Friday, January 24, 2014

"प्रवाश्यांच्या सेवेसाठी"

"प्रवाश्यांच्या सेवेसाठी"

एस टी म्हटलं कि आठवतो, 
तो "बेल" च्या दोरीला चुकून लागलेला हात,
आणि उगाच त्यावरून कंडक्टरने घातलेला वाद…… 
आठवतात त्या ओघळणाऱ्या घामाच्या धारा, 
आणि भरधाव वेगाबरोबर झोंबणारा वारा… 
आठवतो तो खाकी ड्रेसमधल्या कंट्रोलरचा थाट,
आणि रिव्हर्स गाडी लागलेले नंबरचे फलाट……
आठवते ती चढताना होणारी उगाचची घाई,
आणि उतरताना केलेली तितकीच बेपर्वाई……
आठवते ती शेवटच्या गाडीची गावातली वस्ती,
आणि शाळेच्या मुलांची स्टौपवरची मस्ती……
आठवते ती कंडक्टरची ब्याग चामड्याची,
अजूनतरी नाही जमली तशी कला लिहिण्याची …
आठवते ती चिल्लर साठी होणारी रोजची मारामारी ,
कधी अर्ध्या तिकिटासाठी केलेली वयाची चोरी …
आठवते ते अंगावर गळणारे काळे काळे पाणी,
कधी सहलीच्या मुलांची छान छान गाणी….
आठवते ते उशिरा पोचणारे लग्नाचं वऱ्हाड,
आणि अर्धी गाडी व्यापलेलं तांड्यातलं बिऱ्हाड……
आठवते ती एखादी न उघडणारी खिडकी,
आणि डोक्याला टेंगुळ आणणारी छोटीसी डुलकी……
आठवतो तो विद्यार्थीदशेत स्पंज चोरलेला,
आणि करकटाने सीटमागे बदाम कोरलेला……
आठवतो तो बऱ्याचदा आलेला स्ट्याडिंगचा वीट,
आणि कुणाला तरी प्रेमाने बहाल केलेली सीट……
आठवतो तो कुठल्यातरी गेअरला थरथरणारा पत्रा,
आणि कधी अर्जंट ब्रेकच्या प्रयत्नाने वाचलेला कुत्रा……
आठवतो तो ड्रायव्हरसाठी येणारा घरचा डबा,
आणि त्यासाठी त्याने घेतलेला अनधिकृत थांबा…….
आठवते ती जाळीवरून हरवलेली छत्री,
आणि रामरक्षा म्हणणारी काही माणसे अति भित्री……
आठवतो तो खिडकीतून रुमाल टाकलेला,
आणि नेमका बऱ्याचदा तो प्रयत्न फसलेला……
आठवतात ते गोलगोल फिरणारे पुणेरी रसवाले,
आणि खांद्यावरच्या ट्रे मधले पाकातले आले….
आठवतात ते स्थानकात लिहिलेले सवलतीचे दर,
आणि नफ्यापेक्षा प्रवाश्यांच्या सेवेवर दिलेला भर……
हल्ली मात्र एसटी पाहून वर जात नाही हात,
कारण दिवसेंदिवस वाढताहेत तिथेही अपघात ….

Tuesday, January 21, 2014

"यवजलेला साधात तर दळीदार कित्या बाधात"……

"यवजलेला साधात तर दळीदार कित्या बाधात"……
अशी आमच्या मालवणीत एक सुंदर म्हण आहे. आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट जर साध्य झाली तर दारिद्र्याची बाधा होण्याचा प्रश्नच येणार नाही असा काहीसा या म्हणीचा अर्थ आहे.आता ही म्हण अरविंद केजरीवाल साहेबांना कोणीतरी हिंदीतून सांगायला हवी,कारण त्यांनी कागदावर मांडलेली प्रत्येक गोष्ट लगेचच साध्य व्हायला हवी किवा अंमलात यायलाच हवी असा त्यांचा अट्टाहास सुरु आहे आणि त्यातून लोकांचा टाइमपास…त्यामुळे जनतेला एखादा नवीन "नायक" पाहिल्याचा "फील" येऊ लागलाय. 
भ्रष्टाचार विरहित एक चांगले सुशासन देण्याचा त्यांचा विचार अगदी योग्य असला तरी तो टप्प्याटप्प्याने आणि सनदशीर मार्गाने अंमलात आणला पाहिजे. स्वतः सत्तेत असल्याने प्रत्येक मुद्द्यावर जनतेकडून एस एम एस मागवून किवा जनतेला रस्त्यावर उतरवून वेठीस धरण्याचे काम करणे रास्त नाही.पक्षाचे नाव आणि नेते जरी "आम"असले तरी जी पदे उपभोगत आहेत त्या पदांना घटनेने "खास"असा दर्जा दिलेला आहे.त्या दर्जाविषयी काही संकेत आहेत ते पाळायलाच हवेत……

"प्रायश्चित्त"

"प्रायश्चित्त"
आपल्याकडून एखादी चूक होते तेव्हा त्यासाठी "प्रायश्चित्त"म्हणून काही करण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. त्यात काही कठोर तर काही सोयीच्या….
………. आमचे एक मित्र आहेत "गहिरवाल"नावाचे… ते गणेशभक्त असल्याने दर मंगळवार मांसाहार वर्ज्य आणि संकष्टीचा उपवास करायचे.एक दिवस ते जेम्स नावाच्या मित्राकडे जेवायला गेले.त्या दिवशी नेमका मंगळवार होता. जेम्स महाशयांनी माश्यांचा बेत केला आणि साहेबांनी अनावधानाने मासे खाल्ले.या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून साहेबांनी पुढे "मांसाहार कायमचा वर्ज्य" केला.
……… बरीच वर्षे मीसुद्धा संकष्टीचा उपवास करायचो.एका उपवासाच्या संध्याकाळी मी कामावरून येत असताना वाटेत एका मित्राने हाक मारली,तिथे एका गाडीवर तो आणि त्याची मित्रमंडळी "आम्लेट पाव" हादडत होती.मी गेल्यावर माझ्या समोरही तशीच प्लेट आली.उपवासामुळे पोटात प्रचंड भूक होतीच,त्यामुळे एक अधिकचा एक पाव घेऊन मी ती फस्त केली.थोड्या वेळाने चूक लक्षात आली आणि खूप अपराधी वाटू लागले.मग विचार केला आपल्याला मनोभावे हे सगळे करता येत नसेल तर नको करूया…त्या दिवशी पासून "प्रायश्चित्त"म्हणून कधी "उपवास" केला नाही

Friday, January 10, 2014

"बाईंचा रुमाल"

"बाईंचा रुमाल"
एखादे संस्काराचे पुस्तक वाचून किती "संस्कारक्षम" होता येईल हे नक्की सांगता येत नाही, परंतु आयुष्यात जर बालमनावर "संस्कार" करणाऱ्या काही घटना घडल्या तर मात्र त्याचा एक "स्पेशल इफेक्ट" आयुष्यभर राहतो हे आपण अनुभवाने सांगू शकतो. 
त्यावेळी आमचे गावात एक घर होते पण आम्ही गावापासून दूर शेतावरच्या घरात रहात होतो.राहत्या घरापासून गावची प्राथमिक शाळा सुमारे तीन मैल लांब होती.शाळा दोन वेळ असल्याने जात्या येत्या मिळून चार खेपा म्हणजे माझ्या दृष्टीने तसे अवघडच काम होते. नेमके त्याच दरम्यान एका नवविवाहित शिक्षक जोडप्याची आमच्या शाळेत बदली झाली.त्यांचे नाव होते सौ व श्री सुरेंद्रनाथ परमानंद ढवळे आणि व्यक्तिमत्व सुद्धा नावाला शोभेल असे भारदस्त होते.आमच्या गावातल्या घरी त्यांची राहण्याची सोय होऊ शकते असे सहकारी शिक्षकांनी त्यांना सुचवले आणि उभयता आमच्याकडे चौकशीला आली.
त्याकाळी घरात शिक्षकाचे वास्तव्य हि अभिमानाची बाब असल्याने आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.घरभाडे असाही विषय आमच्याकडून आला नाही पण त्यांना काहीतरी द्यावे असे वाटले आणि त्यांनी शिक्षणासाठी म्हणून माझे "पालकत्व" स्वीकारले.
आमची रवानगी त्याचदिवशी त्यांच्यासोबत गावातल्या घरात करण्यात आली.ढवळे उभयता "आईवडील"झाले आणि शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु झाला.
आमच्या शाळेच्या समोर एक बांध होता,ती आमची मधल्या सुटीत खेळण्याची जागा.एक दिवस पकडापकडी खेळताना मी पडलो आणि उजवा गुढगा रक्तबंबाळ झाला.खिशातल्या छोटाश्या रुमालाने जखम बांधून मी ढवळे बाईंकडे गेलो,अपेक्षा होती की बाई जवळ घेतील आणि डोळे पुसतील.पण झाले भलतेच…. बाईनी कानाखाली आवाज काढला.आणि तंबी दिली "हा रुमाल जिथून घेतला तिथे नेउन ठेव आणि मगच माझ्याकडे ये"…. एरव्ही मला जीव की प्राण करणाऱ्या बाईंचा हा अवतार बघून सगळे शिक्षक अवाक झाले.मला मात्र चूक कळलेली होती,मोठ्या माणसांप्रमाणे आपल्याही खिशात रुमाल असावा म्हणून मी "बाईंचा रुमाल" चोरला होता. जो त्यांनी ओळखला.
त्याच अवस्थेत मी घरी गेलो.पुढचे आठ दिवस सुश्रुषा अर्थात बाईनीच केली.जखम बरी झाली पण व्रण म्हणून शरीरावर आणि संस्कार म्हणून मनावर तो प्रसंग कायम स्वरूपी कोरला गेला.
आजकाल खेळातला आईचा रुमाल कायमचा हरवला आणि असे संस्कार देणारा बाईंचा रुमाल सुद्धा दुर्मिळ झाला आहे.आपल्या पिढीला हे वाचून एखादा प्रसंग हमखास आठवेल पण चिंता वाटते ती येणाऱ्या पिढीची …
खरंच त्यांच्याकडे असे काही लिहिण्या-सांगण्या सारखे असेल ना ?

"धनी"…….



"धनी"……. 
(तीस पस्तीस वर्षे संसार केल्यावर एका खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला वाटते की,हे कष्टप्रद जीवन जगताना,जिने आपली साथ दिली त्या आपल्या अर्धांगिनीवर आपल्याकडून "प्रेम" करायचचं राहून गेलं,तो तशी कबुली देतो,तेव्हा त्याची सहचारिणी कवितेतून अशी व्यक्त होते)

असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात……
लग्नानंतर फिरायला म्हणून,
गावच्या माळावर घेऊन गेलात…
काट्याकुट्यात फिरून तुम्ही,
मला "करवंद" आणून दिलात …//१//
पहिली मुलगी झाली तेव्हा,
तुम्हीं नाराज नाही झालात,
माय लेकीला भेटायला तुम्ही,
सहा मैल चालून आलात… //२//
घरच्यांच्या जाचात कधी,
माझी बाजू नाही घेतलात….
पण "हेही दिवस जातील"
असा प्रेमाने धीर दिलात…//३//
दोन मुलींवर थांबण्याच्या निर्णयाला,
मनापासून अनुमोदन दिलात…
रुसल्या फुगल्या घरच्यांची,
प्रेमाने समजूत काढलात…. //४//
आजारपणात माझ्या तुम्ही,
अख्खी रात्र रात्र जागलात……
वेणी फणी करून मुलींची,
त्यांचे कपडे सुद्धा पिळलात…//५//
शेताभाताच्या कामात नेहमी,
मला झुकतं माप दिलात….
स्वतः मात्र उभं आयुष्य,
घाण्याला जुंपून घेतलात…//६//
गेल्या वर्षी हट्टाने माझी,
'साठी' साजरी केलात……
फोटोसाठी का होईना मला,
हळूच मिठीत घेतलात…//७//
जिथे संधी मिळाली तिथे,
तुम्ही माझाच विचार केलात….
असं कसं म्हणू धनी,
तुम्ही प्रेम नाही केलात…//८//
 —

"एक आठवण"…

"एक आठवण"…… 
"बाळ,तुझा शर्ट फारच छान आहे,छान दिसतोस" डोक्यावर हलकेच टपली मारून आमच्या ढवळे बाईनी अभिप्राय दिला. आणखी थोड्या वेळाने ठाकूर बाई आणि अणावकर गुरुजीनीही तसंच कौतुक केलं.असा कोणी चांगला अभिप्राय दिला कि "धन्यवाद" वैगरे म्हणायचं असतं हे त्या वयात बहुदा माहित नव्हतं त्यामुळे मी गप्पच राहिलो. खरंतर माझे कोवळे मन तेव्हा फारच अस्वस्थ झालेले होते,कारण ज्या शर्टमुळे माझी स्तुती होत होती तो सुंदर "सफेद शर्ट" माझा स्वतःचा नव्हताच मुळी……
शाळेत असताना स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याकडे त्या शालेय जीवनात नवा कोरा ड्रेस नसायचाच,तसा याही वर्षी तो नव्हता.
मी थोडासा खट्टू झालेला बघून माझ्या एका चुलत भावाने (चंदू सावंत) त्याला मामाने दिलेला व त्याच्या मापात न बसणारा पांढरा शुभ्र शर्ट मला एका दिवसासाठी वापरायला दिला होता. तो मी घातला आणि आज त्यामुळे माझी स्तुती होत होती जी मला मानवत नव्हती.खूप वेळा मनात आले कि बाईना सांगून टाकावे पण तेही धारीष्ट झाले नाही.आणि अख्खा दिवस त्या हलक्या फुलक्या शर्टचे ओझे संपूर्ण अंगावर आणि मनावर घेऊन मी वावरत राहिलो.
पुढे दिवस बदलले हवा त्या वेळी हवा ते शर्ट घेण्याची आणि परिधान करण्याची स्थिती आली पण तो दिवस अजूनही मनातून जात नाही.आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आमच्या संस्थेचे "स्नेहसंमेलन"……
रंगीबेरंगी कपड्यातले विद्यार्थी व्यासपीठावरून न्याहाळत होतो. तेव्हा मनात आले यात असेल का कोणी माझ्यासारखा अस्वस्थ विद्यार्थी ?….
सुदैवाने आता कुणाला उसने कपडे आणण्याची स्थिती इथेतर नाही पण एखाद्याकडे इतरांप्रमाणे चांगले कपडे नसण्याची शक्यता तर आहेच,ज्याचा न्यूनगंड त्याच्याकडे असू शकतो,त्यामुळे अश्या विद्यार्थ्याने आयुष्यात खूप मोठे व्हावं आणि खूप कपड्यांचं "कपाट"आणि सृजनशील मनाचं "कवाड"त्याच्या नशिबात असावं अश्या त्याला शुभेच्छा …… !