Wednesday, October 12, 2016

बाबल्या गावकाराचा उल्टा चष्मा

बाबल्या गावकाराचा उल्टा चष्मा..
)"बाबल्याचो ठराव"
काल पंधरा ऑगस्ट रोजी शासकीय  नियमाप्रमाणे आमची हक्काची ग्रामसभा होती.पर्यावरण निधीतून प्रत्येक कुटुंबाला वस्तू वाटप असल्याने पंचायतीचे सभागृह वेळेआधीच तुडुंब भरले होते.एकही सभा न चुकवणारा आमचा "बाबल्या" सुद्धा जातीनिशी पहिल्या रांगेत हजर होता.प्रोसिडिंग वरचे विषय हळूहळू पुढे सरकत होते.प्रत्येकाला आपापली भेट वस्तू घेऊन घर गाठायची घाई असल्याने सभेच्या विषयांवर फारशी चर्चा रंगत नव्हती.
गेल्यावर्षी पर्यावरण निधीतून झाडांचे वाटप झाले होते.तसेच पंचायतीच्या पंधरा टक्के राखीव निधीतून कोंबडीच्या पिल्लांचे वाटप झाले होते.सरतेशेवटी या वर्षात ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधीतून काय वाटप करायचे यावर चर्चा सुरु झाली.बहुतेकांनी कोंबडीच्या पिल्लांचाच पर्याय योग्य असल्याचे सांगितले.तेवढ्यात परवाच्या सत्काराने खूष असलेला "बाबल्या" उभा राहिला आणि ठराव मांडतात त्या आवेशात म्हणाला.....
"सरपंचानु गेल्या वर्षी कोंबडी वाटलात,यंदा बकरे वाटा.वर्षागणिक थोडीतरी प्रगती नको पंचायतीची".....
बाबल्या रॉक्स ..सरपंच शौक्स .......


)"बाबल्याचा जनगण"
वेळ संध्याकाळची,आमच्या गावातल्या चौकात गप्पा मारत बसण्याची.............
आज नेहमीपेक्षा थोडे कमीच म्हणजे सात आठ जण जमलेले होते.गप्पांचा विषय होता परवा संपन्न झालेला "स्वातंत्र्यदिन" सोहळा.आम्ही जिल्ह्याच्या मुख्यालयाशेजारी रहात असल्याने स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य सोहळा आम्हांला पाहता आणि अनुभवता येतो.विशेष म्हणजे मंत्र्यांच्या भाषणातून आम्हांला आमचा जीडीपी आणि आमचे दरडोई उत्पन्न सुद्धा समजते.त्यामुळे या सोहळ्याचे कवित्व पुढचे आठ दिवस सुरु राहते.आज तसाच विषय सुरु होता,एवढ्यात कोणाच्यातरी मोटरसायकल वरून आमच्या बाबल्याचे आगमन झाले.बाबल्याची स्वतःची मोटरसायकल नाही परंतु जास्तीत जास्त वेळ तो कोणाची तरी मागची सीट अडवून असतो.ज्याप्रमाणे रमीच्या डावात एक पान असे असते की जे आपल्याला लागत नाही पण खाली टाकले तर दुसऱ्याला लागण्याची व त्याचा डाव पुरा होण्याची शक्यता असते अगदी तसाच "बाबल्या" हा विषय असल्याने जो तो नेहमी त्याला सांभाळत असतो.
आल्याआल्याच बाबल्या चर्चेत सहभागी झाला.पांढरा सदरा घालून,झेंड्याचा बिल्ला लावून परवा आपण किती ध्वजवंदनाला उपस्थित होतो त्याचे रसभरीत वर्णन सांगू लागला.इतक्यात आमच्यापैकी एकाला त्याची गम्मत करण्याची हुक्की आली.अशी बाबल्याची चेष्टा करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांची "आ बैल मुझे मार"अवस्था होते.तरीही का कुणास ठावूक नेहमीचे गिऱ्हाईक "बाबल्या"च असतो.
तो मित्र बाबल्याला म्हणाला..."बाबल्या,मेल्या इतकी मोठेपणा सांगतहस झेंडावंदनाची पण तुका साधा "राष्ट्रगीत"तरी म्हनाक येता काय ?".....
"येता म्हणजे..? पुरा पाठ हा...म्हणाव....?"असं म्हणून बाबल्या "झेंडा उंचा रहे हमारा"च्या दोन ओळी म्हणतो.तेवढ्यात कोणीतरी ते "ध्वजगीत"असल्याचे सांगून त्याला थांबवतो.
पहिल्याला बाबल्याचा कधी नव्हे तो पाडाव करण्याची आयती संधी आल्यासारखी वाटते ...तो म्हणतो "अरे राष्ट्रगीत म्हणजे "जनगण" म्हन ...आणि पुरा म्हनत आसशीत तर आपली शंभर रुपयाची पैज".....बाबल्या पैज जिंकण्याची शक्यताच नव्हती,कारण बऱ्याच भारतीयांप्रमाणे त्यालाही ते फक्त समूह्गीतात म्हणता येत असे.
हा जरी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असला तरी या घडीला मात्र त्याचा एकट्याचा होता,पण हार मानेल तर तो बाबल्या कसला....सगळ्या हसणाऱ्या मंडळींकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाबल्या डाफरला. " देशाच्या इतक्या पवित्र आणि मानाच्या राष्ट्रगीतावर ह्यो मेलो पैज लावता आणि ती पन शंभर रुपड्यांची ...आणि मेल्यानु तुमी हसतास,लाज नाय वाटत तुमका"...."देशात ह्या चल्ला काय ?..कोन झेंडो जाळता,कोन उलटो फडकवता,कोन हातात घेवक लाजता तर कोन कपाळाक गुंडाळता..ते मेले सगळे देशद्रोहीच ...आणि तेंच्याबरोबर तुमी ....पैजी खेळनारे...आग लागो तुमच्या तोंडाक"...
एका दमात एवढे बोलून,सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवून ज्याच्या मोटारसायकलवरून तो आला होता त्याच्याबरोबर पसार झाला.इकडे त्याच्या बोलल्याने "सावधान" मध्ये असलेल्या मंडळीनी "बाबल्या"च्या इरसालपणाला मनातल्या मनात एक "स्यालूट" ठोकला आणि "विश्राम" होत घराचा रस्ता धरला... 

)"बाबल्याची राणी".....
गेल्या आठवडाभरात बाबल्याच्या मदतीने आवाटातली झाडून सगळी घरे "झाडून"झाली,पण चतुर्थी दोन दिवसावर आली तरी बाबल्या आपले घर झाडायचे नावही काढेना.आज सकाळीच बाबल्याच्या बायकोने त्याला चांगलाच दम भरला.त्यामुळे मुकाट्याने झाडू घेऊन बाबल्या साफसफाईच्या मोहिमेवर रुजू झाला.बाबल्याचे जुने घर आणि त्याला जोडून घरकुल योजनेतल्या दोन खोल्या आज त्याला आवरायच्या होत्या.अख्ख्या दिवसाची आज इथेच "काशी" होणार या विचाराने तो तसा नाराजच होता.साफसफाईला सुरवात केली आणि अडगळीत असलेल्या बिनकामाच्या अनेक वस्तूंचा ढीग जमा झाला.बायकोला मनातल्या मनात शिव्या देत त्याने सगळ्या बिनकामाच्या जुन्यापुराण्या वस्तू एका टोपलीत भरल्या आणि बाहेर टाकणार तेवढ्यात बाबल्याची लक्ष्मी हजर आली,आणि टोपलीतल्या वस्तू पाहून बाबल्यावर करवादली. "तुमका सामायन यवस्थित लावूक सांगलय,भंगारात घालूक नाय"
आता मात्र बाबल्याची सटकली..
"अगो मायझया,कित्या ह्या रोंबाट भरून ठेवलंस?...अडचन नुसती"
"...आणि भुतूर हा काय तर जुनो स्टो तेचे पीनी,ग्यासाची जुनी लायटरा,फुटके कोप बशये,पारो गेलेलो आरसो.... तुझे फाटके साडये नी परकर असाच ना"
"आसांदे,तुमी ठेवा थयच....सगळा उपयेगाचा हा ता"....इति सौ.बाबल.
"अगो,तू काय सोताक इंग्लंडची राणी समाजतसं की काय ? म्हणजे पुढे तू मेल्यार तू वापरलेल्या ह्या वस्तूंचो लिलाव करून तुझी नातवा पतवंडा खूप पैसो कमावतीत असा तुका वाटता ?.....
याचा नेहमीप्रमाणे घरात काम करण्याचा मूड नाही हे ओळखून बायकोने त्याच्या हातातला झाडू हिसकावून घेतला आणि दाराकडे बोट करून "तुमी खयते जावा मी कामाचा बघतंय" अशी सूचक खुण केली....पडत्या फळाची आज्ञा समजून बाबल्यानेही मघाशी दोन वेळा कामात असल्याने कट केलेला मित्राचा नंबर डायल केला तो थेट आजच्या "श्रावण समाप्ती"मोहिमेत समाविष्ट होण्यासाठीच..

)"मारुती".....
एका माणसाची "मारुती"कंपनीची गाडी आमच्या गावाजवळ रस्त्यात बिघडते,तो मेक्यानिकच्या शोधात असताना त्याची भेट आमच्या "बाबल्या"शी होते.
गाडी मालक-इथे कोणी "मारुती"चे काम करणारा मिळेल का?
बाबल्या -(जरा विचार करून)..होय मिळात...
गाडी मालक -चला प्लिज भेट घालून द्या.
बाबल्या त्याला एका घराकडे घेऊन जातो.त्याच्या अंगणातूनच त्याला हाक मारतो.
"बबन्या "मारुती"चा काम करुचा हा..तुझी हत्यारा घेऊन भायेर ये"
तो सद्गृहस्थ खूष होत "बबन्या" घराबाहेर येण्याची वाट पाहू लागतो.
दहा मिनिटांनी लाल चड्डी घातलेला उघडाबंब "बबन्या" आपले दोन्ही गाल फुगवत, एका हाताने शेपटी पकडत आणि दुसऱ्या हातात भलीमोठी "गदा"घेऊन बाहेर येतो.
बाबल्या रॉक्स....गाडी मालक शौक्स.....

) "बाबल्याच्या बायलेचो गाऊन"......
यंदा चतुर्थीच्या खरेदीला कधी नव्हे ती बाबल्याची बायको कुडाळला गेली.सोबत तिची मुंबईवरून आलेली जाऊबाई होती.तिच्या आग्रहात्सव बाबल्याच्या बायकोने घरी वापरायला दोन "नाईट गाऊन" घेतले. सासूच्या धाकामुळे इच्छा असूनही लग्नानंतर ती साडीच वापरत होती,त्यामुळे जाऊबाईच्या धीराने घेतलेल्या "गाऊन" विषयी तिला प्रचंड उत्सुकता होती.घरी आल्यावर तो रंगीबेरंगी "गाऊन" परिधान करून लाजत लाजतच बाबल्या समोर येत म्हणाली...
"ओ मिया कसा दिसतंय ?"
इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिला गाऊनमध्ये पाहून बाबल्याने आश्चर्याने विचारले
"ही कोणाची म्याक्शी घातलस?"........
"कोणाची कित्या ? मिया इकत आणलंय कुडाळसून" इति.बा.बा.
यावर काही अभिप्राय द्यायचा सोडून बाबल्याने विचारले....
"किती रुपये गो ?".....
"दुकानदारनीन तीनशे साठ रुपयाचे दोन सांगल्यान ...कमी करून तीनशे चाळीसाक आणलंय"
"तीनशे चाळीसाक ?.....
अगो इतक्या पैशात तर आमचा नुसता "गाऊन"च नाय तर "नाचून" सुद्धा झाला आसता"......(बाबल्या हाताचा अंगठा वर तोंडाकडे नेत समर्पक अशी खुण करत म्हणाला)
"बाबल्या जोमात .....म्याक्शीवाली कोमात"...

६) "बाबल्याचो सत्कार".....
दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीला "तंटामुक्ती"चा विशेष पुरस्कार मिळाला.पुरस्काराच्या तीन लाख रकमेच्या विनियोगावरून गावातल्या सत्ताधारी आणि विरोधी अश्या दोन पक्षात इतके "तंटे" उदभवले होते की त्यांचे निवारण झाल्यावर खरंतर सरकारने गावला आणखी एक पुरस्कार द्यायला हवा होता.कोणतेही इतर विकासकाम न करता सदरच्या निधीतून फक्त विविध "सत्कार समारंभ" करण्याच्या अटीवर आमच्या एका ग्रामसभेने "तंटामुक्ती समितीला" निधी खर्चाची परवानगी दिली होती,परिणामी तेव्हापासून गावात "सत्कार सोहळे"सुरु झाले.त्यामुळे आतापर्यंत या ना त्या निमित्ताने गावातील सुमारे नव्वद टक्के नागरिक "शाल श्रीफळ"योजनेचे लाभार्थी झाले आहेत.आता सत्कारापासून वंचित असलेली दहा टक्के जनता लवकरात लवकर "सत्कारमूर्ती"व्हावीत व या झंझटीतून आपली लवकर मोकळीक व्हावी यासाठी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रयत्नशील आहेत आणि सत्कारासाठी वेगवेगळे फंडे शोधत आहेत.
या "सत्कारवंचित" यादीत आज सकाळपर्यंत आमचा "बाबल्या"सुद्धा होता.अनेकांचे विनाकारण झालेले सत्कार बाबल्याने याच देही याच डोळी न चुकता अनुभवलेले होते.सर्वांसमक्ष आपल्याही गळ्यात पंचायतीची शाल पडावी अशी त्याचीही इच्छा होती.आणि तंटामुक्ती अध्यक्षांच्या कल्पकतेने आज ती फलद्रूप झाली.
आज तेरा ऑगस्ट "जागतिक डावखुरा दिन" ....या दिवसाचे औचित्त साधून ग्रामपंचायतीने गावातील सर्व डावखुऱ्या मंडळींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.बारा जणांच्या सत्कारमूर्ती यादीत "बाबल्या"चे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
बाबल्या तसा "कट्टर डावखुरा" होता,कारण जेवण्यापासून सगळीच कामे तो डाव्या हातानेच करायचा.आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या घरी ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्याने "सन्मानाचे निमंत्रण"घेऊन स्वतः ग्रामसेवक भाऊ गेले होते.त्यामुळे तो भलताच खूष होता.बऱ्याचदा चेष्टेचा ठरणारा डावा हात इतकी मोठी संधी देईल याची त्याला खरंतर कल्पनाच नव्हती.
बारा सत्कारमूर्तीमधून सातजणचं उपस्थित होते.बाकीचे बहुदा "उभयकर"असल्याने त्यांनी सत्काराकडे पाठ फिरवली असावी असे समजून नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सुरु झाला.नेहमीपेक्षा आजची कार्यक्रमाची उपस्थिती फारच चांगली होती,कारण यापाठी बाबल्याची मोठी मेहनत होती,त्यामुळे डावखुऱ्या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून त्याला व्यासपीठावर स्थान मिळाले.डाव्या हाताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचे दिपप्रज्वलन सर्वांनी डाव्या हातानेच केले.कार्यक्रम सुरु झाला.सर्वप्रथम सर्व डावखुऱ्या व्यक्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि फोटोसेशन झाले मग एकेक करून वक्ते माईकचा ताबा घेऊ लागले.
ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्रीय असतो अशी माणसे डावखुरी असतात असे कोणीतरी म्हणताच बाबल्याने डोक्याच्या उजव्या बाजूवरुन अभिमानाने हात फिरवला.कुणीतरी डावखुऱ्या व्यक्तीविषयीचे समज गैरसमज यावर तत्वज्ञान पाजळले.तर कुणीतरी त्याची जागतिक आकडेवारी जाहीर केली.जगात दहा टक्के लोक डावखुरे आहेत हे ऐकून बाबल्याबरोबरच इतरांनाही आपण "अल्पसंख्यांक"नसल्याचा साक्षात्कार झाला.सरते शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंचानी जगातल्या अनेक प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची नावे सांगितली,पैकी अमेरिकेचे बराक ओबामा,आपला अमिताभ आणि सौरभ गांगुली यांची नावे सोडून इतर नावे कोणालाच समजली नाहीत कारण अध्यक्षांकडून त्या अवघड इग्लिश नावांचे उच्चार आणि नावे-आडनावे एकमेकात बेमालूमपणे मिक्स झाली होती.फक्त अमेरिकेचे बरेच अध्यक्ष हे डावखुरे होते हे समजल्यावर आपण इंडियात जन्मलो ही (आईबाबांची) मोठी चूक झाल्याचे बाबल्याने अनेकांजवळ बोलून दाखवले.आभाराच्या भाषणाने कार्यक्रम संपला.डाव्या हाताने प्लेट मधला चिवडा खाताखाता बाबल्याने हळूच अध्यक्षांना विचारले,
"अध्यक्षानु...आता "पायाळू"लोकांचो सत्कार कधी?....नाय ..माझे दोनव झील "पायाळू"आसत म्हणान इचारलयं"..
आणि तंटामुक्ती अध्यक्षांना सत्कारासाठीचा "नवीन" विषय मिळाला.....


) "बाबल्याचो श्रावण"…… 

"संकल्प करणे" आणि "संकल्प सोडणे" ह्या दोन बाबी जरी एकच असल्या तरी श्रावणाच्या बाबतीत मात्र या दोन विरुद्ध बाबी आहेत. बरेचजण "श्रावण"पाळण्याचा "संकल्प करतात" आणि आपल्या सोयीनुसार संधी शोधून एखाद्या कडव्या वारी तो "संकल्प सोडतात"
आमचा "बाबल्या"सुद्धा या बऱ्याच जणांपैकी एक.
"यंदा श्रावण पाळतलयचं"असा दृढ निश्चय तो दरवर्षी करतो,पण अजूनतरी त्याचा संकल्प सिद्धीस गेलेला कोणाच्या ऐकिवात नाही. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करायला मिळणार नाही या सबबीवर आधीचे अख्खे दोन महिने तो शाकाहारी जेवणाला स्पर्श सुद्धा करत नाही.यंदाही आधीचे दोन महिने त्याने कोंबड्या बकऱ्यावरच घालवले. यावर्षीचा श्रावण सुरु झाला पण इथल्या काहींच्या पद्धतीने रविवारचा पहिला दिवस त्याने "धोंड दिवस" म्हणून पुन्हा मांसाहारावर ताव मारला. आणि सोमवारपासून त्याचा अधिकृत श्रावण सुरु झाला,मंगळवार नंतरचा बुधवारही बाबल्या शाकाहारी राहिला त्यामुळे त्याच्या संकल्पाच्या चर्चा आमच्या नाक्यावर सुरु झाल्या.बाबल्याचा पाळलेला श्रावण आता किती मोठा होतो हे औत्सुक्य मात्र जास्त दिवस टिकलं नाही. नागपंचमीला मुंबईवरून आलेल्या एका चाकरमान्यासोबत शनिवारी गुपचूप एका धाब्यावर बाबल्या चिकन तंदुरी सोडवत होता. आणि नेमका हाच सीन बाबल्याच्या एका सो कॉल्ड मित्राने पाहिला.ज्याचे वर्षभर दारू मटक्यासारखे अनेक काळे धंदे चालतात पण तो दरवर्षी श्रावणात न चुकता कडक उपवास,पारायणे,शिर्डीवारी वैगरे करतो.बाबल्याची खेचण्याच्या उद्देशाने तो म्हणाला.
"काय मेल्या बाबल्या,तुका श्रावण बिवण काय हा की नाय… काय सगळाच सोडलस"….
आता बाबल्याचा श्रावण तर सुटलाच होता पण चारचौघात मित्राची अब्रू काढण्याची संधी त्याला सोडायची नव्हती,तो हजरजबाबीपणे उत्तरला…
"श्रावण बिवण तुमच्या सारख्या असुरांका…. पूर्वीच्या काळी असुर सुदा असाच करीत,थोडे दिवस कडक जपतप,उपासतपास करीत आणि एकदा काय देव पावलो की जगाक नाडूक,उच्छाद मांडूक मोकळे…. तेतलेच तुम्ही"….

) बाबल्या..
निवडणुकांचा सिझन सुरु झाला की पक्षकार्यकर्त्यांचे अनेक रंगीबेरंगी किस्से ऐकायला मिळतात,आणि त्याने मनोरंजनही खूप होतं.काही वर्षांपूर्वी आमच्या सौ.निवडणुकीला उभ्या होत्या.आमची ती पहिलीच निवडणूक होती.
आमच्या गावातच प्रचार कार्यालय आणि त्याच्या बाजुलाच जेवणावळीचा मंडप उभारला होता.तिथे रोज रात्री मांसाहाराच्या पंगती उठायच्या.विशेष म्हणजे रोजची जेवणासाठीची उपस्थिती ही दिवसभर प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चौपट असायची.मग आमचे प्रचारप्रमुख वाडीवाडीतल्या प्रमुख कार्यकर्त्याकडून रिपोर्टिंग घ्यायचे ते मात्र फार रंजक असायचे.
ही वाडी "प्याक" ती वाडी "प्याक"…… अमक्याला "म्यानेज" केला तमक्याला "फोडला" आणि बरंच काही…… त्यांच्या सांगण्यावरून मिळणाऱ्या मताची बेरीज केली तर बहुतेक वेळा ती एकूण मतदारसंख्येच्या बाहेर जायची. (मग मनात यायचे की,साला हे आपल्या विरोधी लढणारे उमेदवार घरी बसून ***** कि काय?
असंच एका कार्यकर्त्याला त्याच्या वाडीत मिटिंग लावायला सांगितली.वाडी छोटी होती त्यामुळे साधारण तिसेक माणसे अपेक्षित होती.संध्याकाळी वेळेपेक्षा थोडे उशिराच आम्ही पोहोचलो. आणि पाहतो तर खळ्यात नुसती ताडपत्री आणि दोन पाण्याने भरलेले तांबे आणि पडवीतल्या कॉटवर घोरत पडलेले एक जख्ख म्हातारे गृहस्थ असाच काहीसा "सेट" होता.
पुढे पहिली घंटा …. दुसरी घंटा झाली तरी त्याच्या घरातली माणसे सुद्धा खळ्यात उतरली नाहीत,
इतकं असूनही तो मुरब्बी कार्यकर्ता काही ना काही थापा जोडताच होता.सरते शेवटी आम्ही निघताना तो म्हणाला
"काय काळजी करू नका,माझी तीस मता "जाग्यार"आसत,सगळी एकटाकी तुमकाच पडतली"
तेवढ्यात आमच्यातला बाबल्या त्या कॉटकडे हात दाखवत वैतागून म्हणाला
"बाकी काय असला तरी तुझा ह्या याक मत मात्र खरोखरच "जाग्यार"हा, नक्कीच ता निवडणुकीच्या आधीच मतदार यादीतसून बाहेर पडतला

) "बाबल्याची "गोळी".....
आमच्या ट्रिपचा बहुदा चौथा आणि गणपतीचा अकरावा दिवस होता.त्यादिवशी आम्ही अमृतसरहून सिमल्याला निघणार होतो.सकाळची आवरावर सुरु होती.आदल्या दिवशी सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डरचा प्रोग्राम झाला होता त्यामुळे सगळेजण तसे दमलेलेच होते,तरी पुढचा प्रवास मोठा असल्याने आमची विनातक्रार तयारी सुरु होती.
एरव्ही सकाळी सहाला उठून आंघोळ इत्यादी आवरून बसणारा "बाबल्या"मात्र आज आठ वाजले तरी अंथरूण सोडत नव्हता.मी बाबल्याला हाक मारून लवकर तयारी करायला सांगितली.काहीश्या नाविलाजाने बाबल्या उठला आणि आवरायला निघाला.पण तो नेहमीसारखा उत्साही दिसत नव्हता.त्याची एकंदर जीवनशैली पाहता कालच्या फिरण्याच्या,जेवणाच्या किवा एकाद्या "चपटी"च्या त्रासाने तो दमणारा किवा त्रासणारा मुळीच नव्हता,म्हणून थोड्याश्या काळजीने मी त्याला विचारले.
"काय रे बाबल्या,आज काय तब्येत बिब्येत बरी नाय की काय ?"
"होय हो सायबानो,आज कपाळ धरला हा आणि पोटातसुदा मळमळता...उठान सारख्या वाटतच नाय" आंघोळीला निघालेला बाबल्या पुन्हा बेडवर बसत म्हणाला.
काल तर आपण साधी दालखिचडीच खाल्ली तरी त्याला त्रास झाला म्हणून मी त्याला विचारले,
"काल आजून काय अरबट चरबट खाल्लस काय रे ?"
"बाकी काय नाय, कायम खातंय ते गोळये खाल्लंय फक्त" बाबल्या...
"तू आणि गोळये?… ते रे कित्या? आणि कधीपासून खातस बाबा ?" मी
"हालीच..कोलते डॉक्टरानी दिल्यानी ब्लड प्रेशर कमी करुचे" बाबल्याचा खुलासा..
तेवढ्यात माझ्या एका मित्राने त्याचे गोळ्यांचे पाकीट पाहिले,त्यावर "प्रायमोलट एन" असे लिहिले होते, त्या मित्राला थोडीशी मेडिकलची माहिती असल्याने त्या गोळ्या स्त्रियांशी संबंधित असल्याची शंका आली,त्याने फोनवरून त्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर भावाला डिटेल्स विचारले,तेव्हा लक्षात आले की बाबल्याने गडबडीत भलत्याच गोळ्या आणल्या आणि तीन दिवस खाल्ल्या सुद्धा.
मी बाबल्याला त्याच्या घरी फोन लावून दिला आणि चौकशी करायला सांगितली.
बाबल्याची बायको बहुदा ह्याच्या फोनचीच वाट पहात होती त्यामुळे एका रिंगमध्येच फोन पोचला आणि ती समोरून कडाडली.
"शिरा पडली तुमच्या तोंडार…. फिराक जावचा आसला काय इतके भूरावतास कित्या?"
"अगो हय माका बरा नाय आणि तू थयसुन चीडतस कित्या …. असा झाला तरी काय?" साळसूद बाबल्या….
"झाला काय म्हणान माका इचारतास?…अहो खोरनातले माझे गोळये घेवन गेलास आणि तुमचे हयच ठेवलास" बा. बा.
"तुझे आणि कसले गो गोळये?"….
"कसले ते इलास काय सांगतंय… मी पण मेल्यान दोन दिवस ते न बगता खालय आणि गणपती घरात आसताना घराच्या "भायेर"बसलंय ……
आता मात्र अदलाबदलीने झालेली "गडबड" समजून घेण्याची बाबल्याची "पाळी"होती.
त्यातूनही सहीसलामत सावरून बाबल्या म्हणाला "अगो कित्या नको ते गोळये खातस,आता जमानो बदाललो हा...असला काय पाळीत ऱ्हवाची गरज नाय"
आम्ही फक्त दोघांचा संवाद ऐकून बाबल्याच्या समंजसपणाचे कौतुक करण्याचे काम केले.

१०) "बाबल्या"ची वाय फाय सेवा"......
कणकवलीत राणेंची,सावंतवाडीत तेलींची आणि वेंगुर्ल्यात गावडे यांची "वाय-फाय"सेवा सुरु झाली आणि त्यावेळेपासून बाबल्याच्या डोक्यात वाय फाय चा किडा वळवळू लागला.मुळात इंटरनेट या विषयीत बाबल्या पूर्ण अनभिज्ञ होता पण कोणत्याही नवीन गोष्टीची त्याला प्रचंड जिज्ञासा आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे या सर्व प्रकाराविषयी त्याने माझ्याकडून लगेच माहिती घेतली.(अर्थात मला आहे तेवढी) माझ्या दृष्टीने वायफायचा तो विषय तिथेच संपला पण बाबल्याच्या सुपीक डोक्यात एका वेगळ्या कल्पनेने आकार घेतला.
बाबल्याचे सामायिक घर आहे आणि मोठा परिवार आहे पण सर्व मंडळी कामधंद्यानिमित्त मुंबई निवासी.चतुर्थी आणि मे महिन्याच्या सुट्टीत फक्त घर गोकुळ असते,बाकी शुकशुकाट.त्या घरातल्याच एका खोलीत हल्लीच बाबल्याने एक ब्याचलर भाडेकरू ठेवला आहे.चांगल्या हुद्द्यावर असल्याने त्याच्याकडे वायफाय सुविधा असलेले ब्रॉडब्यांड"कनेक्शन आहे,ज्याचा प्लान अनलिमिटेड सदरातला आहे.ही बातमी बाबल्याला समजली.
माझ्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे बाबल्याने भाडेकरूसोबत सेटिंग केले आणि चतुर्थीच्या काळात एक महिन्यासाठी ते आपल्या घरात वापरायला देण्याचे कबुल करून घेतले ज्याचे महिना बिल रुपये पाचशे पंचेचाळीस भाड्याच्या रकमेतून वळते करून घ्यायचे दोघांच्या एमओयु मध्ये ठरले.करार झाला आणि बाबल्याने ही गोष्ट आपल्या चाकरमान्यांकडे जाहीर करून टाकली,की यंदा चतुर्थीत सर्वांना माझ्याकडून मोफत वायफाय सेवा मिळणार.याचा परिणाम असा झाला की यंदाच्या चतुर्थीत त्याच्या घरी येणारया चाकरमानी मंडळीची संख्या त्यांच्या मुलाबाळांच्या येण्याने दुप्पट झाली.इकडे चाकरमानी मंडळी गावी आल्याआल्या बाबल्याने आपल्या नावाचा "पासवर्ड" सर्वांना देऊन टाकला आणि सर्व मंडळी खूष होऊन फेसबुक वाटसअप मध्ये गढून गेली.
पुढे बाबल्याच्या मोफत वायफाय सेवेची चर्चा आमच्या गावभर पसरली.संध्याकाळच्या आरतीला यायला कुरबुर करणारी पोरेटोरे आता बाबल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीला हजेरी लाऊ लागली.एक दोन आरत्या म्हणून त्यांना अपेक्षित असलेली"तसली भजने"डाऊनलोड करू लागली.बरीचशी अप्लिकेशन "अपडेट" करू लागली.
एकंदरीत एरव्ही सामसूमीत जाणारा बाबल्याचा "गणेशोत्सव"यंदा दणक्यात आणि त्याच्या कौतुकात संपन्न झाला तो केवळ मोफत वायफाय सेवा देण्याच्या फक्त ५४५ रुपयांच्या बाबल्याच्या आयडीयेनेच ......

११) "गंमतची गंमत"
आपल्याकडे मोबाईल आल्यापासून बऱ्याच गमती-जमती घडताना दिसतात.बऱ्याचदा आपण अनोळखी माणसाचा कामानिमित्त नंबर घेतो आणि तो लक्षात रहावा म्हणून त्याच्या नावासमोर त्याचा पेशा/काम लक्षात येईल असे काहीबाही लिहून ठेवतो.
पुढे ती व्यक्ती आपला चांगला मित्र कीवा नातेवाईक होते,पण त्याचे मोबाईल मधील नाव दुरुस्त करण्याचा त्रास सर्रास कोणी घेताना दिसत नाही.
आमच्या एका मित्राचे अलीकडेच लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले.त्यालाही कारण मोबाईल वरील सेव्ह केलेले नावच होते. तर आमचा हा मित्र म्हणजे खाण्यापिण्याचा महाशौकीन इसम,त्यातही मांसाहारी स्पेशालिटी.चांगले मटण,मासे,ससे,गावठी कोंबडी कुठे मिळतात त्याची डिरेक्टरीच त्याच्या मोबाईलमध्ये तयार असते.अशीच चांगली गावठी कोंबडी काही वर्षांपूर्वी एका काकूकडे मिळायची. तेव्हा या महाभागाने तिचा नंबर "सडेकर काकी,गावठी कोंबडी" असा सेव्ह केलेला होता.
पुढे तोही विसरून गेला. योगायोगाने तिच्याच धाकट्या कन्येशी हे महाशय विवाहबद्ध झाले.आणि लग्नानंतर दोन दिवसांनी याच्या फोनची रिंग वाजली.बायकोने फोन उचलला तर पलीकडे तिची "आई" होती ……
"सडेकर काकी,गावठी कोंबडी" …….


१२) "बाबल्याची शाळा"
आमच्या बाबल्याचा चाकरमानी भाऊ दरवर्षी गणपती सणाला बायका पोरांसह रुबाबात गावी येतो. पण या अकरा दिवसात बाबल्याला त्याची काहीही आर्थिक मदत होत नाही. प्रतिवर्षी हे महाशय फक्त गणपतीच्या मूर्तीचा (आर्थिक) भार सर्वांसमक्ष न चुकता उचलतात त्यामुळे वाडीत असा समज होतो की, चतुर्थीचा सगळा खर्च बाबल्याचा "चाकरमानी"भाऊ करतो.कुटुंबाचा एकोपा दाखवण्यासाठी काही विषय बोलण्यासारखे नसतात परिणामी बाबल्याची घुसमट होत असते.
यंदा मात्र बाबल्याने त्याची "शाळा"घालायची ठरवली.
वाडीतली मंडळी गणपती आणण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गणपतीच्या शाळेत पोचली.प्रत्येकाने पाटासमोर अकरा रुपये,नारळ- अगरबत्ती ठेवली,गणपतीच्या मूर्तीवर मलमली शाल पांघरली आणि एकेक करून मुर्त्या टेम्पोत भरू लागले.
(आमच्याकडे मूर्तीसमोर अकरा रुपये ठेऊन मूर्तीची किंमत मालकाकडे देण्याची पद्धत आहे.)
गेल्यावर्षी बाबल्याचा गणपती दीड हजाराचा असल्याने वार्षिक महागाई वाढ धरून बाबल्याच्या चाकरमानी भावाने सतराशे रुपये शाळा मालकाच्या हातावर ठेवले, तरीही मालकाचा चेहरा काही उजळला नाही.
म्हणून चाकरमानी म्हणाला "आणि देवक व्हये काय?"……
"व्हय तर …
"चाकरमाण्यानु, यंदा बाबल्यान साडे स हजाराचो गणपती सांगलल्यान तेवा आजून चार हजार आठशे देवा" …
"काय ?…… साडे स हजार …… " चाकरमानी कोमात
इकडे बाबल्याच्या ज्या मित्रांना बाबल्याची हि "शाळा" माहित होती ते चाकरमान्याला चिडवू लागले
"बाबल्या,दर वर्षाक येदोच गणपती सांगा, तुमच्या वळयत सोभान दिसता"………
दरम्यान चाकरमानी दादाचा चेहरा मात्र इतका काळवंडला की, तो त्याच्या स्व:ताच्या देहालाही शोभत नव्हता........


13) "बाबल्याचो "नेट".....

सध्या वाटसअपचा जमाना आहे.सामान्य गृहिणीवर्ग सुद्धा यात मागे नाही.जे समोर येईल ते शेअर 
करण्याचा एकूण उद्योग सुरु असतो.परवा बाबल्याच्या बायकोची तिच्या एका जुन्या मैत्रिणीशी भेट झाली.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शेवटी विषय वाटसअप वर आला...
मैत्रीण- तू आसतस काय गो वाटसअप वर..?बा.बा.- आसतंय तसा कधीमधी..म्हंजे माझ्याकडे तसलो फोन नायां,पण ते दाखवतत कायतरी,ता आपला बघतंय ...
मैत्रीण- आसांदे..भावोजींच्या मोबाईलवर मी पाठयन कायतरी,मग तेंका रात्री दाखवक सांग..बा.बा. -पण नाय गो जमाचा....
मैत्रीण- कित्या..?..काय झाला.?
बा.बा. - तेंका हाली रात्रीचो "नेट"च नसता...
मैत्रीण- चल..तुझा आपला कायतरीच...
ओरोशिक इतके टॉवर हत,थय" रेंज" नाय असा झाला कधी..?. 

14) "बाबल्या आणि वचपा"...
माझा एक कोल्हापूरचा मित्र आहे,कोल्हापुरचा म्हणजे टिपिकल कोल्हापुरी व्यक्तिमत्व.मोठ्या मोठ्या अधिकारी वर्गाशी त्यातही पोलीस,आरटीओ आणि महसूल खात्यातील अधिकारी वर्गाशी आपले अगदी जवळचे नाते कसे आहे आणि तो माणूस आपल्या सांगण्यावर अवघड कामे कसे करतो हे सांगण्याची त्याला भारी हौस आहे.त्यातही कोल्हापूर,सांगली,सातारा या जिल्ह्यात जन्मलेले सगळे मराठा अधिकारी याच्या अगदी जवळच्या नात्यातले असतात (त्याच्या म्हणण्यानुसार) हे विशेष....
आमच्या जिल्ह्यात घाटावरचा कोणी अधिकारी बदलून आला की,या मित्राचा मला आवर्जून फोन येतो...."सावंत्या,या तुमच्या अमुक अमुक खात्यात अमुक अमुक सायब आलाय,तो माझा अगदी जवळचा दाजी लागतो,काय काम आसल तर बिनधास्त सांग"...प्रत्यक्षात याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न मला कधी करावा लागला नाही, पण आमच्या बाबल्याने एक दोन वेळा या ओळखीचा अगदी वाईट अनुभव घेतलेला आहे.त्यामुळे त्याच्यावर कधी पावशेर ठेवता येईल याची संधी बाबल्या शोधत होता.काल ती संधी त्याला मिळाली.
पंचवीस वर्षानंतर माझा 'अशोक तहसीलदार' हा कॉलेजमेट काल मला भेटायला आला होता.तो मूळ राधानगरीचा आणि सध्या पुण्यात असतो.त्याचे नाव ऐकल्यावर बाबल्याला एक कल्पना सुचली आणि त्याने माझ्या त्या कोल्हापूरच्या मित्राला फोन लावला.
"हेलो,ओळाखलास काय?..मी बाबल्या... सावंत सायबांचो मित्र बोलतंय,ओरशीसून"
"हा,असं काय राव..वळीखल की,बोला काय म्हणताय"...मित्र म्हणाला.
'काय नाय ओ..तुमी आमची इतकी कामा करतास म्हनान तुमच्यासाठी एक म्हायती देवची होती"...
"बोला की,
'अहो ते तुमच्या राधानगरीचे 'तहसीलदार' सायब आसत ना ते आमच्या सायबांचे वर्गमित्र आसत...काय काम बीम आसला तर सांगा"....
काल माझ्याकडे 'अशोक तहसीलदार' आला होता आणि तो माझा वर्गमित्र आहे हे त्या मित्राला माहित असल्यामुळे तो काय समजायचं ते समजला,आणि त्याने फोन ठेवला.

15)"बाबलो आणि चुनकापा"...
नारळी पौर्णिमेला कोकणात नारळ लढविण्याच्या स्पर्धा होतात.दोघांनी आपापल्या हातात नारळ घेऊन एकमेकाच्या नारळावर नारळ आपटला की ज्याचा नारळ फुटेल तो हरतो आणि जिंकलेल्या व्यक्तीला बक्षिसाच्या रुपात तो फुटलेला नारळ मिळतो.अर्थात यात नारळाच्या क्वालिटी बरोबर दुसऱ्याच्या नारळावर वार कसा करावा आणि समोरून येणारा वार/घाव कसा झेलावा ही कला सुद्धा फार महत्वाची असते.आमच्या गावच्या चौकातही दरवर्षी ही मजा अनुभवता येते.
कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसलेल्या आमच्या बाबाल्याने सुद्धा यंदा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला आणि संध्याकाळी घरी जाताना पिशवीतून फुटलेले पंधरा वीस नारळ घेऊन गेला.इतक्या नारळांची वळी पाहून त्याची बायको आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली.
"काय ओ,इतके फुटलेले नारळ खयसून हाडलास?"
"खयसून म्हणजे?..चोरी करुक नायय कोनाची...कष्टाचे हत ते माझ्या"..बाबल्या
"कष्टाचे म्हणजे?..इतक्या पावसात माडार बिडार चढललास की काय कोनाच्या"
तेवढ्यात हातातला एक अख्खा नारळ बायकोला दाखवत बाबल्या म्हणाला..
"अगो असा काय करतस..आज नारळी पूर्णिमा मा..मी पन नारळ लढवलंय आणी ह्या एका नारळार हे पंधरा वीस नारळ काढलंय..अगो कोनचो नारळच टीकाक कबूल नाय माझ्यापुढे..आज नशीब जोरार हुता माझा"
नवऱ्याचा हा पराक्रम ऐकून कधी नव्हे ते तिलाही भरून आले आणि ती कौतुकाने म्हणाली..
"वायच अशेच जावा नी दुकाना वरसून दोन किलो साखर आणि थोडी येलची हाडा..तवसर मिया ही वळी किसतंय...चुनकापा करूया"
त्याच कौतुकाच्या धुंदीत बाबल्या दुकानात जातो आणि साखर वैगरे घेऊन येतो, त्याची बायको बिचारी रात्री उशिरापर्यंत त्या खोबऱ्याच्या वड्या (चुनकाप) करते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी बाबल्याचा मित्र हरी बाबल्याच्या घरासमोरून जात असतो.बाबल्या त्याला हाक मारतो.
"ये हरग्या,सकाळी सकाळी चललस खय? हडे ये घोटभर चाय पिवन जा"
पडत्या फळाची आज्ञा मानून हरी बाबल्याच्या पडवीत येऊन स्थानापन्न होतो.दोघांच्या गप्पा सुरु होतात,इतक्यात बाबल्याची बायको त्याच्यापुढे गरमगरम चहाचा कप आणि एका बशीतून खोबऱ्याच्या वड्या ठेवते आणि त्यांच्या गप्पात सामील होते.ते खाताखाता हरी म्हणतो..
"वयनी ,चूनकापा बाकी भारीच केलस..मध्यम गोड आणि येलची बिलची टाकून मस्तपैकी ...नायतर आमचा आवझवरा करता ती....तुम्ही तोंडात सुदा घेवचास नाय"
हरीच्या स्तुतीने खुश झालेली बा.बा. म्हणाली..
"तरी काल घायगडबडच झाली..हेनी बिचाऱ्यानी इतक्या मेहनतीन नारळ जिंकून आणल्यानी..ते सुकान जातीत म्हणान रात्रीच केलंय"
"तेतूर मेहनत कसली ...तरी हेका स्वस्तच गावले...आमी आधी सातान एक घेतलव...मग गिराइक कमी झाला तशे उशिरा हेका शंभराचे वीस गावले..काल चान्सात इलो तुझो घोव "..इति.हरी
"म्हणजे?" बाबल्याची बायको आ वासली
"अगे वैनी,लोकांनी नारळ लढवल्यानी काय फुटलले नारळ कमी किमतीत इकतत,तेतलेच घेतल्यान काल बाबल्यान"..
हरीचं हे स्पष्टीकरण पूर्ण व्हायच्या आधीच बाबल्या बैठकीतून गुपचूप गायब होतो,त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बा.बा.हरीला विचारते..
"म्हणजे हेनी स्वतः नारळ लढवक नाय ?"....
"तो कसलो नारळ लढयता ..नुसता डोक्या लढवल्यान"..हरी ओम...
आज मात्र हरी रॉक्स..बाबल्या शोक्स....
16) "बाबल्याची व्यथा"
माणूस हा सवयीचा गुलाम असतो,आमचा बाबल्याही तसाच.बाबल्याने जरी श्रावण पाळला असला तरी त्याच्या मित्रमंडळीची दर दोन चार दिवसांनी भरणारी मैफिल चुकविणे त्याला बरेचसे जड जात असावे.आज रविवारची प्रसिद्ध दुपार असल्याने कट्ट्यावर आल्याआल्या बाबल्याने आज मित्रांची मैफिल कुठे भरली याचा माग काढला,आणि धावतपळत त्या मैफिलीच्या दिशेने सुटला.
खरंतर श्रावणाचे दहा दिवस पाळणे हा त्याच्या दृष्टीने मोठा कौतुकाचा विषय होता,पण नव्याचे नऊ दिवस संपल्याने मित्रांना त्याला वाटणाऱ्या कौतुकाचे काही घेणेदेणे नसावे.बाबल्या जबरदस्तीने त्यांच्या त्या रंगीतसंगीत मैफिलीत सामील झाला.टेबलच्या एका कोपऱ्यात बसून चणे शेंगदाणे अश्या चकन्याच्या माध्यमातून हाता तोंडाची भेट घडवत त्यांच्या सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होण्याची संधी शोधू लागला.पण त्यात नेहमीची हरहुन्नरी नव्हती,किंबहुना मित्रांचे त्याच्याकडे फारसे लक्षच नव्हते.या प्रकारानंतर तो माझ्याकडे आला आणि आपली तथाकथित व्यथा सांगू लागला.संदीप खरेंच्या शब्दात सांगायचे तर ती एकंदरीत अशी होती...
मी मासा खाल्ला नाही,मी मटनही खाल्ले नाही..
मी वाईनसुद्धा साधा,श्रावणात प्यायलो नाही...
भवताली पार्टी चाले,ती विस्फारून बघताना,
कुणी लोड होउन पडताना,कुणी वेटरवर चिडताना,
मी चकना घेउनी बसलो,टेबलच्या बाजूस जेव्हा,
तो थम्स अप देखिल छोटा,मज कुणी विचारला नाही

17) "श्रावणमासी..चतुर्थ दिवशी"
गाजराची पुंगी वाजली तर वाजली..याप्रमाणे काहींचा 'श्रावण' सुद्धा असाच असतो, 'जमला तर जमला'...आमचा बाबल्याही त्यातलाच.यापूर्वी त्याच्या 'श्रावण पाळणे आणि मध्येच सोडणे' याविषयी तुम्ही बरंच वाचलेलं आहे.
आज श्रावणाचा फक्त चौथा दिवस..गेल्या तीन दिवसातच बाबल्याने पाळलेला श्रावण त्याच्या दृष्टीने बराच मोठा झाला असावा,आणि त्यामुळेच आज बाबल्या थोडासा सैरभैर दिसत होता.त्यात संध्याकाळी आमचा एक आजन्म शाकाहारी (सर्वार्थाने) असलेला मित्र त्याला भेटला आणि बाबल्याला चहासाठी जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला.एकतर ती वेळ बाबल्यासाठी चहाची नव्हती आणि वर त्या मित्राकडून दारूपेक्षा चहातली मैत्री कशी चांगली यावर चाललेलं लेक्चर तर बाबल्यासाठी फारच डोकेदुखीचे होतं.तेवढ्यात मित्राने दोन स्पेशलची ऑर्डर दिली,चहाचे कप आले.कप तोंडाला लावणार इतक्यात आणि एक मित्र तिथे हजर झाला.मग या मित्राने त्याच्यासाठी रिकामा कप मागवला,वेटर कप आणेपर्यंत काहीसा वेळ गेला.त्यात चहा खूपच थंडावला पण बाबल्या मात्र काहीतरी सुचल्यामुळे गरम झाला.तो मित्राला म्हणाला..
"मगाशी मेल्या तू सांगत होतंस,चायतली मैत्री बरी म्हणान...अरे आपल्या कपातली चाय दुसऱ्याक देवची तर असो रिकामो कप मागवचो लागता.. हीच जर दारू आसती तर मित्रान त्याच ग्लासाक तौंड लावल्यान आसता आणि घटाघटा निम्म्या गलास रिकामी केल्यान आसता..अशी तुमच्यासारखी चाय थंड होयपर्यंत वाट बघीत रव्हलो नसतो..समाजला

18) बाबल्याची गटारी"...
"श्रावण" पाळायचा संकल्प करणारी (आणि चार/आठ दिवसात तो हमखास मोडणारी) मंडळी आषाढ महिन्याचे शेवटचे चार दिवस आपला सर्वच विषयातला "कोटा" पुरा करण्यासाठी धडपडत असतात.आमच्या बाबल्याचाही तोच प्रकार सुरु आहे.पुढे महिनाभर सोमरसासहित मांसाहार करता येणार नाही म्हणून त्याने आणि त्याच्या काही मित्रांनी तर गेल्या बुधवार पासूनच दुपार-संध्याकाळ असा मिनी गटारीचा कार्यक्रम सुरु केलेला आहे.
काल दुपारी बाबल्या कार्यक्रम उरकून घरी पोचला आणि अगदी साळसूदपणे घरात वावरण्याचा प्रयत्न करत होता.पण बाबल्याच्या बायकोला संशय आलाच. तो जरा लांब लांब राहण्याचा प्रयत्न करत होता आणि ती मात्र त्याचा जवळ घुटमळण्याचा..ती जवळ आली की,बाबल्या "वास" लपवण्यासाठी श्वास रोखून धरायचा आणि ती पटापट दीर्घ श्वास घेऊन "वास" शोधण्याचा प्रयत्न करायची... अखेर तिचा प्रयत्न सफल ठरला..तिने बाबल्यावर डोळे वटारले...
"काय ओ आज दोपारीच घेवन इलास आणि माझ्यापासून लपवतास"..
"नाय गो बाय... तुझ्यापासून काय लपवतलसं...."श्वानी"च आसस तू...
"शहाणी" आणि "श्वानी" या उच्चारातला फरक बायकोच्या ध्यानात येईपर्यंत बाबल्या संध्याकाळच्या मिनी गटारीसाठी पसार...


19)"टेस्ट"...
गेली दोन वर्षे आमचा बाबल्या "स्कूल कमिटी"चा सदस्य होण्यासाठी माझ्या मागे लागला होता.योगायोगाने हल्लीच एकाने राजीनामा दिला आणि बाबल्याला संधी देता आली.नव्याने शालेय समितीचा सदस्य झालेला बाबल्या परवा पहिल्याच स्टाफ मिटिंगला गेला.तिथे चांगले इम्प्रेशन पडले पाहिजे म्हणून, काय बोलावे,काय प्रश्न उपस्थित करावे यासंबंधीचे मार्गदर्शन जाताना माझ्याकडून घेऊन गेला.
मिटिंग सुरु होऊन संपत आली तरी बाबल्याला बोलायला योग्य संधी मिळत नव्हती.त्याची चुळबुळ पाहून समिती सचिव असलेल्या मुख्याध्यापकानी बाबल्याला " आता बोला" असा ग्रीन सिग्नल दिला,दरम्यान मला विचारुन गेलेला ते सर्व प्रश्न इतरांनी मांडल्याने बाबल्याची खरंतर थोडी पंचायत झाली होती....पण हजरजबाबी बाबल्याच तो...
आयत्यावेळी त्याला एक अडचणीचा प्रश्न त्याला आठवला...
"सरानो,मागच्या मिटिंगचा इतिवृत्त मी वाचलयं..त्याच्या पाच नंबर ठरावानुसार मुलांचे म्हयन्यान परीक्षा घेवचे असा ठरलला मां...मग आता शाळा सुरु होवन म्हयनो झालो तरी पोरांचे "युरीन टेस्ट" तुम्ही आजून कीत्या घेवक नाय ?"....
तेचा आधी स्पष्टीकरण देवा"..
अख्खा स्टाफ कोमात....
(अर्थात बाबल्याची स्कूल कमिटीतील जागा रिकामी हे ओघानेच आलेच..)


20)"बाबल्या रिटर्न"
बाबल्या आपले वाटस अप चेक करीत असताना त्याला त्याच्या एका चुलत मेहुणीकडून आलेला मेसेज दिसतो.तो काहीसा रोमांटिक आणि काहीसा विनोदी मेसेज बाबल्या वाचतो आणि मेहुणीला चाटिंग द्वारे विचारतो..
"काय गो तुका कोणी पाठवल्यान असलो मेसेज?"
मेहुणी म्हणते "असा काय ओ भावोजीनो..कोनी कित्या पाठवक व्हयो,आमच्या ग्रुपवर इलेलो.. तो तुमका फॉरवर्ड केलय झाला..आवडाक नाय?" ....
बाबल्या फक्त "हम्मम्म... बाय" असे टाईप करून विषय संपवतो,आणि बायकोला जोरात हाक मारतो..
"आता इतक्या जोरात आरडाक कित्या व्हया..माझे कान आजून शाबूत आसत,सांगा ..सांगा आता .कोणची तार इली ती.." बाबल्याची बायको..
"अगो तार येवक नायां आजून पण तुझ्या काकाची लवकरच येतली".....बाबल्या
"तेंची ओ बिचाऱ्यांची कित्या?..तुमच्याच त्या मुंबयच्या डांबिस काकाची येयना त्यापरास".....बायकोचे उत्स्फूर्त प्रतिउत्तर..
"अगो तुझ्या काकान त्या आपल्या चेडवाक मास्तरकी शिकाक रत्नागिरीक पाठवल्याना तेची लक्षणा काय खरी दिसत नायत"...बाबल्या
"म्हणजे ?"....तुमका असले बातमे गावतत तरी खयसून ?"...बा.बा.
"अगो आता तेनी माका वाटस अप वर मेसेज पाठवल्यान"...बाबल्या
"आता तुमका म्हणजे आपल्या भावोजीक मेसेज पाठवल्यान म्हणान तेचा लक्षान बरा नाय.."....बायको
"तसा नाय गो...मेसेज वायच रोमांटिक व्हतो म्हणान मी इचारलय,तुका गो कोनी पाठवल्यान?...तर मेला निर्लज्जपणे सांगता आमच्या "बेड" ग्रुपवर इलेलो म्हणान"..
बाबल्याने असे सांगितल्यावर त्याची बायको लगबगीने म्हणते.
"लॉक काढा आणि देवा हडे तो मोबईल...मी बघतंय काय पाठवल्यान ता"...
तो मेसेज वाचूनझाल्यावर ती बाबल्याच्या अंगावर खेकसते.........
"तुमचा काय मस्तक बिस्तक फिरला हा कि काय?...अहो त्या पोरांन सरळसरळ "B.Ed group" असा लिहिल्यान,आणि तुमी मात्र झिन्गीत ता "BED group" वाचतास...शिरा पडो तुमच्या तोंडार"....



 21) "सुतावरून स्वर्ग"....
आपल्याकडे घरातील एखाद्या व्यक्तीला देवाज्ञा झाली तर घराच्या एका भागात छप्पराला सुत बांधून सोडले जाते.त्या सुतावरून त्याच्या आत्म्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग सापडतो असे म्हणतात.यावरूनच कदाचित "सुतावरून स्वर्ग गाठणे" असे म्हणणे अस्तित्वात आले असावे.असाच या सुतावरून घडलेला एक किस्सा आठवला.किस्स्यातले नायक पात्र अर्थातच आमचा "बाबल्या" आहे.
आमच्या एका ब्राह्मण मित्राची आई देवाघरी गेल्याचे समजले आणि त्याला भेटायला मी निघालो,अश्या भेटींमध्ये बऱ्याचदा आमचा बाबल्या माझ्या सोबतीला असतो.सा तो त्यादिवशीही होता.
मित्राच्या घरी गेलो आणि कसं झालं..शेवटी आईचा आजार वाढला की काय.. वैगरे चर्चा सुरु होत्या,दरम्यान बाबल्याचे लक्ष समोर बांधलेल्या जाडजूड दोरखंडाकडे होतं आणि त्याच्या डोक्यात काहीतरी विचारचक्र सुरु होतं.मित्राचा फोन वाजला आणि तो फोन घेण्यासाठी आतल्या खोलीत गेला.नेमकी तीच संधी साधून काहीतरी नवीन शोध लागल्याच्या अविर्भावात बाबल्याने मला विचारलं..
"
सायबानु,घरात मर्तिक झाल्यार तुमच्याकडे घराच्या कोपऱ्यात बारीक सुत बांधतत ?"....
"
हो..बऱ्याच घरात तसं करतात"..मी म्हणालो..
"
हो पन ह्या भटांकडची पद्धत बगलास?..
"
कोणती रे ?"......मी 
"
अहो,सुताच्या जागेर मोठो जाडजूड दोरखंड बांधुची पद्धत दिसता हेंच्याकडे..ती बघा"..समोरचा गाठी मारलेला दोरखंड दाखवत बाबल्या म्हणाला.
बाबल्याने सुतावरून स्वर्ग गाठल्याचा अंदाज एव्हाना मला आला होता.मी म्हणालो...
"
अरे मुर्खा ते सुत नाही...त्यांची म्हातारी आई आजारी असताना या कॉटवर झोपायची,या दोरखंडाच्या आधाराने तिला स्वतःहून सहज उठता यावे म्हणून त्यांनी केलेली ती सोय होती"...
"
होय काय..माका वाटला..".बाबल्याचे वाक्य पूर्ण होण्या आधीच आतून आमच्यातला हा संवाद ऐकलेला माझा मित्र हातात कोयता घेऊनच बाहेर आला,पटकन कॉटवर चढला आणि त्याने तो दोरखंड कापून टाकत बाबल्या सारख्यां सत्पुरुषांचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्गच बंद करून टाकला...

22) "बाबलो आणि कायनात"......
"अगर किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने की कोशिश में लग जाती है" असो डायलॉग बाबल्यान खयतरी आयकल्यान,माका तेचो अर्थ इचारल्यान आणि आपणाक जा करुचा ता मनापासून केला तर आपण मनात यवजलेली आपली सगळी कामा नक्की पुरी होतली या निर्णयाप्रत तो इलो...
गेली दोन तीन वर्षा बाबल्याक बंदूक चालवक शिकाची होती.तसो आमच्या गावात बंदुकिंचो आणि बरकनदारांचो (बंदूक चालवणारयांचो) तोटो नाय पण बरकनदार म्हनान एकादा सावज मारला काय मगे नाक्यावरच्या गजालीत आपला वजन वाढतला आणि थय नेहमी रंगणाऱ्या पारधीच्या गजालीत आपलो कायमचो नामोल्लेख होतलो किवा करुक गावतलो ह्यासाठी तेका बंदूक शिकाची होती.बरकनदार म्हणान नावारुपाक येवचा होता.
त्यामुळे गेल्या वर्षातल्या सगळ्या गावपारधीत बाबलो न चुकता सामील झालो पारधीक गावातसून निघताना आणि परत येताना ऐटीत कोणाची तरी बंदूक आपल्या खांद्यावर घेवन तो नामचीन शिकारी असल्याचे पोझी मारी पण इतक्या करूनही अजून काय तेका बंदूक धरून पेटवक जमाक नाय,त्यामुळे तो मनातसून खूप नाराज झालो आणि जवळजवळ ह्यो शिकारेचो नाद सोडूच्या मनस्थितीत इलो.पण "कायनात"....
परवा आम्ही मित्रमंडळी येका रिसोर्टवर मुक्कामाक होतव.बाबलो सुद्धा आमच्याबरोबर होतो.रिसोर्ट नवीनच आणि नाविन्यपूर्ण होतो.त्या मालकान थय नवीन प्रयोग केलेल्यान,बागेत कृत्रिम बिळां तयार करून रानटी सशे सोडलेल्यान. हौशी पर्यटकांनी बंदूक घेवन त्या सश्यांची शिकार करायची मग त्याच मटनावर मस्त ताव मारायचो अशी ती स्कीम होती.बाबल्याक ह्या कळल्यावर तो माझ्या पाठी लागलो.काय ते पैशे देवया पण सश्याचाच मटान खावया ता पण मी शिकार केलेल्या....झाला..
म्हाराजनी हट्टान बंदूक हातात घेतल्यानी आणि माका मोबाईलवर व्हिडीओ शूट करूची ऑर्डर दिल्यानी...अर्धो तास सशे पुढे आणि बाबलो पाठी असो खेळ सुरु होतो,पण बाबल्याक काय नेम धरुचो चान्स गावाक नाय.मग मी कंटाळान पाठी इलय आणि पळणारे दोन सशे सुधा कंटाळान येका आंब्याच्या झाडाखाली जावन बसले...
थोड्या येळान बंदुकीचो बार झाल्याचो आवाज इलो,बाबल्यान पेट घातल्याची खात्री झाल्यावर आमी त्या दिशेक जावक निघालव.बाबल्याची पयलीवयली शिकार शुट करुक नाय म्हणान माकाव वायच अपराधी वाटला.मी सॉरी म्हनतलय इतक्यात रिसोर्टचो माणूस माझ्यावर चिढलो, म्हणालो ......
"बरो दिलास ह्यो शिकारी,मारून घालणार होतो कोनाकतरी ..फुकटची बिरमत "
"अरे सरळ सांग काय झाला ता"...मी
"काय झाला?...अहो ह्येना नेम धरून बंदूक खांद्यक लावल्यान आणि पेट ओढल्यान तेवा ह्येचो खांदो गेलो पाठी आणि पेट गेलो वर..."
"मग ह्यो ससो ?.." तेच्या हातातल्या गर्भगळीत सश्याकडे बोट करून मी इचारलय..
"तो काय हेच्या पेटान मराक नायां...."
"मग ?......"
"अहो सश्याचा नशीब वायट....हेचो पेट वर गेलो तेना आंब्याची बारीकशी येक डेळी मोडली आणि नेमकी ती सश्यार पडली..मेलो बिचारो"..
मग तेच्या हातातलो ससो घेवन मी बाबल्याच्या हातात दिलंय..हातात ससो...खांद्यार बंदूक ..आणि घामाघूम झाललो बाबलो असो एक मस्त फोटो काढलंय आणि फेसबुकवर ताबडतोब अपलोड केलंय आणि बाबल्याचा "बरकनदारी" प्रकरण थयच कायमचा संपवलंय ...

23) बाबल्याचा पाचारणा"
काही माणसाना एखाद्या घटनेविषयी फारसं घेणंदेणं नसतं,त्यांच्या मनात त्याविषयी काही भावनाही नसतात,परंतु तिथला त्यांचा प्रेझेन्स हा त्यांच्यादृष्टीने फार महत्वाचा असतो.मग त्यातून काही गमतीजमती नक्कीच्या घडतात.आमच्या बाबल्याच्या बाबतीतही एकदा असंच घडलं.
आमच्या एका कार्यकर्त्याच्या घरात मयत झालं होतं.त्यावेळी मी नेमका बाहेरगावी होतो.गावी परत आल्यावर आठवणीने त्याला भेटायला निघालो तेवढ्यात आमचे हे महाशय वाटेत भेटले.
"सायबानु,चल्लास खय?"..
त्याच्या या प्रश्नावर मी माझ्या जाण्याचे प्रयोजन सांगितले.तर हे महाराज म्हणाले..
"होय होय माकाव तेका भेटान येवचा हा..बातमी समाजली पण ते दिवशी जावक गावाक नाय"
मला माहित होतं की बाबल्याचा या गृहस्थाशी तसा घरोबा नाही.पण तो इतक्या अधिकारवाणीने येतोय म्हटल्यावर त्याला सोबत घेतला आणि निघालो.
त्या इसमाच्या घरी गेलो.चौथा की पाचवा दिवस होता,घरची आणि काही पाहुणे मंडळी बाहेर व्हरांड्यात बसली होती.आम्ही दोघेही तिथे जावून बसलो.मी अश्यावेळी विचारतात ते सर्व जुजबी प्रश्न विचारले,समोरून रुटीन उत्तरे आली.मग एवढा वेळ शांत बसलेल्या बाबल्यालाही त्याच्याशी जवळीक दाखवण्याची हुक्की आली,तो बोलता झाला.
"तुमचे बाबा म्हंजे लय ग्रेट माणूस...वाटेत खय दिसले तर हाक मारल्याशिवाय कधी पुढे गेले नाय"
"हम्म "..समोरून
"बऱ्याच वर्षापूर्वी तेंची चायची टपरी होती..एक रुपयो सुद्धा त्या माणसान कधी माझ्याकडसून घेतल्यान नाय..नाकासमोर चलनारो एकदम भलो माणूस"....
बाबल्या राजधानी सारखा सुसाट सुटलेला होता.त्याला आवरणे आता कठीण काम होते.माझी अस्वस्थता वाढत चालली होती.अजूनही बाबल्याचे "बाबा पुराण" सुरूच होते.ज्याला पाचारायला गेलो होतो त्याचीही अवस्था साधारण माझ्यासारखीच "ऑकवर्ड" झाली होती.सरतेशेवटी त्याचा संयम सुटला आणि त्याने दोन पावलं पुढे जात घरात हाक मारली.
"बाबानु...वायाचं भायेर येवा.."बाबल्याशेठ" तुमची लय आठवण काढतत"
यावर बाबल्या शॉक झाला त्याला चूक लक्षात आली तरी वर माझ्या कानात कुजबुजतो
"म्हंजे ..हेंचे बाबा जावक नाय तर ?..आये गेली?...पण शिक तर बाबाच होते असा आयकलेलय ...माका वाटला तेच गेले"...
तिथे अब्रूचा "पंचनामा"तेवढा व्हायचा शिल्लक होता.त्यामुळे त्या गृहस्थाला नमस्कार केला आणि बाबल्याच्या हाताला धरून तिथून काढता पाय घेतला.
न जाणो परत हा महाशय त्याच सहजतेने पुन्हा "आईपुराण"सुरु करायचा......
Top of Form

24) "....आणि लगीन मोडला "
आमच्या पंचक्रोशीत लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून "आबल्या" ही असामी फार प्रसिद्ध आहे."आबल्या" तसा वयाने पन्नाशीचा असला तरी लहानथोर त्याला "आबल्या"या एकेरी नावानेच हाक मारतात.या मध्यस्थीच्या कामात तो फारसे डोके वापरत नाही म्हणजे "अनुरूप जोडी" वैगरे काही न बघता फक्त मुलाचे स्थळ मुलीकडे आणि मुलींची स्थळे मुलाकडे जशीच्या तशी पाठवतो.लग्न जुळलं तर त्याचं नशीब असा एकंदर त्याचा खाक्या.त्यामुळे एखादे लग्न जुळवले (खरंतर जुळलं) की फारफार तर त्याला हजार दोन
हजार रुपये आणि टोवेल टोपी असे मानधन मिळते.त्यात गेली एकदोन वर्षे आमचा "बाबल्या" त्याचा सहाय्यक म्हणून त्यात वाटेकरी होता...... शंभर दोनशेला...
अलीकडे दोघात काहीतरी बिनसले,आणि बाबल्याने स्वतःच थेट मध्यस्थ बनून लग्न जुळविण्याचा उद्योग करायचे ठरविले.पहिल्याच आठवड्यात एकतरी लग्न जुळवून आबल्याला "धक्का" द्यायचा त्याचा इरादा "पक्का" झाला.
बाबल्याची एक मेव्हुणी होती जिचे बरीच वर्षे लग्न जुळत नव्हते त्यामुळे बायको आणि सासरची मंडळी "खयतरी बघा"असे म्हणत त्याच्या मागे लागली होती.बाबल्याने या आधीही तिच्यासाठी प्रयत्न केले होते पण लग्न जुळत नव्हतं.नव्या मोहिमेची सुरुवात आपल्या मेव्हुणी पासूनच करायचे त्याने ठरविले.त्याचे नशीबही चांगले जोरावर होते चारच दिवसात त्याला एका "अनुरूप" स्थळाचा सुगावा लागला.
ताबडतोब तो प्राथमिक बोलणी करण्यासाठी गेला.
मुलाकडच्या मंडळीनी सांगितले की आम्ही सुरवातीला मुलगी पाहायला घरी येणार नाही त्यानुसार मुलीला घेऊन एका नातेवाईकाचे घरी पसंतीचा कार्यक्रम उरकायचे ठरले. ठरल्याप्रमाणे बाबल्या,त्याची बायको, मुलीचे वडील(बाबल्याचे सासरे) ही मंडळी मुलीसह तिथे गेली.चहापान झाले.मुलामुलीची पसंती झाली.देण्याघेण्याच्या विषयाची चर्चा झाली तीही आटोक्यातली होती.बाबल्याचा चेहरा हळूहळू उजळत होता कारण मेव्हुणीचे लग्न ठरत आहे यापेक्षा आपला पहिलाच प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आनंद त्याला जास्त होता.सगळं जुळून येतं आहे असं दिसल्यावर बाबल्या गडबडीने म्हणाला..
"आमच्या कडसून काय प्रॉब्लेम नाय ..मग पावण्यानु सोयरिक फायनल समजाची मा"
तेवढ्यात मुलाचे वडील म्हणाले "आमची एक अट आसा".....
त्यांचे ते म्हणणे बाबल्याला "पानपराग"च्या जाहिरातीप्रमाणे वाटले..बाबल्या हसत हसत म्हणाला....."बोला काय ता"
मुलाचे वडील म्हणाले
"आमका आधी मुलीच्या आवशीक बघुचा हा" ..
"ओ..जेचा लगीन करुचा हा त्या चडवाक बघलास आता तेचे आवशीक कित्या?"..बाबल्या
यावर मुलाच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिले ...
"मुली म्हातारी झाली काय साधारान कशी दिसतली ता कळा साठी"........
खरंतर हे ऐकल्यावर बाबल्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली पण त्याने शांतपणे ही अटसुद्धा मान्य केली कारण त्याला मध्यस्थ म्हणून सक्सेस व्हायचे होते.दुसऱ्या दिवशी बाबल्याने मुलीच्या आईला (म्हणजे सासूला) आणि मुलीच्या मावशीला सोबत घेऊन पाहुण्यांचे घर गाठले.बाबल्याने दोघींची ओळख करून दिली.आगतस्वागत पार पडले.
नंतर मुलाचे वडिल म्हणाले...
"पावण्यानु,याक इचारू ?.....तुमी मुलीच्या "आवशी" बरोबर तिच्या "मावशे"क आणि कित्या आणलास?"
हा प्रश्न म्हणजे फुलटोस चेंडूवर सिक्स मारायची संधी होती.बाबल्याने त्याचा पुरेपूर लाभ घेत एक उंच षटकार हाणला.
"मुली "म्हातारी" झाली काय कशी दिसतली ता दाखवक मुलीच्या "आवशीक" आणि "विधवा" झाली काय कशी दिसतली ता दाखवक तिच्या "मावशेक" .....
मुलाचा बाप कोमात....बाबल्या जोमात ...





























25) "इरसाल बाबल्या"........
बाबल्याची पुनश्च भेट सुरु झाली आणि मधल्या काळातल्या काही शेअर करायच्या राहून गेलेल्या बाबल्याच्या मजेशीर गोष्टी आठवणीत येऊ लागल्या.
मध्यंतरी बाबल्या आपल्या एका नातेवाईकाकडे गेला होता.सदरचे नातेवाईक ज्या गावात राहतात त्या गावात हायवे चौपदरीकरण प्रस्तावित आहे.त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी एका मोठ्या "लोकप्रतिनिधी"ची सभा आयोजित केली होती.आपल्या पाहुण्यासोबत बाबल्याही सभेला जावून बसला.लोक प्रतिनिधी आले,फटाके,टाळ्या,हारतुरे आटोपल्यावर एक दोन प्रस्तावनेची भाषणे झाली आणि ते प्रमुख "लोकप्रतिनिधी" बोलायला उभे राहिले. "हायवे"विषयावर बोलता बोलता सवयीप्रमाणे ते थेट आघाडी सरकारवर घसरले....
"तुम्हाला माहित आहे? अहो या आघाडी सरकारने देशाची,राज्याची किती वाट लावली ते....या आपल्या राष्ट्रीय महामार्गाचा आधी १७ वा क्रमांक होता.आम्हांला अभिमान होता.पण गेल्या पंधरा वर्षात सरकारने त्याच्या दर्जाकडे इतका दुर्लक्ष केला की आज त्याचा क्रमांक ६६ असा झाला आहे.फार वाईट वाटतं ओ...पण तुम्ही काळजी करू नका. लवकरच चौपदरीकरण पूर्ण करून आम्ही त्याला उचित दर्जा देऊ,तुम्ही फक्त भूसंपादनाला सहकार्य करा"....
हा विषय आणि यातली चूक समजून घेण्या इतपत "दर्जा" अर्थात तिथे बसलेल्या बहुदा कोणाकडेच नव्हता त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला.पण बऱ्यापैकी "जनरल नॉलेज" असलेल्या "बाबल्या"ला हे माहित होतं की महामार्गाचे क्रमांक हे दर्जावर नसून त्याच्या निर्मिती पश्चात मिळणाऱ्या अनुक्रमांकावर असतात.सरळ बोलून त्या मोठ्या "लोकप्रतिनिधी"ला दुखावण्यापेक्षा "काट्याने काटा" काढण्याचे बाबल्याने ठरवले व तो परवानगी घेऊन बोलायला उभा राहिला....
"बरा झाला सायबानु तुमची सत्ता इली ती...... नायतर आघाडी सरकारान, आमच्या "एम एच ०७" चा "एम एच ५७" केला आसता...हेरी काय नाय ओ ..पण सगळ्यांका नंबरप्लेट बदलूचे लागले असते....." 
बाबल्या जोमात आणि लोकप्रतिनिधी कोमात .....


Like
Love
Haha


No comments:

Post a Comment