Monday, August 26, 2013

एक होता ऑगस्ट


 एक होता ऑगस्ट
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीने सुरवात होणारा ऑगस्ट यंदा सणासुदीसह अनेक अरिष्टांचा "कॉम्बो प्याक" घेऊनच आला. क्रांतीदिन,स्वातंत्रदिन या राष्ट्रीय सणाबरोबर हिंदुना नागपंचमी,गोकुळाष्टमी,मुस्लीम बांधवाना रमजान तर पारसी समाजाला पतेतीचा आनंद देऊन गेला.
श्रावणमासी हर्ष मानसी ……. अश्या वर्णनाचा, व्रत वैकल्यांचा श्रावण सुरु झाला तोच मुळी सीमेवर पाच जवानांना शहीद करून.... रमजान सारख्या पवित्र महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानने "संधी" साधून शस्त्रसंधीचे (किती गोंडस शब्द) उल्लंघन केले,आणि आमचे पाच शूरवीर धारातीर्थी पडले. त्यानंतर आलेला स्वातंत्रदिन जवानांना केवळ श्रद्धांजली वाहून आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन साजरा झाला. या दिवशीच्या भाषणांमध्ये हा मुद्दा कमी आणि सत्ताधारी-विरोधकांचा कलगीतुराच जास्त रंगला. आणि दरम्यानच्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या नागापेक्षा राजकारण्यांचेच विषारी फुत्कार लोकांनी झेलले. सामान्य जनतेमध्ये मात्र शहीदाप्रती अनेक कार्यक्रमातून आत्मीयता दिसून आली.
नंतरच्या नारळी पौर्णिमेने मच्छिमार बांधवांचा "सिझन" सुरु करून दिला.त्यामुळे मत्स्याहारीना थोडा "दराचा"दिलासा मिळाला. त्याच दिवशीचा "रक्षाबंधनाचा"सोहळा समस्त भाऊरायाना बहिणीप्रतीच्या कर्तव्याची "वार्षिक" आठवण करून गेला. मात्र हातातल्या राखीचा रंग उडण्याआधीच मुंबईत कोणा एका बहिणीवर कोणाच्या तरी भावांनी "पाशवी बलात्कार" केला. जंगलातला वणवा आता गावात आला, घरात यायला फारसा वेळ लागणार नाही हे जनतेच्या आता लक्षात येऊ लागलय, जनता रस्त्यावर उतरली,त्याची बातमी झाली.......पुढे काय?
डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी हे भोंदू बाबा किवा जादूटोण्यावाले असावेत असा अंदाज आहे, पण डॉक्टरना मारताना साल्यानी आपल्या अघोरी विद्या किवा जादू टोण्याचा वापर न करता "पोलादी शस्त्र" वापरण्याची काय गरज होती? इतक्या शांत डोक्यावर गोळी झाडण्याचा विचार नक्की येतो तरी कुठून ? 
या हत्येचा शोक करणारी राजकीय मंडळी म्हणतात "दाभोलकरांसारख्या माणसाची हत्या होईल याची जरा जरी कल्पना असती तर खबरदारी घेतली असती"…आता कुणाचं कधी काय होईल? याचा सरकारला "प्रश्नकुंडली" मांडून अंदाज द्यायला साळगावकर सुद्धा उरले नाहीत. साहित्य,ज्योतिष आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर भरारी घेतलेले ज्योतिर्भास्कर आता यापुढे आशीर्वादासाठी आपल्यात असणार नाहीत. पत्र्याच्या  झोपडीपासून ते मोठाल्या बंगल्याच्या भिंतीवर स्वताची खास जागा राखून ठेवणारे "कालनिर्णय" पोरकं करणारा हाच तो महिना 
बाकी शहरातल्या खड्ड्यांवर महिनाभरात अनेक चर्चासत्र रंगलीत,आमदारांची "टोल'वा-टोलवी चित्रफितीत पाहता आली. सरकारने अन्नसुरक्षेतुन "मतसुरक्षेची" चांगलीच तजवीज करुन घेतली,तेलंगनाचे
 "रणांगण" काहीसे शांत होत चाललय  मात्र "स्वतंत्र विदर्भाचा" गर्भ जोमाने वाढू पाहतोय,रस्त्यावरचे भीषण अपघात,आमिष दाखवून बलात्कार,चोऱ्या- दरोडे,एकतर्फी प्रेमातले हल्ले नैराश्यातून आत्महत्या या दैनंदिन घडामोडी झाल्याने त्या  हल्ली बातमीसाठी मोठा विषय ठरत नाहीत. या महिन्यात क्रिकेटज्वर जवळपास अजिबात नसल्याने क्रीडापानावर फारकाळ कोणाची नजर स्थिरावली नाही.
कांद्याचा वाढलेला दर आणि रुपयाचा घसरलेला दर साठ-पासष्टीला पोहोचला.सेन्सेक्सने आपटी खाल्याचे वाचले पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र नागपंचमीच्या दरम्यान आकडेबहाद्दुराना हुलकावणी दिलेल्या पंज्याने (पंचमीला ५ चा आकडा फीट असतो असे म्हणतात ) पुढे कधीतरी जोडीने येउन भरपाई करून दिल्याची खबर आहे. सोन्याला सुद्धा या महिन्यात चांगले दिवस आले. या महिन्यात चुकल्या-चुकल्या सारखे वाटते,कारण एकही घोटाळा उघडकीस आला नाही. कदाचित प्रसार माध्यमांना वेळ नसल्याने सध्या "वेटिंग"वर असावा अशी अपेक्षा.
काही असलं तरी  महिनाच्या अखेरीस असणारा "गोपाळकाला" मात्र नक्कीच सुखकारक असेल. जनतेच्या आशा-आकांक्षांचे मनोरे न ढासळता गगनचुंबी होतील आणि सुखाची हंडी फोडून सर्वानाच "सुखाची चव "चाखता येईल

"ग"- ग्रामविकासातला …….

"ग"- ग्रामविकासातला ……. 
अपवाद वगळता राजकीय मंडळीनी गावाचा विकास हा रस्ते,इमारती,गडगे आणि गटारे या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना होऊ दिला नाही,कारण स्वतःच्या प्रयत्नातून गावच जर स्वयंपूर्ण होऊ लागलं, तर गावपुढाऱ्यांच राजकीय नुकसान होण्याची शक्यता असते. अर्थात गावाच्या विकासाला राजकीय पाठबळाची गरज असते हे १०० % मान्य आहे. पण त्यासाठी साठमारी नको.गावा गावातल्या सर्वच पक्षाच्या राजकीय पुढारी मंडळीनी आपल्यातला राजकीय "ग" (ताठा,अहंकार) थोडा बाजूला सारून एकत्र येण्याची गरज आहे. त्यातून सामाजिक स्वास्थ्य निर्माण होईलच,आणि सोबत गावात आरोग्य,शिक्षण,कृषी,पर्यावरण संस्कार,श्रमप्रतिष्ठा यासारख्या अनेक विषयासाठी काम करणे शक्य होईल.जे आगामी काळाचे खरे विकासाचे मुद्दे असतील. —


Sunday, August 18, 2013

"कोकणचा बालगंधर्व"….

"कोकणचा बालगंधर्व"…. 

अलीकडेच मी मालवणी मुलखातल्या दशावतार परंपरेविषयी थोडेसे लिहिले होते.मी काही या कलेचा अभ्यासक वैगरे नक्कीच नाही,पण या कलेविषयी प्रचंड आदर आणि तितकचं कुतुहूल माझ्या मनात आहे. आमच्या "सिंधुदुर्गनगरी सांस्कृतिक प्रतिष्ठान"चे दुसरे पुष्प या दशावतारी लोककलेवर आधारीत कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने आज जेष्ठ आणि प्रसिद्ध दशावतारी कलाकार "ओमप्रकाश चव्हाण" यांची थेट-भेट झाली.
दशावतारी कलेवर असणारे नितांत प्रेम आणि त्या कलेच्या जपणुकीसाठी  मनात असलेली तळमळ  या "कोकण बालगंधर्वाच्या" मितभाषी आणि तितक्याच विनम्र व्यक्तीमत्वातून व्यक्त होत होती. कोणत्याही रंगमंचीय कलेचा वारसा नसताना गेली तब्बल २८ वर्षे ओमप्रकाश दशावतारी नाटकांमधून "स्त्री पार्ट" करतात. संगीत कला अकादमीचा "वसंत देसाई स्मृती पुरस्कार"तसेच "आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार" अश्या मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या कलेचा सन्मान झाला आहेच वर "कामगार कल्याण मंडळ" स्पर्धामध्ये स्त्री भूमिकेसाठी सलग १५ वर्षे प्रथम क्रमांकाचा विक्रमही त्यांच्या नावे आहे.त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना "कोकणचा बालगंधर्व"असे संबोधण्यात आले ते अगदी रास्तच आहे.
त्यांच्या भविष्यातील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा … ! 

Saturday, August 17, 2013

शेट्टींचा "विजय" असो …

शेट्टींचा "विजय" असो …
विजयजी, आपले आडनाव "शेट्टी"आहे, आपल्या हातची चव घेण्याचा योग कधी जुळून आला नाही मात्र गेली अनेक वर्षे आम्ही आपल्या "लेखनशैली"चा मनमुराद आस्वाद घेत आहोत, जो आनंददायी आहे. साधारणता "आडनामायनाचा" संदर्भ जोडत त्या-त्या व्यक्तीच्या प्रोफेशनचा अंदाज घेणारी आम्हीमंडळी,त्यामुळे "विजय शेट्टी"आणि मालवणी मुलखातले पत्रकार हे सुरुवातीला थोडेसे वेगळे वाटले. पण आपले लेखन उडप्यांच्या आंबवून... फुगवलेल्या "टिपीकल रेसिपी" प्रमाणे कधीच वाटले नाही तर ते सोला-तिरफळा घातलेल्या "माश्यांच्या तिकल्या" सारखे "खमंग" असते ते कोणालाही अजीर्ण होत नाही.
शिक्षणाच्या वेळी आम्ही हॉस्टेलचे "मेस मेंबर" होतो. तिथे पंधरवड्याने एकदा स्पेशल जेवणाचा बेत असायचा त्याला "फिस्ट" म्हणायचो,ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो,अगदी तसंच तरुण भारत हा आमच्यासाठी स्थानिक घडामोडींच्या बातम्याची मेस आणि प्रसंगानुरूप प्रसिध्द होणारी आपली सदरे हि त्या "फिस्ट" चा आनंद देवून जातात.
तशी आपली ओळख फार जुनी आहे परंतु ती दृढ मैत्रीत परावर्तीत करण्याचा प्रयत्न मी जाणीवपूर्वक कधी केला नाही.त्यामुळे आपल्या लेखनाची त्रयस्थ वाचकाच्या नजरेतून मला मजा घेता येते. आपल्या लेखनशैलीची एक वेगळी "ढब" आणि आपल्या कल्पकतेला एक वेगळी "उंची"आहे. त्यामुळे आपले "आडनामायन" "गावांचा इतिहास" "भजन मंडळी" "गुरवे नमः"या सारखे अनेक प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरले, लपून असणाऱ्या अनेक बाबींवरचा आपला "सर्च लाईट" जगावेगळा, आपले "ता क"सुद्धा साखर घातलेल्या दहीभाताचा "फील"देते, आपली लेखणी अशीच बहरत जावी आणि आपण यशवंत/कीर्तिवंत व्हावे यातच "आमचा आनंद १०० %. "
आपल्या वाढदिनी आपणास अनेक शुभेच्छा … 

Friday, August 16, 2013

"वो पच्चीस साल"…


"वो पच्चीस साल"…
१६ ऑगस्ट १९८८…. साधारण दुपारचे तीन वाजले असावेत,आमची स्वारी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या वसतिगृहात दाखल झाली. कॉलेज सुरु व्हायला अजून १/२ दिवसाचा अवकाश होता,त्यामुळे रूम मधल्या तीन पार्टनर पैकी दोघे अजून यायचे होते. आम्ही आमच्या सामानाची ट्रंक रूम नं ३ मध्ये टाकून त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या कॉट,टेबल आणि खुर्चीचा ताबा घेतला. इतर दैनंदिन व्यवस्था पाहून मेससाठी रजिस्टर झlलो. 
एव्हाना प्रवेशा दरम्यान बऱ्याचदा कॉलेज पाहून झालं होत,पण आता पुढची तीन वर्षे शिकायची असल्याने पुन्हा एकदा इमारतीचा काना-कोपरा पाहून घ्यावा असं मनात आलं,वसतिगृहातून निघालो असता कॉलेजच्या गेटजवळचा परिसर बटाटावड्याच्या खमंग वासाने व्यापून गेला होता. तो होता "शामचा वडा" … ज्याने पुढची तीन वर्षे आम्हाला कुपोषणापासून दूर ठेवलं. सव्वा रुपयाचा तो जम्बो वडा हादडताना अख्खं तोंड भाजून घेतलं. विद्यार्थ्यांच्या वर्दळीपासून मोकळा असलेला कॉलेजचा सगळा परिसर नजरे खालून घातला आणि पुढची किमान तीन वर्षे "जिना यहा… मरना यहा" याची खूणगाठ नक्की केली.
हे सगळे आज आठवण्याचे कारण म्हणजे काल १६ ऑगस्ट २०१३ होता. बरोबर २५ वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाऊन या सगळ्या स्मृतीना उजाळा दिला. एक इमारत आणि एकच वर्कशोप असलेल्या कम्पसमध्ये आता भरपूर इमारती वसलेल्या आहेत. पण आनंदाची बाब म्हणजे सगळा परिसर अजूनही पूर्वीप्रमाणेच हिरवागार आहे. आमच्या वसतिगृहाच्या सोबतीला सुद्धा दुसरी इमारत आली, शाम आणि शामचा वडा अजूनही पूर्वीसारखेच आहेत (फक्त किंमत १५ वर गेलीय काळानुरूप ) एक मामा भेटले,एक-दोन सरांची भेट झाली,अगदी नाव पत्यासहित सरांनी ओळखलं. वर म्हणाले सुद्धा कि २०/२५ वर्षापूर्वीची अख्खी ब्याच आठवते पण अलीकडच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अस घडत नाही,नक्की कोण कमी पडतंय माहित नाही पण तो "भाव" आता राहिला नाही. मग मागोमाग बऱ्याच आठवणींच्या खपल्या निघाल्या,काही आनंदाच्या तर काही वेदनेच्या …… असा हा कालचा "रौप्य महोत्सवी" दिवस मला योगायोगाने सार्थकी लावता आला ….

Friday, August 9, 2013

"बांधकाम विभागाचे "कलेक्टर"…


"बांधकाम विभागाचे "कलेक्टर"……

आज एका भावस्पर्शी सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा योग आला, आणि तो सोहळा होता आमच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता "श्री प्रदीप जोशी"यांच्या सेवानिवृत्तीपर निरोपाचा आणि त्यांच्या वाढदिवसाचा …
तुडुंब भरलेले मंगल कार्यालयाचे सभागृह,वक्त्यांकडून उलगडत जाणारा साहेबांचा जीवनपट,त्यांच्याविषयीचे अनेकांचे चांगले अनुभव आणि तितक्याच तन्मयतेने ऐकणारी उपस्थित अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार अशी श्रोते मंडळी…कुणालाही हेवा वाटावा असा त्यांच्या वाट्याला आलेला एक विलक्षण सन्मान …
हा सन्मान होता साहेबांच्या ३४ वर्षातील निष्कलंक सेवेचा,त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा,त्यांनी बांधकाम खात्याला दिलेल्या योगदानाचा,त्यांनी जपलेल्या माणुसकीचा तसेच त्यांनी जोडलेल्या स्नेहाचा …
वक्तशीर शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्व,जन्मजात प्राप्त झालेलं व्यवस्थापन कौशल्य,सतत नाविन्याचा अंगीकार करण्याचा उत्साह,आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारून ती पेलण्याची क्षमता यामुळे त्यांना समस्त बांधकाम विभागाचे "कलेक्टर" असं म्हटलं तर ते १०० % रास्त ठरेल,
तर अश्या आमच्या नेतृत्वाला आज सरकारी सेवेसाठी निरोप दिला असला तरी आमच्यासाठी
एक "आदर्श मार्गदर्शक" म्हणून त्याचं हृदयातील स्थान "अबाधित"ठेवून त्यांना पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा देतो.
 30 june 2013

" सांग सांग भोलानाथ" …….

" सांग सांग भोलानाथ" ……. 
शाळेमध्ये इतर कितीही सुट्ट्या मिळाल्या आणि वरून हवी तेव्हा "दांडी"मारता येत असली तरी,पावसामुळे अचानकपणे १/२ सुट्ट्या हमखास मिळाव्यात,आणि त्या पावसातच "एन्जॉय"कराव्यात हे विद्यार्थी असतानाचे प्रत्येकाचे स्वप्न असेल,शिक्षण पद्धती बदलली,मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या,खेळांचे प्रकार बदलले तरी हि भोलानाथ महाराजाकडे केली जाणारी ही "इन्क्वायरी" अजूनही प्रत्येक बालमन मनातल्या मनात का होईना पण करतच असावं.
काल कोकणात मुसळधार पाऊस झाला,रात्री तर सरीवर सारी कोसळत होत्या, तेव्हा माझी सुकन्या अभ्यास करता करता सारखा एकच प्रश्न विचारायची "पप्पा उद्या पीठढवळ नदीच्या पुलावर पाणी येईल का?" मी होय /नाही /बघूया अशी बेफिकीर उत्तरं देत असतानाच टीव्ही वर त्या पुलावर पाणी येउन वाहतूक ठप्प झाल्याची बातमी आली,ती प्रचंड खूष झाली. कारण तिला आज पावसाची सुट्टी मिळण्याची शक्यता होती. आ
णि या हक्काच्या सुट्टीसाठीच ती मला "भोलानाथ" समजून सतावत होती. 

"श्रावण"

"श्रावण मासाच्या हिरव्या गर्द शुभेच्छा… !"

"पाडवा सर्व सणांवर आडवा" असं कोकणात सर्रासपणे म्हटलं जात,कारण गुढी पाडव्याने एकदा चैत्र महिन्याने नवीन वर्षाची सुरवात करून दिली की,तब्बल चार महिने घरच्या सण-वारांची वानवा असते. आजपासून श्रावण सुरु होतोय तो व्रत-वैकल्ये आणि सणासुदीची शृंखला घेऊनच…. त्यामुळे त्याच मनापासून स्वागत.
त्याचप्रमाणे "श्रावण मासी हर्ष …. हिरवळ दाटे …" हि विलक्षण अनुभूती घेण्यासाठी सर्वाना हिरव्या गर्द शुभेच्छा …. !

"तारतम्य"……

"तारतम्य"……… 
दीड शतकाच्या सेवेची गौरवशाली परंपरा असलेला तार विभाग अलीकडेच बंद करण्यात आला. हे सर्वाना माहीतच आहे. पण तो बंद करताना शेवटची "तार" श्रीमान राहुल गांधी यांना करण्यात आली अशी बातमी आहे. तिचा मजकूर काहीसा असा असावा असा अंदाज आहे ……. MOTHERS (PARTY) SERIOUS…… (WORK) START IMMEDIATELY 
कारण स्वपक्षा सहित बऱ्याच जनतेला राहुल गांधींकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या,त्या सांगून,पत्र विनंती करूनही पूर्ण झाल्या नाहीत,तेव्हा तारेचा हा जालीम उपाय पोस्ट खात्याला सुचला असावा,म्हणूनच राष्ट्रपती,पंतप्रधान आणि १२० कोटी जनतेच्या देशातून यांनाच "आकडा" लागला 

"अरसिक"…….

"अरसिक"……. 
एकादी व्यक्ती काही बाबतीत किती "अरसिक" असू शकते याचा परवाच मला प्रत्यय आला. कोल्हापूर दौऱ्यात एका मित्राला आम्ही काहीसं जबरदस्तीनेचं सिनेमाला घेऊन गेलो. सिनेमा होता "लुटेरा"… 
सिनेमा तसा बकवास असला तरी त्यातली "सोनाक्षी" फार छान होती,अभिनयात आणि दिसण्यातही… तिच्याकडे बघण्यासारखं बरंच काही असतानाही आमच्या या अरसिक मित्राला मात्र तिच्या कपाळावर दोन व्रण (मार्क) दिसले आणि त्याने तिला लहानपणी "कांजण्या" येउन गेल्याचा निष्कर्ष काढला. पुढे सोनाक्षी व रणवीरचा "रोमान्स" बघून तर, तिला झालेला टीबीचा आजार "संसर्गजन्य"नाही कसा? व रणवीरला टीबी होण्याची भीती कशी वाटत नाही ? अश्या अनेक "अरसिक"शंका काढल्या. वयाच्या "ऐन" चाळीशीत एका गृहस्थाश्रमातल्या माणसाचा हा "अरसिक" पणा आम्हाला थोडासा खटकला आणि जास्त एन्जॉयसुध्दा करता आला.
(अर्थात या सिनेमाचा निर्माता हा "लुटेरा"च आहे,फारसं काही न दाखवता आमचे प्रत्येकी १८० लुटले हा भाग वेगळा)

जत्रा...

"निमंत्रण" ……… 
आज गावची आमच्या जत्रा,
सगळ्यांका धाडली हत पत्रा…… 
ज्येंका गावली त्येनी येवा,
चुकान नाय पोचली तरी येवा …… 
पन येवा सगळ्यांनी येवा,
आमच्या जत्रेक तुमी येवा …
यंदा थंडी हा लक्षात ठेवा,
आठवनीन स्वेटर मफलर घेवा….
इल्यार देवांचा दर्शन घेवा,
पोरांका फुगे खेळनी घेवन देवा ……
गरमागरम चाय-भजी खावा ...
बिल बिनधास्त खात्यार लिवा...
रातभर नाटकाची मजा घेवा ...
तळयेत पाचचो तरी डॉलर ठेवा ....
आठवनीन खाजा- लाडू घेवा......
यंदा पैसे मात्र तुमीच देवा ....
उद्या पोळये-मटान खावा....
आनी जागरान निवळून जावा ...
येवा सगळ्यांनी येवा....
आमच्या जत्रेक तुमी येवा .....

kalatay pan valat nahi

"कळतंय पण वळत नाही"……. 
कधी-कधी आपण सवयीचे एवढे गुलाम होतो की,छोट्या छोट्या कारणांनी सुध्दा फार "अस्वस्थ"होतो, कालची संध्याकाळ अशीच होती.
घरी आल्यावर नेहमीप्रमाणे "लॉगीन"करायला गेलो तर आमच्या ब्रॉडबँडचा "बँड"
वाजलेला,बऱ्याच प्रतीक्षेनंतर संयम संपला,पुढचा मोर्चा अर्थात DTH द्वारे सेवा देणाऱ्या "दूरदर्शन" कडे वळला पण साथ यावी तशी याचीही सेवा "अन्टेना"हलल्याने ठप्प…बहुचर्चित ३G सोडा पण साधी रेंज सुद्धा घरी मिळत नसल्याने "मोबईल"हा पर्याय आम्हाला लागू होत नाही,पाक्षिक/मासिकात काही वाचायचे असे शिल्लक उरले नव्हते,अश्या वेळी काटा पुढे सरकता सरकेना.… उगाचच मनाची घालमेल सुरु झाली. चिडचिड सुरु झाली. अर्थात दोन्ही साधनांवर फार तर एक तास रमलो असतो, परंतु ते सुरु नसल्याने पुऱ्या ४/५ तासांची "वाट लावून घेतली. मित्रहो,"कळतंय पण वळत नाही"…….

Wednesday, August 7, 2013

"मैत्री दिवस"

एक "BACKUP FRIEND" जरुरी है ….

आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार …"जागतिक मैत्री दिवस"….
सर्व मित्र मंडळीना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!
आजच्या या दिवसाचे "सेलेब्रेशन" बहुतेक करून युवा वर्गात जास्त प्रमाणात दिसते. कारण आई -वडिलांच्या पंखाखालून बाहेर पडल्यानंतर खरी गरज भासते ती निखळ मैत्रीची ….
पण मुळात होत असं की,शाळा-कॉलेज,कामधंदा,नाती-गोती,शेजारी-पाजारी आणि छंदा-व्यसनात आपण अनेक वेळा मैत्रीची पाने पिसतो. मुळातच गांभीर्य कमी असल्याने त्यातला राजा कोण अन गुलाम कोण हे ओळखण्यात मोठी गफलत होते,अति विश्वास किवा अति अपेक्षांचं ओझं त्या मैत्रीला पेलत नाही,आणि रंगलेला डाव विस्कटतो,म्हणून प्रत्येक ओळख हि मैत्री नसावी आणि मैत्री हि फक्त ओळखीपुरती मर्यादित नसावी. आपल्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती आपला "BACKUP FRIEND" म्हणून निवडा कि जिच्या खांद्यावर डोकं ठेऊन मन "मोकळ" करता येईल,आणि काळानुरूप आयुष्याचे "FORMAT" मारता येईल …सुप्रभात …!

Monday, August 5, 2013

अभिनय आणि शिल्पकला एकाच "बॉडीत" …….

कोकण म्हटलं कि ज्या काही गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यातली सर्वात महत्वाची अशी कोकणची लोककला म्हणजे "दशावतार"…. पूर्वीच्या काळी फक्त जत्रेतूनच ह्या दशावताराचे प्रयोग पाहण्याचे योग यायचे पण आता सर्सास छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून हे प्रयोग "एन्जॉय" करता येतात. कोणत्याही प्रकारचे नेपथ्य, लिखित संहिता अथवा रिहर्सल नसताना ही दशावतारी मंडळी पौराणिक तसेच काल्पनिक कथानकाचे प्रयोग लीलया पार पाडतात,वरून रंगभूषाकार /वेशभूषाकार स्वतःच …
सादरीकरणातला त्यांचा जोश इतका असतो कि पाहणाराही आपलं अंग लयीत हलवत त्या भूमिकेत शिरतो. इतकं सगळ असूनही आमच्या दशावताराची स्थिती "रात्रीचो राजा…. आणि सकाळी कपाळावर बोजा" अशीच आहे. नाही म्हणायला वेगवेगळ्या प्रयोगानी हल्ली परिस्थिती थोडी सुधारतेय पण …….

पूर्वीपासून दशावतारी मंडळीना पावसाळ्यात हक्काची ( की सक्तीची) रजा असते,परिणामी हि मंडळी पावसाळ्यापुरता पूरक कामधंदा करतात,यातल्या बऱ्याच जणांच्या स्वतःच्या गणपतीच्या शाळा (कारखाने)आहेत,तर काहीजण दुसऱ्या शाळेत काम करतात.अभिनय आणि शिल्पकारीतेचा हा अनोखा संगम असावा.
गेली पन्नास वर्षे या दशावतारी रंगभूमीशी ज्यांची नाळ जोडलेली आहे त्या "कांता मेस्त्री" या जेष्ठ रंगकर्मी यांच्या घरी त्यांची भेट झाली. चतुर्थीला उणापुरा महिनाच शिल्लक असल्याने ते आपली दोन कलाकार मुलांसह मूर्ती कामात व्यस्त होते, त्याचं या क्षेत्रात मोठे योगदान आहे, ६५ ते ९० या काळात त्यांनी "राजपार्ट" म्हणून भूमिका केल्या आणि नव्वद नंतर आजपावेतो "नारद"…… जिल्ह्यात त्यांचा "नारद" फार प्रसिद्ध आहे आणि विविध स्पर्धांमध्ये तो पुरस्कार प्राप्त ठरलेला आहे,कांता काका सांगत होते वडिलांकडून आलेला वारसा मी जपलाच पण माझ्या दोन मुलानाही या क्षेत्रात आणले,मुलगीलाही "बाळ गोपाळ" दशावतार मंडळातून या कलेशी जोडले होते,तासाभराच्या भेटीत दशावताराचे अनेक पैलू ऐकायला मिळणे हि आमच्या दृष्टीने फार मोठी मेजवानी होती.
(कोकणचा दशावतार आधीचा की कानडी यक्षगान आधीचे यावर मतमतांतरे असू शकतात,आपला तो विषय नाही पण त्या कानडी रसिकांनी "यक्षगान" हि लोककला फार उंचीवर नेउन ठेवली,आपल्याला मात्र अजून यासाठी सकारात्मक काम करण्याची गरज आहे हे मान्य करावे लागेल. असो, मात्र इथल्या कलाकारांनी अनंत अडचणीतूनही हि लोककला प्राणपणाने जिवंत ठेवली हे फार कौतुकास्पद आणि महत्वाचे.....)