून बिघडला तर मात्र कोणाचीच खैर नसते. सुरवात नेहमीच "रेसिपी" देणाऱ्या बाईंपासून असते आणि शेवट अर्थातच नवरोबावर असतो.(निवडक साहित्य आणले नाही अश्या आशयाने).
बहुतेक ठिकाणी प्रतिवार्षिक काही ना काही बिनसतचं… कधी लाडवातला रवा/बेसन कच्चे असते तर कधी करंजीतल्या सारणा"ची गोडी कमी/जास्त होते.चहा सोबत चांगला लागावा अशी अपेक्षा असलेला "चिवडा" जरा जास्तीचा तिखट होतो आणि "चकना"म्हणूनच जास्त वावरतो.साधी शंकरपाळी सुद्धा कधी कधी दातांचा टणकपणा तपासण्याचे हत्यार बनून समोर येते."चकलीबाई" सर्वगुणसंपन्न असणे हा तसा नशिबाचाच भाग म्हणावा लागेल.
आज आमच्या घरीही चकल्यानी हिला चकवलं.फराळाच्या "नमनालाच कढईभर तेल" वाया गेलं. त्यामुळे एखाद्या पारंपारिक मतदारसंघात डीपौझिट जप्त झाल्यावरही उमेदवाराला वाटणार नाही इतकं वाईट सौ. ना वाटलं. …
हे सगळं अनुभवल्यानंतर आमच्या कोकणातली पूर्वीची दिवाळी आणि दिवाळीतला एकमेव फराळ आठवला. …… "पोहे"…… नवीन कापणीतले वालयचे भात भिजवायचे आणि गिरणीवरून लाल पोहे कुटून आणायचे…. चहातले पोहे,गोडे पोहे आणि कांदा पोहे …. खा की खा…. पदार्थ बिघडण्याची शक्यताच नाहीच चुकून कधी बिघडलं तर पोटचं …
 

No comments:

Post a Comment