Tuesday, March 4, 2014

"सूत्र"…… निवेदनाचे…….

"सूत्र"…… निवेदनाचे……. 
"निवेदन किवा सूत्रसंचालन ही एक चांगली कला आहे आणि सध्या ही कला "करिअर"साठी एक पर्याय म्हणून पुढे आलेली आहे.परंतु हे सर्व "कार्पोरेट" जगतासाठी किवा मोठ्या कार्यक्रमांसाठी ठीक आहे. इथे स्थानिक पातळीवरील छोट्या मोठ्या कार्यक्रमात या 'निवेदकाला' किवा 'सूत्रधाराला' कोणकोणती "सुत्रे" सांभाळावी लागतात आणि आयोजक त्याचा कसा यांत्रिकपणे उपयोग करून घेतात,याचा एक किस्सा परवा आमचे मित्र बंड्या जोशी यांनी एका कार्यक्रमात ऐकवला.
दोन पुढाऱ्यांच्या किवा वक्त्यांच्या कंटाळवाण्या भाषणादरम्यान त्याचाच धागा पकडून निवेदक एखाद्या कवितेतल्या दोन सुंदर रचना ऐकवतो न ऐकवतो,तेवढ्यात नेमकी त्याच्याकडे आयोजकांची चिठ्ठी येते.
"एम एच …. नंबरच्या जीप मुळे वाहतुकीला अडथळा येत आहे.कृपया चालक किवा मालक यांनी ती बाजूला घ्यावी"
किवा एखादा भूक तहान विसरण्यासंदर्भातला शेर ऐकवतो आणि लगेचच चिठ्ठी येते
"सभागृहाच्या डाव्या बाजूला शाकाहारी आणि मांसाहारी जेवण्याची व्यवस्था आहे,कृपया सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा"
अश्या अनेक सूचना खरंतर त्याच्या कामाचा भाग नसतानाही त्याला माईक वरून द्याव्या लागतात.अश्या नुसत्या सूचनाच नाहीत,तर त्याबरोबर टेबलावरील पुष्पहार,शाली उचलणे त्याच्या घड्या घालणे,फोटोग्राफरच्या सूचनेनुसार समोरच्या फ्लॉवर पॉट,पाण्याचे तांबे,बाटल्या यांच्या जागा बदलणे.कधीकधी तर लटलटणाऱ्या पोडीयम खाली सोडा बाटलीचे बुच किवा पुठ्ठा घालणे आणि माईक स्ट्याण्ड हलवणे ही कामे तर अपरिहार्यपणे करावी लागतात.यातून जेव्हा आणि जसा "वेळ मिळेल" तेव्हा निवेदन करून "वेळ मारून न्यायची"असा एकंदर प्रकार.
कार्यकर्ता म्हणून स्टेजशी माझेही नाते फार जवळचे असल्याने मलाही भागात बऱ्याचदा सूत्रसंचालकाची जबाबदारी निभाऊन न्यावी लागते. असेच एका सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात मी निवेदक होतो.व्यासपीठावर बरीच नेतेमंडळी होती,त्यात एक नवनियुक्त महिला लोकप्रतिनिधी होत्या ज्या बहुदा पहिल्यांदाच व्यासपीठावर बसल्या असाव्यात.त्यांच्या पदरात एक तान्हे बाळ आणि एक नवरा असे दोन जीव होते,जे त्यांनी सोबत आणून व्यासपिठासमोरच्या पहिल्या रांगेत बसवले होते.कार्यक्रम सुरु झाला.
कार्यक्रम आणि निवेदन ऐन बहरात आल्यावर त्या तान्हुल्याने अगदी तालासुरात रडणे सुरु केले.काहीकेल्या बिचाऱ्या दमलेल्या बाबाला ते बाळ गप्प होईना.कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून मी मग त्यालाही व्यासपीठावर आणून त्याच्या आईकडे सुपूर्द केले.कार्यक्रम थोडासा पुढे सरकला. थोड्यावेळाने त्याची पुन्हा रडारड…मग व्यासपीठाच्या खाली बाबाकडे……
पुन्हा आई …पुन्हा बाबा ……
आणि मध्ये मी म्हणजे वाहतुकीचे साधन…… यातून जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा निवेदन …

No comments:

Post a Comment