Friday, November 29, 2013

"रुबिक क्युब"

"रुबिक क्युब"
मला वाटतं आयुष्य हे "रुबिक क्युब"च्या कोड्यासारखे आहे.ज्याला सहा बाजू आणि प्रत्येक बाजूला नऊ चौकोन असतात.हे कोडे सोडवायचे तर एका बाजुचे नऊही चौकोन एकाच रंगात याप्रमाणे त्याच्या सहा बाजू सहा रंगात यायला हव्यात.हा क्युब हातात आल्यावर आपण जेव्हा मोठ्या मेहनतीने एखादी बाजू समरंगी करतो तेव्हा फार आनंद होतो.पण जेव्हा दुसऱ्या बाजूसाठी प्रयत्न करायला जातो तेव्हा नेमकी समरंगी केलेली बाजू विस्कटते.मग आणखी थोडा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर आपण त्या एकाच बाजूवर समाधान मानायचे पक्के करतो.आपल्या आयुष्याचेही साधारण असंच असतं ज्ञान असेल तर पैसा नाही,पैसा असेल प्रतिष्ठा नाही,प्रतिष्ठा असेल तर स्वास्थ नाही,स्वास्थ असेल तर गृहसौख्य नाही,आणि समजा तेही असेल तर जनाधार नाही.एक सांभाळून दुसरे मिळवणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. मात्र काही माणसे फार हुशार असतात ते कोड्याची सुटलेली एकच बाजू इतरांना दाखवतात,आणि उरलेल्या बाजू सोयीस्करपणे लपवतात.तर काही महाभाग असेही असतात जे सत्तावीसच्या सत्तावीस छोटे चोकौन अलग करून "क्युब"अगदी मोकळा करतात आणि पुन्हा सहाही बाजू समरंगात जोडतात केवळ स्वतःच्या समाधानासाठी.असो गेले काही दिवस मीही प्रयत्न करतोय,आताश्या कुठे एक बाजू सावरलीय.पुढे बघू …….

"चारोळ्या"


भाजपाने ओलांडले सत्तेचे "माप",
मोदी विरोधकांना बसला "चाप"…….  
लक्षवेधी ठरला अरविंदचा "आप"
कॉंग्रेसला मात्र आठवला "बाप"……
 —

छान उमललेलं जास्वंदीचं फूल
काल देवाला वाहायचंच राहिलं…. 
दिवसभराच्या प्रतीक्षेत बिचारं, 
आज पार कोमेजलेलं पाहिलं…



"कोटींचे" घोटाळे ऐकल्यापासून….
माझं कशातच "लक्ष" नाही.
मनाला "हजार"वेळा बजावलं पण…
"शंभरा"तून "रुपया"चाही गुण नाही.


नाही जमलं कधी,
असं अंगभर "मोहरणं"…… 
जेव्हा जेव्हा केला प्रयत्न,
नशिबी आलं नुसतं" शहारणं"….


मी ठेचाळून माघारी फिरलो त्या वाटा,
पुढे कधीतरी रस्त्याला मिळालेल्या ……
पण,तोपर्यंत जगण्याच्या साऱ्या आशा,
पुन्हा न पालवण्यासाठी जळालेल्या……
 



काल मी माझ्या अंगठ्याचं,
चुकून नख जरा जास्त कापलं…… 
आणि तेवढंच निमित्त घेऊन,
मला,अनामिकेने मस्त झापलं….


तू परत येशील,
या वेड्या आशेवर मी होतो…. 
असं कुणी येतं का?
म्हणून हसला माझ्यावर जो तो…


इतक्या वर्षानंतरही,
तू मला मारलेली हाक,
खूप ओळखीची वाटली …… 
प्रतिसाद देणारच होते,
पण मनात भीती दाटली ….

असा एखादा "भारद्वाज"
रोज सकाळी सकाळी दिसावा…… 
आणि दिवसातला एकही क्षण,
कोणत्याही चिंतेचा नसावा……

लग्न झाल्यापासून तुझ्यातला,
"प्रियकर" कुठेच दिसेना…… 
माझ्यातली "प्रेयसी" सुद्धा आता,
लाडेलाडे रुसेना…… ....


आजच्या स्टेटस वरून समजले की,
बऱ्याच मित्रांची मराठी ही "मातृभाषा" आहे…. 
फक्त आजचा दिवसच नाही,तर सदोदित,
तिचा आदर करतील अशी वेडी "आशा"आहे …… 

मराठी भाषा दिनाच्या अनेक शुभेच्छा ….!

या जगात माणसाच्या,
उपद्रवमूल्याला "सलाम"आहे…… 
ज्याच्याकडे "ते"नाही,तो मात्र,
गुलामांचाही "गुलाम"आहे ……

मैत्रिणीचा विषय निघाल्यावर,
मन कितीही असलं शुद्ध…. 
तरीही घरात सुरु होतं, 
नक्कीच तिसरं महायुद्ध ……

माझ्याकडे अजूनही तुझी,
नववीतली ती"वही" आहे…… 
ज्यात 
"तू मला खूप आवडतोस"असा शेरा,
अन खाली तुझी "सही" आहे….

इथे काम करणाऱ्याच्या चुका काढणारे,
बरेच दीड"शहाणे" आहेत…
आणि काम न करणाऱ्यांसाठी मात्र,
एकाहून एक "बहाणे" आहेत…

"अजब अमुचे सरकार"… 

इथे गरिबांना द्यावा लागतोय,
एका "वडापाव" वर ढेकर … 
आणि तिथे मात्र श्रीमंतांना मिळतोय,
फक्त चाळीस पैशात एकर …

तुझ्या गालांना मी लावलेला रंग,
मला अजूनही तसाच आठवतो……
कारण,न चुकता दरवर्षीच्या होळीला,
मी तो मनात नव्याने साठवतो…… 

"फेसबुक फ्रेंड"

"फेसबुक फ्रेंड"

जी यायला नको ती,
"फ्रेंड रिक्वेस्ट"आली…
खपली जुन्या जखमेची,
पुन्हा सैल झाली …
होते नाव ओळखीचे,
आडनावे जोडलेली……
आम्हीसुद्धा त्याकाळी,
तशी जोडून खोडलेली……
वेणी तीच होती,
अबोली माळलेली ……
कॉपी त्या फोटोची,
आम्ही कधीच जाळलेली……
"प्रोफाईल" मध्ये तरी ती,
ऐश्वर्याने नटलेली…
इथल्या दारिद्र्याच्या,
शापातून सुटलेली…
अनोख्या कुतूहलाने,
विनंती "कन्फर्म" केली …
हातास धरून माझ्या,
ती भूतकाळात गेली …
पुन्हा एकदा नव्याने,
"फेसबुक फ्रेंड"झाली……
खपली जुन्या जखमेची,
पुन्हा सैल झाली……
जी यायला नको ती,
"फ्रेंड रिक्वेस्ट"आली…

Saturday, November 23, 2013

"सोन्याची पेढी"

आता कोकणातल्या प्रत्येक जत्रेत अशी "सोन्याची पेढी"थाटणारे..
"खोट्या"दागिन्यांचे "खरे"व्यापारी भेटतील.
सध्या सोन्याचे भाव इतके वाढलेत की,
दराचा आकडा उच्चारण्यासाठी सुद्धा काहीतरी "ऐपत" नक्कीच हवी.
इतरांसाठी सोने स्वस्त असो अथवा महाग ...
"गरिबां"ची मुलेबाळे मात्र ही अशी "पेढी"पाहून सुखावतात.
आणि कोणतेही "बिल" न मागता मोठमोठी "डील" करतात.
आम्ही सुद्धा अशी "सोने खरेदी" मस्त "एन्जॉय" केलेली आहे.
आजच्या एका जत्रेत ती "आठवण"ताजी झाली.




"स्वप्नातली रेल्वे"

"स्वप्नातली रेल्वे"
कोकण रेल्वेच्या भरावाची माती,
आजुनव आमच्या शेतात व्हावता…
ओसाड झाली सगळी शेता,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥ 
कोकणातल्या प्रत्येक स्टौलवर,
परप्रांतीयांची पाटी झळाकता….
आमका कधी कधी राग येता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता॥
प्रकल्पग्रस्तान्का नोकरी मिळाक,
सरकारी भरतीचा "धोरण"आड येता….
मोठ्या आशेन जोतो अर्ज खरडता,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
प्रकल्पात घरदार गेलेल्यांका,
रस्त्या वाटेचो आजून पत्तो नाय….
शिक-खोक म्हातारो सुदा मेरे वरसूनच चलता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
शेता भातात जाताना फाटकावर,
आमची अर्धीतरी इरड मोडता….
मेलो गेटमनसुदा लय रुबाब करता,
पण आमची कधी तक्रार नसता…
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
रेल्वेक खय थांबो नाय,
तर खय पुरेसो कोटो नाय…
आम्ही तिकटीसुदा ब्ल्याकनेच घेतव,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥
स्टेशन मास्तरापासून टीसी पर्यंत
जो तो आमका न्याना शिकवता….
काय इचारला तर आमकाच अडानी म्हणता ,
पण आमची कधी तक्रार नसता……
कारण,"स्वप्नातली रेल्वे" आमच्या दारातसून धावता ॥