Tuesday, March 4, 2014

"मूग गिळून गप्प बसणे"

"मूग गिळून गप्प बसणे"
पूर्वीच्या काळी भिक्षूक भिक्षा मागायला बाहेर पडत त्यांना फक्त पाचच घरात भिक्षा मागायची परवानगी असायची.पाच घरात जरी काही मिळाले नाही तरीसुद्धा सहाव्या घरी जाऊ नये असा दंडक असायचा,परिणामी एखाद्या दिवशी पाच घरात काही मिळाले नाही तर उपाशीपोटी राहण्याची वेळ बिचारयांवर येत असे. अश्यावेळी हि मंडळी थोडेसे भाजलेले मूग सोबत ठेवायची आणि ते खाऊन त्यावर पाणी पिऊन झोपी जायची. यावरूनच पुढे "मूग गिळून गप्प बसणे" असा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन दिवसात मी केलेल्या पाच कार्यालयांच्या वाऱ्या……
साधारणपणे "सरकारी ठेकेदार"म्हटल्यावर "बदनाम" त्यामुळे समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार वाईट असतो.सरकारी कामात भ्रष्टाचार करणे,बोगस,दर्जाहीन कामे करणे,सरकारचा पैसा खोऱ्याने ओढून घरी नेणे या सारख्या अनेक अंधश्रद्धा त्याच्याविषयी असतात.या सगळ्या समजुतीत काही टक्क्यांचे तथ्य असले तरी उरलेल्या ठेकेदारांची स्थिती मात्र फारच अवघड असते.
त्या बिचाऱ्याला प्रत्यक्षातली धंद्यातली स्पर्धा आणि राजकीय हस्तक्षेपाच्या कचाट्यातून काम मिळवणे,त्यानंतर बँकांच्या तुंबड्या भरत पैसा उभा करणे,कामाच्या ठिकाणच्या स्थानिक दहशतवादाला सामोरे जात आणि संबंधित "साहेब" लोकांच्या कलेने काम पूर्ण करणे,तद्नंतर कार्यालयातल्या "बाबू" लोकांचे पाय धरत बिल काढणे,(या बाबू प्रकारात मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देणाऱ्या टेबल पासून प्रत्यक्ष चेक हातात मिळेपर्यंतची सगळी मंडळी येतात.) अश्या नाना कळा त्याला सोसाव्या लागतात.
आम्ही सुद्धा "सरकारी ठेकेदार"याच जातकुळीतले, सध्या मार्च जवळ आल्याने बिलांची तयारी सुरु झालीय,ज्या कार्यालयांकडून "बिल"मिळणे अपेक्षित आहे अश्या पाच कार्यालयांना गेल्या दोन दिवसात धडक देऊन पाहिली पण कुठूनच काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पुढचा महिना "मुग गिळून गप्प बसण्याचा"आहे की काय अशी शंका येऊ लागलीय,कारण पैसे आपलेच असले तरी "भिक्षा" मागावी या नम्रतेने "बिलासाठी"याचना करावी लागतेय अलीकडे काहीठिकाणी ……

No comments:

Post a Comment