Tuesday, March 4, 2014

"टोकन"…….

"टोकन"……. 

साधारण नव्याण्णव - दोन हजार सालातली गोष्ट…. त्यादरम्यान आमचे राजापूर येथे टेलिफोन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु होते.साईटवर आमचे नेहमीचे बेळगावी कामगार होतेच,परंतु कामाचा आवाका थोडा मोठा आणि मुदत कमी असल्याने स्थानिक गवंडी कामगारांचा शोध सुरु होता.असाच एके दिवशी "रवी"नावाचा मुकादम आला आणि त्याने गवंडी कामगार पुरवण्याची हमी घेतली. घासाघीस करून कामाचे दरही ठरले,आणि रोख दहा हजार रुपयांचा एडवांस घेऊन उद्यापासून कामगार आणण्याच्या बोलीवर तो निघूनही गेला.साईटवर सुपरवायझरला आवश्यक त्या सूचना देऊन मीही घरी आलो.
सगळे वार कॅलेंडरप्रमाणे उजाडत होते पण रवी मुकादमचा उद्या काही केल्या उजाडेना.आठ दिवस संपले…. पंधरवडा उलटला, पण संजय आणि कामगारांचा पत्ता नव्हता.त्याचे घर आम्ही पाहिले नव्हते आणि त्यावेळी मोबाईल नसल्याने त्याला शोधणेही अवघड होऊन बसले.
बऱ्याच प्रयत्नाने आमच्या सुपरवायझरने एकदा त्याला गाठले आणि माझ्याशी घरच्या फोनवर बोलणे करून दिले. मला निशब्द करणारी त्याची अस्खलित थापांची दोन चार कारणे ऐकून दोन दिवसात कामगार किवा पैसे परत करण्याच्या अटीवर आमचे संभाषण संपले.
पुन्हा तोच प्रकार,आता तर सुपरवायझरला भेटूनही तो दाद देईना.
दर आठवड्याला बाजाराच्या दिवशी माझे साईटवर जाणे असायचे. पुढे महिनाभराने असाच एका बाजाराच्या दिवशी माझे त्याच्याकडे लक्ष नसतानाही तो स्वतःहून माझ्या गाडीजवळ आला. आणि अत्यंत दिलगिरीच्या सुरात म्हणाला
"साहेब,खरंतर तुम्ही दिलेले सगळे पैसे मी कामगारांना दिले पण त्यां हरामखोरांनी फसवले,तरीही माझी नैतिक जबाबदारी म्हणून आधी मी तुमची माफी मागतो आणि सगळे पैसे आताच परत करतो"
यावर त्याच्यावरचा राग जाऊन मला त्याची दया आली. मनात आले, "दोन तीन हजार कमी दिलेस तरी चालतील" असं त्याला सांगून टाकावं,पण नाही बोललो.आता माझं पूर्ण लक्ष त्याचा हात त्याच्या प्यांटच्या खिशात कधी जातो याच्याकडे लागलं.
तेवढ्यात त्याने खिशातून राजापूर अर्बन बँकेचे १५ नंबर असलेले "टोकन"(त्याच्या भाषेत टोपन) काढले आणि म्हणाला,साहेब आज बाजार असल्याने बँकेत गर्दी आहे. मी हे "टोपन" घेऊन आलोय,तासाभरात पेमेंट मिळेल.तुम्ही साईटवर थांबा मी पैसे घेऊन येतो.
संध्याकाळी खरा सूर्य मावळला तरी हा "रवी"काही उगवला नाही.
मी कंटाळून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच समोरचे सॉ मिल मालक आले. इच्छा नसतानाही त्यांना हा किस्सा सांगायला सुरवात केली,हसत हसतच त्यांनी माझे बोलणे मध्येच थांबवले,आणि मला विचारले "तुम्हांला त्याने राजापूर अर्बन बँकेचे १५ नंबरचे टोकन दाखवले कि नाही"…मी काय तो प्रकार समजलो.
पुन्हा कधी तो रवी भेटला नाही पण रवीचे "टोकन" पाहणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चार पाच मंडळींची भेट मात्र झाली.

No comments:

Post a Comment